नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२०👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२०.👇
तर मागच्या भागात मी माझ्या शिल्लक न राहण्याबद्दल बोलत होते. तो अनुभव सांगतेच मात्र त्या आधीही काही झालं, ते आधी सांगते. तर हीरालाल भाईंकडून पुढचा प्रवास अतिशय खडतर असा प्रवास आहे. त्यामुळे तिथे आजकाल लोक पोर्टर करतात. उद्देश असा की ही गावातली मंडळी आजकाल लूटमार करत नाहीत. ती पोर्टर ची कामं करतात. तर एका दगडात दोन पक्षी मारण्याचं हे काम, म्हणजे परिक्रमावासींना वजन उचलून जड खडतर वाटेवर चालावं लागत नाही आणि या मंडळींना पण मदत होते.
हा आमुलाग्र बदल झाला एका संताच्या कार्याने. इथे लखनगिरी बाबा म्हणून एक संत होऊन गेले. मामा लोक लूटमार करू नये यासाठी त्यांनी फ़ार कष्ट घेतलेत. असं म्हणतात की ते एक परिक्रमावासी होते आणि त्यांना देखील या मामा लोकांनी लुटून घेतलं. त्यानंतर त्यानी पुढे परिक्रमा केलीच नाही, इथेच राहून ते गावक-यांना समजवू शिकवू लागले व परिक्रमावासींची सेवा ही करू लागले. घोंगसा इथे त्यांचा आश्रम आहे. आता लखनगिरी बाबा नाहीत मात्र लूट्पाट आता बंद झाली आहे.तर इथे आमच्या सोबतच्या परिक्रमावासींनी पोर्टर केले, मला देखील इच्छा झाली, मात्र त्या क्षणी माझ्या कानात कुणीतरी बोललं “हे काय करतेयेस तू? हे वजन म्हणजे फ़क्त सामानाचं वजन नाहीये, हे तुझ्या कर्माचं ओझं आहे आणि तू असं दुस-या कुणाला देऊ शकत नाहीस”. मी दचकून आजुबाजूला पाहिलं. तिथे कुणीही नव्हतं पण मी हा आवाज ऐकला होता! आता मी पोर्टर करणं अशक्य होतं आणि म्हणून मी काही पोर्टर केला नाही. ती कठीण वाट मी बॅग घेऊनच पूर्ण केली.
घोंगस्याला लखनगिरी महारांजाच्या आश्रमात आलो तेव्हा समजलं, लूट्मार होणारा भाग आता संपला आहे. त्या अश्रमात आसन अशा ठिकाणी लावलं की डोळे उघडले की मैया दिसेल. इथेच याच आश्रमात आम्हाला एकदंत महाराज भेटलेत. एकदंत हे आम्ही ठेवलेलं नाव, ते कोण काय काही माहित नाही. पण अतिशय अवलिया माणूस.. स्वत: मध्ये मग्न असणारा..इतका मग्न की त्याला कुणाच्या अस्तित्वाची कधी काळजी ही वाटली नाही आणी कधी गरजही नाही. उंचपुरा, डोक्याला पागोटं,तोंडात फ़क्त एकच दात (म्हणून आमच्या पैकी एकानं त्यांचं नाव एकदंत ठेवलं), पांढरं धोतर आणि एक झोळी इतकच सामान. कुणी काही दिलं तर खायचं नाही तर कुठून तरी आपली व्यवस्था करून घ्यायची..काळजी नाही… एकदा त्यांना रस्त्यात एक बकरी दिसली, त्यांना भूक लागली असावी. त्यांनी त्या बकरीला पकडलं, दूध काढलं आणि सोडून दिलं..दुध पिऊन घेतलं आणि झोपून गेले..असा हा माणूस!
तर हे एकदंत महाराज त्या दिवशी आमच्या बरोबर होते. हे गांजा पीत असत. त्या दिवशी त्यांनी स्वत:च भोजन प्रसादी च शिजवून घेतलं आणि ते लवकर झोपले. आम्हाला झोपायला साधारण ९ तरी वाजले असतील. आमची जेम तेम पहिली झोप झाली असेल नसेल तो आम्हाला वेगळ्या भजनांचा आवाज ऐकू येऊ लागला. आमची पूर्ण झोपमोड झाली.. आम्ही बाहेर जाऊन बघतो तर या एकदंत महाराजांनी ब-याच काट्क्या गोळा करून आणल्या होत्या, त्यांची शेकोटी पेटवली होती आणि हात शेकत हा माणूस भजन गाण्यात मग्न होता. ते भजन गायचं थांबवणार नाहीत हे त्यांच्या हावभावावरून आणि एकदंरीत मग्नतेवरून स्पष्ट जाणवत होतं. आत जाऊन पुन्हा झोप लागणं अशा आवाजात शक्य नव्हतं.. मग काय आम्ही ही त्या भजनांना साथ देऊ लागलो.. करता करता ५ -६ लोक जमलीत आणि रात्री, मैया किनारी, थंडीत, शेकोटीची मजा घेत घेत भजन संध्या पार पडली.. सकाळी ४ वाजता एकदंत महाराज आंघोळी ला गेले, आणि आपलं पूजा अर्चा निपटून पुढच्या प्रवासाला गेले सुद्धा… कसलीही भीती नाही, काळजी नाही की काही काही नाही..ख-या अर्थाने विरक्ती ला पोहचून भक्तीत मग्न असलेली ही मंडळी, साधू संतच नाही का? तर अश्या प्रकारे एकदंत महारांजाचं दर्शन झालं…पुढेही अधून मधून होत राहिलं.
आता सांगते तो शिल्लक न राहण्याचा अनुभव. रस्ता खडतर होताच. माझे पाय फ़ार घसरत होते. कारणही तसच आहे, इथे या सगळ्या भागात मुरूम आहे, छोटे छोटे गोल गोल दगड ज्याला हिंदीत कंकड असं म्हणतात ते सगळीकडेच पसरलेले, त्यामुळे पाय घसरून कितीदा तरी पडायला होत असे. अशात मी तीनदा पडले आणि दोनदा वाचले. जेव्हा जेव्हा मी पडले तेव्हा तेव्हा मला खरचटलं सुद्धा नाही, आणि त्यात काही विषेश असेल असा विचारही माझ्या मनात आला नाही मात्र ते नंतर जाणवलं की आपण पडून आपल्याला नं लागणं हा काही सर्व साधारण अनुभव नव्हताच. झालं असं की मी जेव्हा जेव्हा पडले तेव्हा तेव्हा माझ्या अंगाला जेवढी धूळ लागली असेल तेवढच काय ते लागणं…लक्षात येतेय का? धूळ लागली माझ्या अंगाला, दगड नाही.. मी ज्या ज्या वेळेला पडले ते जिथे धूळ असेल आणि दगड नसतील अश्याच ठिकाणी पडले होते!पण नंतर जे झालं ते विलक्षण होतं. एका ठिकाणी थोडासा उतार होता आणि माझा पाय घसरला… खाली चांगली मोठाली दगडं च होती, आणि आता मी पडणार होते, माझं डोकं खाली सुळकेदार दगडावर लागून फ़ुटेल असं माझ्या मागून चालणा-या स्मीताला लक्षात आलं आणि ती कानावर हात देऊन बघत राहीली…हा क्षण होता फ़क्त… समोरचा माणूस आता पडेल हे दिसत असतं पण आपण काही करू शकत नसतो तो क्षण … मी कमरे पासून पूर्ण आडवी झाले आणि आता बस… आदळणार…इतक्यात माझ्या कमरेखाली कुणीतरी आधार दिला आणि स्प्रिंग ची बाहुली कशी झपाट्याने वर येते तशी मी आडव्याची उभी झाले! मला तर तो स्पर्श ही आठवतो, अगदी अजूनही, पण कदाचित माझा भ्रम असं म्हंटलं तरी स्मीताने जे पाहिलं त्याचं काय? ती म्हणाली, “ अग? अशी पडता पडता कशी काय तु अचानक वर झाली?” आम्हा दोघिंनाही त्या क्षणी बावचळल्या सारखं झालं मात्र लगेच अंगावर काटा आला… त्या क्षणी माझं डोकं फ़ुटेल इतका टोकदार दगड माझी वाट बघत होता… काळ आला होता, पण वेळ आली नव्हती कदाचित! माझी परिक्रमा अजून शिल्लक होती, म्हणून असेल! अन्यथा हा अनुभव लिहायला मी शिल्लक नसते हे नक्की!

खरं तर इथे अजून एक गोष्ट झाली होती.हे डोंगर चढण्याच्या आधी माझ्या मनात अहंकार आला होता. मी आधी हिमालयन ट्रेक केले आहेत, तोच विचार माझ्या मनात आला.” आपण तर ट्रेक केलेयेत, ते ही उंच उंच, हिमालयन, हे पर्वत काही इतके उंच नसतील, जमेल आपल्याला” असा विचार माझ्या मनात आला होता. तसं पाहता आत्मविश्वास असणं वेगळं आणि अहंकार असणं वेगळं. मला अहंकारच झाला होता… आणि मैया परिक्रमा करताना आपण आपल्या स्वत:बद्दल विचार न करता मैयावर सोपवून द्यायचं असतं.. मी ते न करता.“आपल्याला कठीण जाणार नाही” असा विचार केला.!

अभिमानी का मान हटाती,देती जीवन दान,
मैया अमरकंट वाली,तू है भोली भाली…. ह्या मैया भजनाची आठवण आली आणि समजलं ती कनवाळू असली अहंकारा सारखा रोग ती आपल्याला लागू द्यायची नाही आणि लागलाच तर त्याची शिक्षा म्हणजे त्याचं हरण केल्याशिवाय ती तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही.

पुढचा रस्ता याहूनही फ़ार फ़ार कठीण होता. पण मार्ग जितका कठीण तेवढा देव जास्त आठवतो ना… तसं असेल,प्रत्येक पावलावर जप करणं कसं असतं ते ह्या पुढच्या प्रवासात समजत होतं. खारा भादल, भादल खापरमाळ आणि भमाना हे तर अतिशय कठीण. आणि अशा कठीन प्रसंगी जे अनुभव येतात त्यांची तीव्रता आणि त्यांचा गोडवा दोन्ही खूप खूप अद्भूत असतात हे नक्की.

या शूलपाणीच्या झाडीत मैयाचं आणी सप्त चिरंजीवांचं दर्शन होतं असं म्हणतात असं मी मागच्या अनुभवात म्हंटलं आहे. मी आता तो अनुभव सांगेन मात्र खरोखरीच ते मैया दर्शन होतं का ते तुम्ही मला सांगायचय! हो म्हणजे मी फ़क्त अनुभव सांगणार आहे.. अंगावर काटा आणणारा… माझ्या परिक्रमेतला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा असा अनुभव म्हंटला तरी चालेल. उभ्या आयुष्यात हे असे काही अनुभव मी विसरूच शकत नाही असे आहेत. अनुभव जरा मोठाच आहे. याच भागात सांगता यायचा नाही.. तेव्हा पुढच्या भागात सांगते… पण एक नक्की…. हा अनुभव ऐकल्या वाचल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही आणि तुम्हाला नर्मदा माईच्या दर्शनाची इच्छा झाली नाही तर नवल, असं मी म्हणेन!.. सांगतेच,पुढील २१ व्या भागात!

नर्मदे हर…हर हर नर्मदे.

संकलन सुरुचि नाईक:देवा तुझा मी सोनार.-9309926559.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*