नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇१८👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇१८.👇

राजाघाट ला मैया किनारी जाऊन संध्याकाळची आरती करायची होती. नागपूर हून काही मंडळी बस ने आली आहे ते समजलं , त्यांनाही भेट द्यायची होती. मी मैयाकिनारी जायला निघाली. कुणीतरी सांगीतलं होतं हा भाग पण डूब मधे जाणार आहे, इथलं मंदिर खूप छान आहे, त्याचं दर्शन घ्या, कदाचित पुढ्च्या वेळी ते दिसणार नाही. आणि असं सांगितल्यावर फेसबुक वर पाहिलेलं मंदिर मला आठवलं, जे मला आता बघायला मिळणार नव्हतं. मी मंदिरात जायचं पक्क केलं, आणि त्यादिशेने चालू लागले. ज्या क्षणी ते मंदिर माझ्या नजरेच्या ट्प्प्यात आलं त्याक्षणी माझे डोळे पाणावले. हे तेच मंदिर होतं जे पाण्याखाली गेलं असल्याचे फ़ोटॊ मी फ़ेसबुक वर पाहिले होते. राजघाट च्या पलिकडच्या तीरावर चिखलदा म्हणून गाव आहे, तिथून राजघाट ला जोडणारा एक पूल आहे, तो बराच उंच होता, तरीही त्या पुलावर पाण्याची पातळी मागच्या वर्षीपर्यंत गेली असल्याने तो पूलही, आणि ते मंदिर पाण्याखाली गेलं होतं मात्र पाणी ओसरून यावर्षी ते बघण्याची संधी आम्हाला मिळालेली होती. तोच प्रकार चिखल्दाच्या मंदिरा बाबतीतही घडला, जिथे वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी चातुर्मास केला होता. तेही मंदिर डूब मधे होतं आणि अनपेक्षीत पणे दर्शन झालं.

खरं तर हा डूब प्रकार मला अजिबात आवडलेला नाहीये. आपली संस्कृती, आपली देवळं, अनेक लोकांची घरं, अनेकांच भावविश्व जिथे रमलं त्या जागा, आठवणी, आयुष्य सगळं सगळं विस्कटत जाते असे मला वाटते…असो,हा वेगळा भाग झाला. आणि हो चिखल्द्याचे अनुभव पण आपण चिखल्द्यात पोचलो ना, झाडी आणि समुद्र पार करून की मग सांगेन.

तर आता आधी राजघाट चं हे मंदिर! इथली दत्तमूर्ती बघून रडूच आलं..वाटलं आपल्याला दर्शन देण्यासाठीच महाराजांनी आणि मैयानी सोय केली आणि पाण्याखाली गेलेलं मंदिर आपल्याला बघता आलं. शूलपाणेश्वराचं मंदिर मात्र बघता आलं नाही.. त्या ठिकाणी पूर्ण पाणी आहे आणि नवीन मंदिर बांधलेलं आहे दुसरी कडे…. पण ह्या राजघाट्च्या मंदिराचं आणि दत्ताचं दर्शन मात्र झालं….”भेटीलागी माझे मन उतावीळ, कधी मी पाऊले पाहीन डोळा” असं काहीसं मन या मंदिरासाठी विव्हळत होतं, ते फेसबुक वरचे फोटो पहिल्यापासूनच अगदी…. झालं पूर्ण!आता त्या नागपूरच्या मंड्ळींबद्दल सांगते. कधी नागपुरात असताना त्या माऊलींचं दर्शन नाही, ओळख नाही. मी नागपूरची म्हटल्यावर सगळी मंडळी माझ्याभोवती जमा झाली, अर्थात नागपुरात कोण कुठे राहतात याची चौकशी झाली. आणि मग, “तुम्ही आता झाडीत जाणार, काही सामान नागपूरला पाठवायचं असेल तर आमच्या जवळ द्या, तुमचा पत्ता द्या, आम्ही घरपोच करून देऊ” असं आश्वासन दिलं. आमच्या नागपूरची लेक म्हणून मंडळींनी थोडे थोडे एकत्र करून ५०० रुपये दिले. आणि हे मैयासाठी आहे, यातून तुम्हाला लागेल ते खर्च करा असे सांगीतले. निरोप घेताना त्यातल्या एक मध्यमवर्गीय बाईना रडू आलं. “मला पण पायी करायची होती पण तब्ब्येतीमुळे होऊ शकत नाही तेव्हा आता तुम्ही नक्की करा असं त्या म्हणाल्या”…तेव्हा वाटलं, जाणवलं ही संधी मिळणं किती भाग्याचं आहे ते..

राजघाटला आम्ही दोन रात्री होतो. रस्ता कोणता घ्याययचा यावर चर्चा सुरू होती. पाणी कुठवर आहे, येवढ्यात पातळी वाढणार आहे का? कुणाकुणाची तब्ब्येत साथ देणार नाही असे वाटते, वगैरे अनेक गोष्टींवर चर्चा सुरू होत्या. मला लेप्याच्या मांगीलाल चा फोन आला. तो म्हणाला “ दिदी, मेरे जमाई पुलीस मै है और वो पेट्रोलिंग का काम करते है. उन्हे रास्ते की जानकारी है. वो आपसे मिलने आयेंगे, पर थोडा लेट होयेगा” आता संध्याकाळ्चे ८ वाजून गेले होते, आता कधी येणार हा माणूस? म्हंटलं ९ पर्यंत आला तर येईल, नाहीतर उद्याच येईल किंवा रस्त्यात भेटेल कुठेतरी, कारण ९ नंतर, रात्री जंगल रस्त्यातून इतक्या दूर कसं शक्य होणारे त्याला…. तसच झालं, मांगीलाल चा जावई काही ९ पर्यंत आला नाही.

*शभोजन प्रसादी घेऊन आम्ही गाढ झोपी गेलो. आणि रात्री अकरा वाजता मला फोन आला, “ दिदी मै मांगीलाल का जमाई, वो आपसे मिलना था” मी म्हंटलं, कोई बात नही आप कल कहीं मिल लेना, या फोन पे ही बात करना, आपको बहोत दूर से आना पडता होगा, इसलिये नही आये तो भी चलेगा”..तो काय म्हणतो माहितिये? “दिदी मै आश्रम आगया हू, आप बाहर आजाते तो मिलना हो जाता”…बाई ग, रात्री अकरा वाजता हा माणूस मला भेटायला आणि रस्ता समजवऊन द्यायला आला होता. “किधरसे आये” असं विचरल्यावर समजलं, तो २५ किमी गाडी चालवून मला भेटायला आला आणि आता पुन्हा २५ किमी गाडी चालवून परत जाणार,त्याला म्हंटलं मी आज यही रुक जाओ,आसन की व्यवस्था हो जायेगी” तर नाही म्हणाला, मला रस्ता समजवून सांगितला, लिहून दिला आणि जाताना साधारण किलोभर फरसाण सगळ्यांसाठी देऊन गेला…. किती जीव लावतात ही लोक? कसे उपकार फ़ेडायचे यांचे?

अरे हो,एक अनुभव सांगायचा रहिलाच. मागच्या अनुभवात आमचे रस्ते वेगळे झाल्याचं सांगितलं होतं ना, तेव्हाचा अनुभव बरं का! मी आणि सुरेखा ताई वेगळ्या रस्त्याने गेलो आणि बाकी मंडळी वेगळ्या रस्त्याने, आठवतय न? तर त्या वेगळ्या रस्त्यावर बाकी मंडळीना कुणीतरी भोजन प्रसादीला बोलावलं होतं.

आमच्या पसारकर काकू म्हणजे अगदी सालस आणि प्रेमळ बाई. तर त्यांना ज्या घरी जेवायला बोलावलं तिथे त्यांच्या स्वभावामुळे की काय माहित नाही पण ते कुटुंबीय काकुंना आजी म्हणूनच संबोधू लागले..खूप जीव लावला त्यांनी..इतका की १५ किमी अंतर असेल त्यांच्या गावाहून राजघाट, इथे आम्हा सगळ्यांसाठी ते डबा घेऊन आले. वीस-एक लोकांचा डबा, त्यात उपासाचं वेगळं आणि जेवायचं वेगळं, आणि हे सगळं ताजं गरम करून गाडीवर आणलं, जेवण होईस्तोवर ते दोघं बापलेक, म्हणजे मोनिका आणि तिचे बाबा हे थांबले, आणि मग घरी गेले. अहो इतकच नाही,पुढचे ३ दिवस आणि त्यांच्या घरापासून ४० किमी पर्यंत ते आमच्यासाठी डबा आणत राहिले.. कोण हे लोक? काय संबध आमचे त्यांचे? पण नाही…काय संबध असं म्हणून चालायचे नाहीच, कारण त्याशिवाय का कुणी इतकं करतं? आणि ते आमचा आधार! ती आमची अन्नपूर्णा, आणि ती आमची नर्मदा माई… संबध कसा नाही म्हणायचा!

आता शूलपाणीच्या झाडीची तयारी करायची होती. थंडी फ़ार असणार होती. माझ्याजवळ स्लिपिंग बॅग होती खरी पण ती थोडी आतल्या आत गोळा झाली होती, झाडीच्या थंडीत तग धरणार नाही आणि जमीन थंड लागेल हे समजलं होतं, म्हणून एक स्लिपिंग शीट घेणं गरजेचं होतं. इतरांनाही तसं थोडं फ़ार सामान लागणार होतं. पण इथल्या मार्केट मधे सामान मिळालं नाही. आणि आता पुढे कुठ सामान मिळेल हे आम्हाला माहित नव्हतं.

मग फोनाफोनी सुरू झाली आणि कुठून तरी हे सामान इथेच राजघाटला मागवून घेता आलं तर? असा विचार आला. स्मिताच्या मिस्टरांच्या ओळखीतून पुढे ओळख काढत काढत कुणीतरी एकजण सापडला, आणि तो सामान राजघाट पर्यंत आणून द्यायला तयारही झाला.. चला म्हणजे सामान मिळणार, पण गंमत माहितिये का, माझ्याकडे जास्त पैसेच नव्हते!आता याला त्याला मगून मला पैसे द्यावे लागणार होते, पण कुणाकडे किती असतील देवजाणे…मी मैयावर सोडून दिलं!

सामान आलं,गरजेपेक्षा खूप चांगल्या प्रतीचं आणि रिजनेबल रेट मधे सामान आलं होतं. माझ्याकडे पुरेसे पैसे नव्ह्तेच, मी त्याला विचारलं? “आपके अकाउंट मे जमा करवा दू, मेरे पास पैसे नही है, मेरे हस्बंड आपके अकाउंट मे जमा करा देंगे” तो ही हो म्हणाला.

चला काम जमलं खरं, पण असं होत नसतं.माझ्या मिस्टरांचा काही केल्या फोन लागेना.. तो दुकानदार म्हणाला “आरामसे देना दिदी कोई जल्दी नही है”.. त्याचं ठिक आहे हो पण आपलं काम आहे न देणं? हा माणूस आपल्याला ओळ्खत नाही तरीही आपाल्याला “दिदी आरामसे देना” असं म्हणतो, म्हणजे दिदी त्याचे पैसे बुड्वणार नाही हा केवढा विश्वास! पुढे तर झाडी म्हणजे किती दिवस फोन बंद असणारे माहित नाही! काय करावं सुचेना, आणि अशातच माझ्या एका सरांचा मला फोन आला. मी त्याना माझ्या मिस्टरांना निरोप द्यायला सांगितलं आणि ह्या दुकानदाराचा अंकाउंट नंबर पण दिला. आता त्याचा पैसा त्याला मिळेल म्हणून मी निश्चिंत झाले. नंतर ज्यावेळी फ़ोन लागला त्यावेळी मी “पैसे दिले का?” असं विचारलं तर सचिन (माझे मिस्टर) म्हणाले मला निरोप मिळालाच नाही… वाटलं सर विसरले असतील, म्हंटलं या दुकानदाराला सांगते असं असं झालय, मी देते तुझे पैसे, असं म्हणून फोन केला तर त्याचे पैसे त्याला त्याच दिवशी मिळाले होते… माझ्या सरांनी ते दिले होते… त्यांना फोन केला तर “माझ्याकडून काहितरी फ़ुल ना फ़ुलाची पाकळी, म्हणून मीच दिले ते पैसे” असं सरांनी सांगितलं! मला हवं असलेलं सामान असं मैयानी मला कसं दिलं बघा!

शेवटी एकदाच सगळं सामान वगैरे झालं.. आता उद्या निघायचं, बडवानी गणेशपुरा भवती असा मार्ग होता, बडवानी ला न जाण्यापेक्षा आतून पायवाटेने जाऊ वगैरे गोष्टी झाल्या… पण आपण ठरवतो तसं होत नसतं.आता हा प्रवास झाडीतून होणार होता. आम्ही काय होतं आणि काय अनुभव गाठीशी येतात यासाठी आतूर झालो होतो, कारण शूलपाणीची झाडी हे मैयाच हृदयस्थान आहे… तिथे ज्या ज्या अनुभूती येतात त्या खूप प्रभावी आणि अदभूत असतात.. या झाडीत असे खूप अनुभव आले…

परिक्रमेत पहिल्यांदा २२ किमी चालून आम्ही भवती पर्यंत पोचलो, पण हा प्रवास आणि हा मुक्काम ..इथून पुढे पण झाडीचा सगळाच प्रवास आणि मुक्काम कधी अंगावर शहारे आणणारा तर कधी कृतकृत्य करून सोडणारा, आणि कधी आकलना पलिकडचे असेच आहेत.. एक एक अनुभव सांगते,पुढ्च्या भागात.
नर्मदे हर.
©सुरूची नाईक:विदर्भ गट:देवा तुझा मी सोनार.9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*