नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇२१👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇२१.👇

मागच्या भागानंतर या वेळी वाचकांची उत्कंठा शिगेला लावणार नाही, पट्कन अनुभव सांगेन. तर हा रस्ता अतिशय कठीण, मात्र खारा भादल आणि भादल आणि खापरमाळ ही चढाई तर भमाना हा उतार. बाकीच्यांनी पोर्टर घेतल्यानंतर ती मंड्ळी सोबत सोबत चालू लागली आणि मी नकळत थोडी पुढे गेली. मयूरेश जी माझ्याहून पुढे निघून गेले होते. हे अंतर कसं वाढलं काही समजलं नाही. एका ठिकाणी अशी वेळ आली की समोर गेलेले मयूरेश जी पण दिसेनासे झाले आणि मागे असलेले बाकीचे लोक आणि पोर्टर्स पण दूर दूर वर दिसेना.पण मी चालत राहिले.! 

हा रस्ता कसा आहे ते आता सांगते. मी जे काही सांगते आहे यात यत्किंचीतही वाढ्वून सांगत नाही, जसे आहे तसे सांगण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र रस्त्याचा अंदाज वाचकांना येण्यासाठी सविस्तर वर्णन करते. तर ही चढाई, आणि रस्ता जेम तेम दीड फ़ुटाचा. एका बाजूला पर्वत तर दुस-या बाजूला खोल खाली नर्मदा माई. या रस्त्यावर सगळी कडे मुरुमाची खडी पसरलेली, आधार म्हणून धरायला काहीही नाही. नाही म्हणायला बाभळीची झाडी आहे पण काटे असल्याने ती फ़ार पकडता येत नाही, आणि आता झाडीही“ झाडी” म्हणावी अशी रहिलेली नाहीये,बरीच विरळ झाली आहे.!

तुमचा पाय घसरला तर तुम्ही खाली नर्मदा माईत पडाल असाच काहिसा हा मार्ग आणि पाय घसरण्याचा चान्स भरपूर.म्हणजे एक पाऊल पक्क रोवायचं आणि मग दुसरं उचलायचं..तेही पहिले रोवलेलं पाऊल पक्क असेल तर,आणि तसं झालं नाही तर घसरू शकतो आपण…असा हा रस्ता, आणि चढाईचा एन्गल ही भरपूर असावा, अगदी खडी चढाई होती.!

तर मागची मंडळी मागे, पुढची मंडळी पुढे… मी मधे. प्रत्येक पाऊल टाकलं की नाना महाराज आणि मैया यांचा धावा सुरू. आणि असं असताना एका ठीकाणी ही दीड फ़ुटाची वाट सुद्धा खचलेली, साधारण पुढचे अडिच तीन फ़ूट रस्ताच नाही.टांग टाकून जाणे तेच काय करावं लागणार होतं, आणि अशा ठिकाणी पाय घसरला तर? तर मी खाली पडणार होते, इतक्या खाली की तिथे पडल्यावर माझा मृतदेह ही सापड्णार नाही, कुणी शोधूच शकणार नाही. मी जरा वेळ वाट बघितली, मागचे लोक येतील, त्या पोर्टर्स चा आधार घेऊ आणि जाऊ. जवळ जवळ पाऊण तास झाला तरी कुणी येईना…मी वाट तर चुकली नाही न असा संशय पण आला...फ़ोन करावा कुणाला म्हणून फ़ोन काढला तर नेटवर्क नाही.! 

आता मात्र मी खूप घाबरले होते..नाही नाही, मृत्यूला नाही, तो एक ना एक दिवस येणारच आहे. माणूस घाबरतो ते आपल्या माणसांच्या भावनांना. मला माझा मुलगा डोळ्यासमोर दिसू लागला. मी मेले तर त्याला निदान ते समजण तरी आवश्यक आहे न? आई परिक्रमेला गेली आणि परत आलीच नाही तर तो आयुष्यभर माझी वाट बघत बसेल… त्याची इश्वरावरची श्रद्धा ..त्याचं काय होईल? हे सगळे विचार त्या वेळी मनात आले.

अर्थात मैया असं होऊ देणार नाही हा विश्वासही होताच, पण तरीही समोर मृत्यू असताना इतकं शांत आणि विचारी राहता यावं येवढी मी परिपक्व नाही हे मला माहित होतं. मी इथे जंगलात थांबू ही शकत नव्हते आणि पुढे जाऊ ही शकत नव्हते. मी रस्ता चुकलेले असेन तर वाट बघण्यात अर्थच नाही आणि पुढे जायचे तर आता उडी मारून जाण्याशीवाय पर्याय नाही. मी माझे जोडे काढले आणि त्या रस्ता खचल्या च्या पुढच्या रस्त्यावर फ़ेकले, म्हणजे अडिच फ़ुट पुढे… ते तिथे पोचले, वाटलं चला, आता मी पडले तरी मागून येणा-यांना समजेल. मग मी बॅग ही फ़ेकली.! 

ती ही गेली….मग मला जरा हायसं वाटलं, की आता तर नक्कीच माझा शोध घेतल्या जाईल. आणि मग सगळ्यांचे चेहेरे आठवून, मैयाचा धावा करून, मुठी बंद करून, डोळे मिटून मी उडी मारलीच… दुस-या क्षणाला मी त्या गॅप च्या पलिकडे आणि सुखरुप पोहचले होते. मी जीवंत होते. माझ्या अंगाला काही लागलय का हे मी चाचपडून बघू लागले, आणि ज्या वेळेला मी माझ्या दंडाला हात लावून चाचपडत होते त्या वेळेला मला तिथे काय जाणवलं माहितिये? लहान मुलाला बखोटीला पकडून आई कशी ओअढते न? तसं माझ्या दोन्ही दंडांना कुणीतरी धरलं होतं.!

तो स्पर्श मला जाणवत होता.. एकिकडे माझी गुरुमाऊली आणि दुसरी कडे माझी मैया असं मला धरून ती उडी पार करवून घेतली होती.. अजूनही रस्ता कठीणच होता पण मला आता धीर आला होता.. मी झपाझप पुढे पाऊलं टाकत होती आणि मन मात्र व्यक्त व्हायला धडपडत होतं.थोडा वेळ चालून झाल्यावर एक मोकळं आणि सुरक्षीत असं छोटंसं चौकोनी आकाराचं मैदाना सारखं लागलं. मी तिथे बसले आणी ढसढसा रडले.. फ़ोन बाहेर काढला..फ़ुल नेटवर्क होतं फ़ोन ला..बाबासाहेबांना (माझ्या गुरुंचे नातू, पण गुरुंसारखेच) फ़ोन लावला.. मी एकही अक्षर बोलू शकले नाही.. मी फ़क्त “ मी सुरुचि” इतकं बोलून रडू लागले. त्यावर बाबासाहेब म्हणतात “तू रडू नकोस, आजच सकाळी नाना महारांजाना पुन्हा एकदा सांगीतलय. लेकरू परिक्रमेला जातय, लक्ष असू द्या, हे बघ तू सुरक्षीत आहेस.. काळजी करू नकोस, शांत झालीस की फ़ोन कर”…हे असं होणार हे त्यांना महित होतं!

हा अनुभव इथेच संपत नाही.. हे तर गुरुंनी दिलेलं सांत्वन! मैया चं येणं अजून बाकी आहे! याच भागात सांगते.. तर तो फ़ोन झाल्यावर मी अजून पुढे गेले. आता रस्ता जरा मोठा ही होता आणि सुरक्षीत ही होता. घसरून पडण्याची भिती नव्हती.मी या चौकोनी मैदानावर तासभर तरी बसले असेन. मी पुढे निघाले आणि जरा वर चढून अजून एक मैदाना सारखे लागले तिथे बसले. हे अंतर चालून यायला मला अर्धा तास तरी लागला असावा. तिथे मी बसते न बसते तोच एक पस्तीशी ची बाई भला मोठा हंडा घेऊन आली… मला म्हणाली “ हो गया रोना ढोना? अब जल पियेगी?

एक घंटेसे तेरे लिये यहा बैठी हूं, कितने धीरे चलती हो मैया…” ती बाई तिथे एक तासापासून मला पाणी पाजायला थांबलेली. मी पाणी प्यायली.. बोलता बोलता मी तिला विचारलं “ मैया कहासे पानी लाती हो?” ती ही शांतपणे आणि सहजतेने म्हणाली “ ये नरबदा जी से”… मग मी तिला रस्ता विचारला, तिनी सांगीतला..आणि मी पुढे चालू लागले… मी पुढे गेल्यावर माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला तो असा.. मी रडतेय हे तिला कसं माहित? ती नरबदा जी हून पानी आणते म्हणाली, थोड्या वेळापूर्वी मी नर्मदा माई इतकी खोल पाहिली होती की तीत पडून केवळ मोक्षच शक्य होता! मग ही कसं पाणी आणते इतक्या खालून? मला मैयानी दर्शन दिलं होतं…साक्षात…मला तिच्या हातांनी त्या माईनी पानी पाजलं आणि मला समजलं पण नाही…

माझे गुरू आणी माझी माय माझ्यासोबत आहे याची खात्री पटली, पण मी मूर्ख, तिच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार सुद्धा केला नाही मी… पुन्हा एकदा रडू आलं… पण इलाज नव्हता…हे असं होतं…त्या शक्तीचा प्रभाव इतका जास्त असतो आपली मंद बुद्धी दीपून जात असली पाहिजे.. आपल्याला काहिही समजत नाही.. असाच प्रकारचा अनुभव पुढेही आला मला, धारेश्वर च्या पुढे…तेव्हाही ही माईला ओळ्खू शकले नाही, पण तो अनुभव धारेश्वर च्या भागात सांगते. आता इथून पुढे शांतीलाल पावराचं घर आणि तिथला अनुभव ही सांगते.. पण पुढच्या भागात. हे अनुभव लिहिताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो आहे… मला माझ्या आईची आठवण येते आहे, मला माझ्या चुकांची लाज वाटते आहे, आणि हे सर्व सोडून माझ्या आईच्या कुशीत शांतपणे जगावंसं वाटतय…आणि प्रत्येक वेळा हा अनुभव आला की ही ओढ प्रकर्षाने जाणवते. हा अनुभव तुम्ही वाचत असताना कदाचित मी माझ्या माईच्या कुशीत असेनही..मैया जाणे… पुढचं पुढे बघून… तोवर थांबते…

पण शांतीलाल पावराच्या छोट्याश्या घरी त्याच्या घरचे ८ आणि आम्ही ११ लोक कसे राहिलो? अठरा विश्व दारिद्र्य कसं पाहिलं आणि त्या दारिद्र्यात राहणारा श्रीमंत माणूस आम्हाला कसा काय भेटला, शिवाय या वेळी मैयाने काय चमत्कार दाखवला,हे पुढच्या भागात सांगते.
नर्मदे हर.
©सुरूची नाईक:विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार:9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*