नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇२६.👇
नर्मदे हर…हर हर नर्मदे!
खुंटामोडी ते मोलगी प्रवास मी एकटीने केला. म्हणजे मागे पुढे मंडळी होती पण अंतर बरच होतं. रस्ता गावातून, डोंगरातून असाच होता. ऊन छान पडलं होतं आणि वातावरण पण आल्हाददायक होतं. अंतर मात्र बरच होतं. काल खुंटामोडी जवळ वाटलं आणि पटकन आलं होतं तसंच आज मोलगी खूप खूप दूर जाणवत होतं.
या प्रवासात नं एक गंमत च झाली. रस्ता डोंगराळ होता त्यामुळे सरळ नव्हताच. खुप पुढे गेलेला मयुरेश दादा काही दिसत नव्हता. त्यामुळे रस्ता विचारावा लागणार होता. काही ठिकाणी रस्ता विचारायला लोक दिसत होते, मात्र काही ठिकाणी कुणीच नाही. एका ठिकाणी रस्ता जरा गोंधळात टाकणारा होता. मी थोडे थकले होते, म्हणून मी रस्त्याच्या कठड्याला टेकून उभे राहिले. मोठा रस्ता होता छान, पण गर्दी फ़ार नव्हती. एखादी गाडी येईल तेव्हा विचारू असं वाटून मी उभी होते. “इतक्यात माझ्या मागून आवाज आला, चक्क मराठीतून, तो समोर पूल दिसतोय तिथून खाली उतरून मग डावीकडे जा”… बाईचा आवाज होता…खूप ओळखीचा आवाज होता… मला आधी वाट्लं की मला भास होतोय, पण पुन्हा तोच आवाज आला…. दिसलं मात्र कुणीच नाही.मागे शूलपाणीच्या झाडीत पोर्टर घेऊ नको असा आवाज आला होता नं, तसाच काहिसा, पण तो आवाज मला माझ्या आतून आल्यासारखा वाटत होता… मी पुढे चालू लागले आणि समोर गेल्यावर पुलावरून खाली उतरले. तिथे एक दुकानदार होता, त्याने पण त्या आवाजाने सांगीतलेल्याच दिशेला बोट दाखवलं…. त्या आवाजानी रस्ता बरोबर सांगितला होता!
पुढे त्याच रस्त्यावर एक दुधवाल्या चं दुकान आणि छोटंसं होटेल होतं. त्यानी मला बोलवलं. हॉटेल अजून सुरू व्हायचं होतं, म्हणून त्यानी दुधाचं पाकिटच दिलं. आता याचं काय करणार? ते पाकिट तसच दातानी फ़ोडून पिऊन टाकलं.. छोटं २५० एम एल चं पाकिट होतं. ते संपलं तर त्याने लगेच दुसरं दिलं, आणि “बस ये पी लो, फ़िर नही दुंगा” असा आग्रह ही केला.. ते ही पाकिट मी प्यायले… गंमत च आहे, इथे परिक्रमेत काळा चहा मिळतो, म्हणजे इथे लोक तोच पितात, म्हणून… आणि मला चक्क अर्धा लिटर ताजं दुध प्यायला मिळालं.. अगदी नाश्त्याच्या वेळेवर… राजेशाही परिक्रमाच म्हणायची ना ह्याला? पुढे वाटेत एक दोन दा चहा झाला, आणि मोलगी गावात एका चौकात अचानक मला मयुरेश दादानी आवाज दिला.. तो एका डॉक्टर कडे बसला होता. त्या वेळी माझी टाच जरा दुखत होती, पण डॉक्टरला दाखवावं असं काही नव्हतं, मी सहन करू शकत होते आणि म्हणून मी काही तो विषय त्या डॉक्टरशी बोलताना काढला नाही. आम्ही चहा प्यायलो, सर्दी खोकल्याच्या काही गोळ्या जवळ असू द्या असं म्हणत त्या डॉक्टर ने आम्हाला दिल्या. आम्ही आता निरोप घ्यायला उभं राहिलो. माझ्या उभं राहण्याकडे पाहून त्या डॉक्टरांनी अजून दोन गोळ्या माझ्या हाती दिल्या..म्हणाले “एडी मे दर्द है ना आपके? इसे ले लेना,कम हो जायेगा”
न मागता मला टाचेसाठी औषध मिळालं.
आम्ही मोलगी ला नाईंकाच्या घरी पोहचलो. छानसा टूमदार बंगला होता. त्यांनी आमची व्यवस्था खूप छान केली. खूप अगत्य केलं. कुंडल नंतर इथे पुन्हा घरचं जेवण जेऊन आनंद झाला. तो दिवस मुक्कम करून आम्ही दुस-या दिवशी वडफ़ली साठी निघालो.हा भाग येतो नांदुरबार जिल्ह्यात. महाराष्ट्रात आल्याचं समाधान वाटू लागलं पण मध्य प्रदेशाच्या तुलनेत या भागात परिक्रमा वासींबद्दल बरीच उदासीनता आढळली. कारण काही कळलं नाही. मात्र सुरगस च्या शाळेत विश्रामाला थांबलो असताना अचानक एक माणूस माझ्याकडे येऊन मला नमस्कार करू लागला. परिक्रमा वासींना लोक नमस्कार करतात, त्यामुळे विषेश नाही.. पण हा म्हणाला “ तुम्ही नागपूरच्या न मॅडम?” अरेच्या, हे कसं समजलं याला? “ मॅडम ओळखलं नाही का?, मी तुमच्या शाळेत आलो होतो नं माझ्या विद्यार्थ्याला घेऊन एक्जिबीशन साठी, दिल्ली ला पण होतो आपण सोबत, इन्स्पायर अवार्ड साठी, तुम्ही त्याच आहात नं त्या भारतभरातून पहिलं बक्षिस मिळालेल्या..सगळ्या स्टुडंटला तुम्ही ” उत्तरं कशी द्यायची” ते सांगितलं होतं नं मॅडम, मी आजपण तुमच्या टिप्स मुलांना सांगत असतो.” अरे बापरे, तर हे सर मला छानच ओळखत होते, आणि या परिक्रमावासींच्या परिधानात, २०१३ नंतर म्हणजे ४ वर्षांनी यांनी मला ओळखलं होतं, खरच अशा प्रकारे आपण कुणाच्या लक्षात राहू असं वाटलं नव्हतं. या शाळेत खरं तर परिक्रमावासीं साठी सेवा वगैरे प्रकार नाहीये, पण त्या दिवशी मिड डे मिल मध्ये मुलांबरोबर आम्हा सर्व परिक्रमा वासींना या शिक्षक मंडळींनी आग्रहानी जेवायला वाढलं.
नंदुरबारमधे मात्र परिक्रमा आणि परिक्रमावासंबद्दल खूप उदासीनता आहे. सुरगस च्या शाळेतून पुढे निघालो, ब-याच वेळाने पाणी कुठे मिळतय म्हणून पाहू लागलो तर नळ किंवा हापशी दिसेना, म्हणून एका घरी पाणी मागितलं…”पानी खतम हो गया” असं उत्तर ऐकू आलं. आश्चर्य आहे नं.. निदान पाण्याला कुणीच नाही म्हणत नाही, म्हणजे परिक्रमा वासी असो का नसो.. बरं हाच अनुभव अजून दोन तिन घरीही आला…. कारण काही कळेना…मात्र पुढे इथे कुठे रात्र काढायची वेळ आली तर सोय होणं कठीण आहे हे जाणवू लागलं.
तसंच झालं. आम्ही वडफ़ळी पर्यंत पोहचू शकणार नाही समजत होतं. दुपार उलटून गेली होती. छोटे छोटे आदिवासी पाडे आहेत इथे पण तसा हा जंगलाचाच भाग. जस जशी संध्याकाळ होत आली तशी थंडी वाढू लागाली. इथे निवारा शोधायला लागणं आवश्यक होतं. निवारा सापडत नव्हता, कुणीतरी म्हणालं समोर राम मंदिर आहे तिथे जा.. वाटलं, जमलं की.. पण तसं नसतं नं! अहो समोर दोन फ़ुटाचं रस्त्याच्या कडेला बांधलेलं राम मंदिर होतं.. इथे कुठे राहणार आम्ही? पुन्हा पुढे गेलो… पुन्हा एक छोटं मंदिर.. ते मोठं राम मंदिर काही सापडेना. जो कुणी रस्ता सांगत तिथे एक छोटं मंदिर च असे… आज कदाचित उघड्यावर झोपावं लागणार होतं. मयूरेश दादा झपाझप पुढे गेला..मी आणि पसारकर काकू मागे पुढे होतो.. स्मीता आणि सुरेखा ताई मागे होत्या.
आम्ही आता पांढरा माती या गावा जवळ होतो. साधारण ४.३० झाले असावेत. एका झाडाखाली बरीच मुलं खेळत होती. आमच्या जवळ चॉकलेट होते, त्यातले काही मी त्या मुलांना दिले, आणि एक छोटासा मुलगा, ४-५ वर्षांचा असेल जेमतेम, तो माझ्याकडे पाठ करून बसला होता. त्यानी चॉकलेट घ्यावं म्हणून मी त्याला आवाज दिला. त्याच्या अंगावर कपडे आणि डोक्यावर केस नव्हते. ते रुपडं लोभस दिसत होतं.. मी त्याला आवाज दिला तसा तो माझ्याकडे वळला. त्याच्या गळ्यात तुळशी च्या माळेसारख्या पण चकत्या चकत्या च्या माळा होत्या. त्याच्या कपाळावर जखम होती आणि रक्ताचा ओघळ डोळ्यापर्यंत उतरला होता. अर्ध्या रस्त्यात येऊन थांबला, आणि “मुझे नही चाहिये टॉफ़ी, मै टॉफ़ी नही खाता असं म्हणून” म्हणून धावत धावत निघून गेला. त्या वेळी मला आश्चर्य वाटलं, इतका लहान मुलगा, इतकं लागलं असताना रडत कसा नाहीये, हाच विचार मनात आला आणि मुलांना चॉकलेट आवडतं, मग हा नाही का म्हणाला? असं ही वाटलं.मला त्या वेळेला बाकी काही सुचलं नाही. मात्र पुढे गेल्यावर त्या मुलाचे तेजस्वी डोळे, उंच कपाळ, चरचरीत नाक, आणि मुख्य म्हणजे प्रचंड आत्मविश्वास, हे सगळं मला जाणवलं.. त्याच्या डोक्यावरची भली मोठी जखम आणि त्याही अवस्थेत तो अतिशय शांत होता हे ही नंतर लक्षात आलं… नंतर जाणवलं, की कदाचित हे सप्त चिरंजीवांपैकी अश्वत्थामा तर नसतील? मला नक्की माहित नव्हतंच, पण असच वाटलं की अश्वत्थामा च होते. पुढे मी अनेक साधू महात्मे आणि पारिक्रमावासींशी हा प्रसंग शेअर केला असता मला अश्वत्थाम्याचे दर्शन झाले असा निष्कर्ष निघाला. पुढे महेश्वर ला स्वामी हृदय गिरी महाराज, आणि परिक्रमेनंतर श्री सतीश चूरी (नर्मदा परिक्रमावासी, लेखक आणि अभ्यासक) यांना ही विचारले असता त्यांनी स्थळ आणि काळ यांचा संदर्भ देऊन त्या काळात आणि साधारण त्या वेळेला व त्या पट्ट्य़ामधे अश्वत्थामा दर्शन देतात असे अनेकांचे अनुभव असल्याचे सांगितले. नर्मदा परिक्रमेत, शूलपाणी च्या झाडीत झालेले हे दर्शन म्हणजे सौभाग्याची परिसीमाच नाही का?
आम्ही निवारा शोधत असताना घडलेला हा प्रसंग, पण त्या वेळी मला मात्र काहीही सुचलं नाही. हे अश्वत्थामा असतील असा विचारही डोक्यात आला नाही, आणि असंच नर्मदा माईनी दर्शन दिलं तेव्हाही झालं होतं.इतकच काय तर अगदी पहिल्या दिवशी शंकर महारांजांनी दर्शन दिलं त्या ही वेळेला असच. ह्या शक्तींच्या प्रभावामुळे असेल पण आपल्या मनावर आणि बुद्धीवर परिणाम होतोच. कदाचित ह्यांच्या तेजामुळे त्या झाकोळून आणि दिपून जात असतील.
एव्हाना निवारा शोधायला गेलेला मयुरेश दादा कुठेच दिसत नव्हता. मी आणि पसारकर काकू बरच अंतर पुढे चालून आलो तरी त्याचा काही अतापता नव्हता, आता दोन रस्ते होते, कुणी कडे जायचं? आम्ही ठरलेली किल्ली वापरली आणि मोठ्या मोठ्याने नर्मदे हर चा गजर सुरु केला, आणि खूप दुरून, खोलातून आल्यासारखं मयुरेश दादा चं नर्मदे हर ऐकू आलं. आम्ही त्या दिशेनी गेलो तर रस्त्याच्या कडेला पाय-या उतरून खोल वर एक घर होतं. त्यांच्या शेतातून पुढे गेलं की एक मंदिर होतं, त्या मंदिरात तो थांबला होता. एक व-हांडा, आणि चार खांब असच ते मंदिर, पण डोक्यावर छत मिळालं होतं आणि जेवणही मिळणार होतं. आजची रात्र चांगली जाणार होती… उद्या आम्ही वडफ़ळी आणि तिथून पुढे जाणार होतो. वडफ़ळिच्या मुक्कामात मला खूप आनंददायक असं काहितरी मिळालं आणि सोबत पुन्हा काही संकेत. मनाचा काही आजारी भाग काढून फ़ेकायची संधी ही मिळाली, आणि काही अनुभव..आपल्या सोबत सतत मैया आहे हे माहीत असणं वेगळं, आणि तिची विनवणी केल्यावर दर दहा मिनीटांनी “मी आहे सोबत” याची त्या माऊलीने प्रचिती देणं वेगळं…ते ही घनदाट जंगलात..मी अगदी एकटी असताना…. आणि अक्षरश: दर दहा मिनीटाने…२०किमी च्या अंतरात…पण ते आता पुढच्या भागात सांगते….
©सुरूची नाईक:विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार-9309926559.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply