नर्मदा परिक्रमा–एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇१२👇.

नर्मदा परिक्रमा–एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇१२👇.
नर्मदा माई ही आपली आई आहे आणि ती आपली काळजी घेते हे आता पर्यंत समजलं होतं. पण ती आपली आई आहे म्हणून ती आपल्याला वळण लावू शकते आणि गरज पडल्यास दट्ट्या पण देऊ शकते याची पण खात्री पटली सांगते..

खलघाट ते कठोरा जाताना मी आणि सुरेखा ताई पुढे आणि चित्रा ताई जरा मागे होतो. उसाच्या शेतातून जाणारी वाट होती. शेत जरी असलं तरी १०-१२ फ़ूट उंचीचा उस होता त्यामुळे शेताच्या अलीकडचं आणि पलीकडचं दिसायचं नाही, आवाज मात्र यायचा. दोन शेतांच्या मधे मात्र थोडी जागा किंवा वाट असायची, पण नेमकं कुठे जायचं आहे हे बरेचदा समजायचं नाही. मग वीजेचे टॉवर म्हंजेच आमचा “दीपस्तंभ” असायचा… टॉवर ज्या दिशेला दिसेल तिकडे जायचं…म्हणजे कुठल्यातरी गावात आपण नक्कीच जाऊन पोहोचू… तर असच एकदा आम्ही टॉवर च्या दिशेने जात होतो पण काही केल्या अंतर कापल्या जाईना… बहुधा आम्ही रस्ता चुकलो होतो… तिथे विचारायला कुणीच नव्हतं. जेव्हा कुणी नसतं तेव्हा मैया असतेच…. आम्ही नर्मदे हर च्या आरोळ्या द्यायला सुरवात केली आणि ४ ते ५ हाकानंतर अम्हाला प्रतिसाद आला… “मैया जी सीधे चलते रहो, जब मुडना होगा मै बता दुंगा”. कुणी दिसेच ना.. मग बरोबर चार ते पाच वळणं त्या आवाजानेच आम्हाला लक्षात अणून दिले..आम्ही पुढे गेलो, तरी तो आवाज मात्र व्यवस्थित ऐकू यायचा… म्हणजे दुरून आवाज येतोय असं काही वाटायचं नाही…तो आवाज आमच्या बरोबरीने चालत होता असं वाटू लागलं मात्र शोधायला जावं तर कुठे माणुस नावाच्या प्राण्याचा नामोनिशान ही नाही… मैयाला मनोमन धन्यवाद देत आम्ही पुढे गेलो, आणि गावा जवळ च्या वस्तीत पोहोचलो देखिल…

आता इथे आम्हाला मैया फ़टका देणार होती, पण हे आम्हाला माहितच नव्हतं. झालं असं की या गावा जवळच्या वस्तीत आम्हाला चहा साठी बोलावलं, पण आमची चहा घेण्याची इच्छा नव्हती,म्हणून चहा नको असं आम्ही सांगीतलं. तिथल्या मैयाजींचा आग्रह फ़ार होता… चहा नको म्हणालो तर जेऊनच जा असा आग्रह त्यांनी केलेला.. आमच्या पोटात जिथे चहा ला जागा नाही, तिथे जेवण काय जेवणार.. आम्ही पुन्हा नको असं सांगीतलं. खलघाट ला छान बालभोग झाला होता,त्यामुळे फ़ार भूक नव्हती, जेवणाची वेळ पण झाली नव्हती.. आता २-२.३० वाजता जेऊ, अता काय १० वाजता जेवायचं असा विचार करून आम्ही जेवणाला सुद्धा सपशेल नकार दिला… बिचा-या मैयाजींचं हृदय दुखावल्या गेलं असणार, पण आम्हा पामरांच्या ते लक्षातच आलं नाही…

तर गंमत अशी झाली, आम्ही पाणी पिऊन पुढे निघालो.. आणि बरच अंतर चालत गेलो… हळू थकवा येऊ लागला आणि आता काहीतरी हवं असं वाटू लागलं… म्हणजे चहा असला तरी चालेल…पण या गावात आम्हाला काळं कुत्रं विचारेना. लोक कुतूहलाने बघायचे, पण एकानेही चहा ला असं म्हंटलं नाही… आता जिथे चहाच नाही विचारत कुणी, तर जेवणाचं काय?.. बसला की फ़टका! आम्ही त्या मैयाजींचं मन दुखावलं होतं,त्यांच्या श्रद्धेला मान दिला नव्हता, मैया च्या चहा आणि भोजन प्रसादी ला चक्क नकार दिला होता..आणि आता आम्हाला न चहा मिळत होता नं जेवण..

दुपारचे तीन साडेतीन वाजून गेले तरी काही मिळेल याची शाश्वती दिसत नव्हती. आम्हाला आमची चुक कळली होती. आम्ही तिची मनापासून माफ़ी मागितली,दिलगीरी व्यक्त केली आणि मायच ती, तिचं हृदय द्रवलं… आपल्या उपाशी लेकरांना ती धडा देत होती, पण त्यांना उपाशी बघणं तरी कसं जमेल एका आईला? एका शिवंमंदिरात विसाव्याला थांबलो, तिथे चहा मिळाला.. मन भरून आलं.. तिची माफ़ी मागीतली ततक्षणी ती माऊली पावली होती! पुढे ब्राम्हण गावला जेवण तर मिळालं नाही मात्र सुरेखा ताईचे नातेवाईक भेटायला येणार होते. तिथे हि चमत्कारच घडला… गावात जेवण मिळालं नाही हे जरी खरं असलं तरी ह्या नातेवाईकांनी आमच्या साठी घरून डब्बा आणला होता. त्यात पुरी, कोबी बटात्याची भाजी, घरचं लोणचं, खूप सारी फ़ळं म्हणजे जवळ जवळ २ डझन सफ़रचंद, २ डझन केळी, २ नग अननस, ३..ते ४ नग पपया, आणि भरपूर फ़राळ, ज्यात शेव, चिवडा, नमकीन, उपासाचा चिवडा, हे सगळं तर होतच, शिवाय भरपूर औषधं सुद्धा त्यांनी आणली होती. हे सर्व सामान आम्हाला ८ दिवस पुरेल याही पेक्षा जास्त होतं. मैयानी जितकं रागवलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त कौतुक केलं होतं, माया केली होती…….कानाला खडा लावला आणि त्यनंतर कधी ही कशाला ही नाही, किंवा नको असं म्हंटलं नाही.

परिक्रमा म्हणजे खरोखरीच विलक्षण असं गारुड आहे. इथे कुठल्या क्षणी काय होईल याचा काही नेम नाही. कठो-राचा मुक्काम छानच झाला, दुसर्या दिवशी विश्वनाथ खेडा नावाच्या गावाला मुक्काम करायचा असं आम्ही ठरवलं.. इथे अजून एक धडा मैयानी दिला… तेव्हा म्हणजे त्या वेळी आम्ही खूप घाबरलो होतो, कारण ह्या विश्वनाथ खेडा गावाच्या साधारण ४ किमी आधी एक अतिशय भिती दायक घटना आमच्या सोबत घडली. केवळ चार किमी अंतर असतानाही आम्ही त्या गावात पोहचू शकत नव्हतो…आम्ही कुठल्यातरी वेगळ्याच शक्तीच्या प्रभावाखाली असल्याचं जाणवत होतं मात्र तिथून सुटायला आम्हाला तब्बल तीन तास लागलेत…. ४ किमी अंतर चालायला तीन तास इतकं साधं हे गणीत नव्हतं कारण जे घडलं ते आकलनाच्या पलिकडचं होतं भितीनी आमचं धाबं दणाणलं होतं असं म्हटलं तरी चालेल..अनुभव जरा मोठा आहे म्हणून पुढच्या भागात सांगते …नक्की काय भयानक प्रकार घडला होता ते!

©सुरूची नाईक,देवा तुझा मी सोनार-9309926559

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*