नर्मदा परिक्रमा-एक विलक्षण अनुभूती👇भाग ६👇.
माझ्या नर्मदा माईनी मला आणि माझ्या मनाला जणू सांगितलं, तू फ़क्त प्रयत्न कर, बाकी माझ्यावर सोड…तुला त्रास न होण्याची जवाबदारी माझी!
नर्मदे हर. रावेर खेडी ला जाताना आज पहिल्यांदाच आमचं सतरा कि.मी चालून झालं होतं. अंग शिणून गेलं होतं. संध्यकाळी गारठा ही वाढला. मला जरा तापासारखं ही वाटू लागलं होतं. छानपैकी कढी खिचडी खाऊन झोपून जावं असं वाटत होतं. पण इथे परिक्रमेत असताना “मला कढी खिचडी द्या” असं कसं सांगणार कुणाला? खरं तर जे मिळेल ते माईचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचं आणि तसं करता आलं तरच ते तप.. असं म्हणतात परिक्रमेत तुमच्या कडून तीन प्रकारची तप होतात. कायिक, वाचिक आणि मानसिक. सतरा किमि चालणं हे झालं कायिक तप. हो तपच म्हणेल याला मी कारण ही सुरवात होती. पुढे याहून ही जास्त चालावं लागणार होतं. सवयींच्या विरुद्ध जाऊन स्वत:ला नवीन साचामधे घडवणं हे काही तपा पेक्षा कमी असेल असं वाटत नाही. ऊन, पाऊस, थंडी, जंगल, डोंगर, द-या आणि जे जे येईल ते ते स्वीकारत, त्यानुसार स्वत: ला तयार करत पुढे जात रहाणं ह्याला मानसिक धैर्य आणि निश्चय असावा लागतो. अर्थात नर्मदा माईच हे सगळं करवून घेते, पण तरीही अनेकदा मनोबळ खचेल अशीच अवस्था तयार होत असते.
इथे होतं मानसिक तप. आणि अशा मानसिक आणि शारिरीक तपातून जाताना तुमच्या व्यक्तिमत्वाची सगळ्यात मोठी आणि ठ्ळक पणे आढळून येणारी बाब असते तुमची वाणी. देह, मन आणि वाणी यांच्यावर नियंत्रण आलं की पुढचं सोपं असत असावं, पण हे नियंत्रण च तर कठीण आहे ना….या परिक्रमेत मला माझ्यावर किती नियंत्रण ठेवता आलं ते मला महित नाही, मात्र हे ठेवता येणं आणि ते कसं ठेवता येईल याचा अभ्यास करणं सुखरूप आनंदासाठी नितांत गरजेचं आहे हे मात्र लक्षात येतय! रावेर खेडी ला एक परिक्रमावासी मैया जी ना गाडीतून जावं लागलं होतं. मला दुपारपासूनच तापासारखं होऊ लागलं होतं… आपण आपल्या मनाचे इतके लाड करतो नं की फ़ार हट्टी जिद्दी बाळासारखं होतं ते. माझं मन ही मला त्रास देऊ लागलं होतं …”बरं नाहीये, जाऊ का गाडीनी?”..त्यानी मला दोन तिन दा विचारलं च…पण काय, अशा वेळी त्याला रागवून चालत नाही, त्याला समजवून चालत नाही… त्याला बडबडू देणं आणि त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणं हाच उपाय रामबाण असतो. ती गाडी समोर होती, मैयाजी सोबत होत्या, आणि माझं वेडं मन हट्ट करत होतं…
अचानक काहीतरी झाल्यासारख मी पुढे निघून गेले…गाडी दृष्टीआड होईस्तोवर मनाच्या हट्टाकडे अज्जिबात लक्ष दिलं नाही…. मात्र मग त्याला सांगितलं…गाडी आपल्यासाठी नाहीच… यथाशक्ती संकल्प घेतला की हे असं होतं….तरिही समजवलं मनाला….जेव्हा पाऊल उचलणं अशक्य होईक तेव्हा बघू काय ते…तोवर गाडी चा विचारही तुला शिवता कामा नये. समजलं त्याला ही बहुधा…पण असं हे मानसिक तप सुरू असताना मैया कशी साथ देते बघा… मला तापसारख वाटत होतं, गरम कढी खिचडी खायची इच्छा होती आणि रावेर खेडी ला संध्याकाळच्या भोजन प्रसादी ला गरमा गरम कढी भाताचा मेनू होता…काय म्हणावं या नर्मदा माईच्या प्रेमाला? इथेच अनुभव संपत नाहिये हा… मला रात्री ताप चढलाच… सकाळी ताप वाढला तर कसं चालायचं? इथेच थांबायचं का …असे प्रश्न मनाला पडू लागले….आणि तसच झालं..सकाळी ताप होताच, फ़ार नव्हता, पण एकशे एक तरी असावा! काल मला मनाकडे दुर्लक्ष करायला शिकवलं होतं मैयानी…आज तिनं माझ्या मनाचे लाड पुरवले…नाही नाही, मी गाडीत बसले नाही, तशी वेळच नर्मदा माईनी येऊ दिली नाही.
खरं तर तापात चालणं आणि बॅग उचलून चालणं मला अजिबात शक्य होणार नाही असं मला वाटत होतं….म्हंटलं बघू काय होईल ते..सुरवात तर करू! क्रोसिन घेतली होती… तसा ताप ही उतरला होता…मी बॅग पाठीवर घेतली आणि काय आश्चर्य? माझ्या बॅग ला आज वजनच नसल्या सारखं वाटायला लागलं. माझी बॅग पाठीमागून कुणीतरी उचलून धरळी आहे असं वाटत होत…माझ्या नर्मदा माईनी मला आणि माझ्या मनाला जणू सांगितलं, तू फ़क्त प्रयत्न कर, बाकी माझ्यावर सोड…तुला त्रास न होण्याची जवाबदारी माझी! आणि ती सोबत आहे याची प्रचिती अशी वारंवार देते की हे अनुभव चमत्कार नसून ते नर्मदा मैयाच्या उपस्थितीचीच खूण आहे हे समजू लागतं. अहो कोइन्सिडंस एकदा होईल, दोनदा होईल, तीनदा होईल…सारखे होतात ते खरच कोइंन्सिडंस असतील कसे?
आता एक गम्मत सांगते. मला ताप असल्याने मी सकाळी आंघोळ न करताच निघालेले. बकावा नावाच्या गावी आंघोळ करू असं ठरवलं होतं, पण तिथे महिलांसाठी (मैया किनारी कपडे बदलण्याची) व्यवस्था नाही असं कुणितरी सांगितलं म्हणून मी पुढे निघाले. आता मी आंघोळ करून निघालेले नाही हे मला आणि माझ्या सोबतच्यांनाच माहित होतं. बकावा नंतर मर्दाना नावाचं गाव लागतं. तिथे एका घरात एका मैयाजींनी चहा ला बोलावलं. चहा घेतला..त्या मैयाजी आपणहून म्हणाल्या, “दिदी आपको स्नान करना है तो कर लो, गरम पानी करवा देती हूं”! आता सांगा, म्हणजे कायच म्हणायचं याला? असं कसं तिनी बरोबर विचारलं मला स्नानाचं? हा काही कोइंसिडंस आहे का? पण असं होतं….असच होतं..इथून पुढे भट्ट्यान नावाचं गाव येतं…आम्ही तिथं जाईस्तोवर दूपारचे तीन वाजून गेलेले. लांबच लांब रस्ता..न संपणारा… पण तिथे गेल्यावर जे काही पाहिलं आणि अनुभवलं ते “याचि देही याचि डोळा” अनुभवता आलं हेच भाग्य. संत साधू सत्पुरुष यांचा सहवास आणि यांची किमया काही औरच. आता मी नेमकं कशाबद्दल बोलणार आहे हे समजून घ्यायला थोडी वाट बघावी लागेल…पुढच्या भागाची
संपर्क: सुरुचि नाईक
देवा तुझा मी सोनार
9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply