नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती👇भाग👇 २👇.
प्रत्यक्ष परिक्रमेच्या आधीच जेव्हा आशिर्वचनांची अनुभूती येते त्यावेळी……
परिक्रमा करण्या आधी अनिल दास महाराजांकडून संकल्प करवून घेतला. हा संकल्प केला त्यावेळी मनात खूप घालमेल होती. नर्मदा माईशी डायरेक्ट पण मनातल्या मनात बोलणं पहिल्यांदा सुरू झालं. समोर खळखळून वाहणारी नर्मदा नदी, तिचं जीव घाबरवणारच ते रूप आहे. तिच्या प्रेमाची आणि तिच्या माझ्यावरच्या ममतेची प्रचिती मला जरी आली नसली तरी आई लेकराला काय हवय हे समजून घेण्यात कधीच कमी पडत नाही. तीनी माझ्या मनाची घालमेल ओळखली मला म्हणाली यथाशक्ती परिक्रमा पूर्ण करेन असा संकल्प कर…. ती म्हणाली असच वाटलं मला…जसा एखादा विचार आपला नाही हे आपल्याला अचानक समजतं तसं झालं.. कुणितरी कानात सांगावं तसं वाटलं…परिक्रमा सुरुही झाली नाही आणि आईनी सांगीतलं..तुला जिथे गरज पडेल तिथे माझ्याशी नि:संकोच बोल, मी तुला मार्ग दाखवेन. परिक्रमा सुरु होण्याच्या आधीच मला आलेला हा अनुभव…
खरं तर या ही आधी मला एक अनुभव आला, माझ्या गुरु माऊलीचा.. मी परिक्रमेला जाण्याचा निर्णय घेतला आणि ठरल्याप्रमाणे मी इंदोर ला आले. माझी आत्या इंदोर ला असते तिच्याकडे मी मुक्कामाला होते. माझ्याकडे सगळेच नाना महारांजाचे अनुग्रहीत आहेत, पण अजून माझा अनुग्रह झाला नव्हता. अनेक वर्षांपूर्वी मी अनुग्रह घेणार होते, नाना महाराज ज्या भक्ताना अनुग्रह देणार होते त्या वहीत माझं नाव आणि अनुग्रह घेण्याची तारीख ही नमूद झाली होती, पण पुन्हा तेच….आपण काहीच ठरवत नसतो… नाना महारांजाची तब्येत बिघडली, त्यांनी देह ठेवला, आणि माझा अनुग्रह घ्यायचा राहून गेला. मला खूप वाईट वाटलं होतं… तेव्हा मी १५-१६ वर्षांची असेन. मी ठरवलं, आता अनुग्रह घ्यायचाच नाही. माझे गुरू नानाच…. मला दुस-या कुणाच कडून अनुग्रह घ्यावासाच वाटला नाही… आणि मी घेतला ही नाही. मनात मात्र मी नेहेमीच नानांनाच माझे गुरू समजत राहीले. तर गंम्मत अशी झाली की आत्ता म्हणजे नर्मदा परिक्रमा सुरू करण्याच्या दोन दिवस आधी मला आत्यानी विचारल, “काग?, तुझा मंत्र झालाय नं घेऊन?” आणि मला अचानक मंत्र घ्यावासा वाटू लागला. रात्री साडे अकरा ला मला खूप बेचैनी वाटू लागली आणि गुरुमंत्र हवाच हे प्रकर्षानी जाणवू लागलं. मी माझ्या आत्येभावाला सांगितलं… त्याने सकाळी बाबासाहेब तराणेकर (नानांचे नातू) यांना फ़ोन केला. माझी आधी भेट झाली होती, मी परिक्रमेला जाणार हे सांगून नानांचा आणि बाबा साहेबांचा अशिर्वाद घेऊन आले होतेच पण आता मला गुरुमंत्र हवा होता. बाबासहेबांना परगावी जायचे असतानाही, लेकरू परिक्रमेला जातय म्हणून वेळात वेळ काढून, त्याच दिवशी मला गुरुमंत्र दिला. माझ्या परिक्रमेला निघण्याच्या आधीच माझ्या गुरुंनी मला पंखाखाली घेतलं..
गुरुबळ पाठीशी आणि मैया भोवताली असताना माझी परिक्रमा पूर्ण आणि सुकर कशी होणार नाही?
परिक्रमा सुरु झाल्या झाल्या अनेकांच्या पायाला छाले आलेले मी पाहिले, असं म्हणतात या कालावधीत जो काय त्रास होतो ते आपले भोग असतात, आपण कुणाला तरी काही तरी त्रास दिलेला असतो आणि तो अपल्याला परत मिळणार असतो…आपलं देणं झालेलं असतं, आपण घेणं आता बाकी असतं…. तो त्रास सहन करावाच लागतो.. आणि खरोखर सोबत असलेले अनेक परिक्रमावासी वेगवेगळ्या त्रासातून जाताना मी पाहिले. मला काहिही त्रास झाला नाही. पूर्ण परिक्रमेत मला ३ दा ताप चढला, आणि त्या त्या वेळेला मैयाचे अनुभव आले, मात्र शरीराला जखम, दु:ख, पोट खराब होणे, पाय दुखणे, पायाला छाले येणे असा काहीही त्रास मला परिक्रमेत झाला नाही….मला झाला नाही म्हणण्यापेक्षा माझ्या माईनी आणि माझ्या गुरुंनी तो वरचेवर झेलून घेतला..तो माझ्यापर्यंत पोहचूच दिला नाही…आणि हे मी इतक्या खात्रीपूर्वक फ़क्त येवढ्यासाठी सांगू शकते की मी एक अत्यंत सर्वसाधारण व्यक्ती आहे. माझ्या जीवनकालात किंवा गतजन्मांमधे मी अनेक चुका, अनेक पापं नक्कीच केले असणार आहे आणि तरीही मला त्रास झाला नाही कारण तो माझ्या गुरुंनी आणि मैयानी मला होऊ दिला नाही. अनेक पापकर्मांसोबत निस्वार्थ पणानी आणि निष्पाप मनानी एखाद तरी सत्कर्म माझ्या कडून करवून घेतल्या गेलं असलं पाहीजे की या जन्मामधे मला नाना महाराज गुरू म्ह्णून लभले, त्यांचे आशिर्वाद मला मिळाले आणि काहीही त्रास न होता परिक्रमा करण्याचे भाग्य मिळाले आहे. म्हणून सुरवातीला मी जे म्हणाले तेच खरे..ही परिक्रमा मी केलेली नाहीच.
एक महत्वाचा आणि अगदी सुरवातीचा अनुभव मी नमूद करायला विसरले आहे, त्याला कारण पण तसच आहे, ते असं की हा अनुभव मला नागपुरात, म्हणजे परिक्रमा सुरु करण्याच्या महिनाभर आधी आला… आश्चर्य वाटलं नं? सांगते. माझ्या घरापासून कोराडी देवस्थान हे साधारण २५ किलोमीटर आहे. पायी चालण्याचा सराव म्हणून मी इथे पायी जाण्याचं ठरवलं. नुकतेच पांढरे कपडे शिवून घेतले होते. तेही वापरून बघावेत कम्फर्टेबल आहेत की नाही म्हणून त्या दिवशी तेच घातले, दसा-याचा मुहूर्त साधला, आणि निघाले. रस्त्यात कुत्री त्रास देतात म्हणून एक काठी घेतली होती, आणि कमंडलू हातात घेऊन चालण्याचा सराव करावा म्हणून तो ही घेतला होता. पाठीवर १२-१३ किलो ची बॅग पण होतीच. साधारण १५ की. मी अंतर चालून झालं होतं. उन फार होतं. तसे सकाळचे साडे आठ नऊ झाले असतील. एका हॉटेल समोर जरा सावली होती म्हणून तिथे जरा थांबले. तेवढ्यात आतून एक मध्यम वयीन तरुण धावत बाहेर आला “ नर्मदे हर मैया जी, परीक्रमेचा सराव करता आहात का? कार्तिक द्वादशी ला उचला परिक्रमा” असं म्हणतच तो बाहेर आला. मला खूप आश्चर्य वाटलं. इथे नागपुरात मैयाजी म्हणून धावत येऊन मला हा नमस्कार करतो, याला कसं माहित मी परिक्रमा करणार ते? “मैयाजी थंड पाणी प्या, नाश्ता करा” असं म्हणत माझ्या हातातून कमंडलू ओढून घेऊन एव्हाना गरम झालेलं पाणी बदलून ठंडगार पाणी त्यात दिलं सुद्धा. त्याच्याशी छान ओळख झाली. गप्पा झाल्या. त्यांचं नाव अविनाश सोळंकी. ते दुबई ला असतात, आणि नर्मदा खंडात ७ ठिकाणी अन्नछत्र चालवतात. त्यांची सासुरवाडी नागपूर ला म्हणून ते इथे आले होते. हा माणूस मैया चा भक्त आहे. सुट्टी अभावी त्यांची परिक्रमा होऊ शकत नाही याची त्यांना फार खंत आहे आणि काहीतरी सत्कार्य म्हणून ते स्वखर्चाने आणि काही मदतीने हे ७ आणि पुढे येऊ घातलेले ३ अन्नछत्र चालवत आहेत. अविनाशजींनी माझा नंबर लिहून घेतला. दुस-या दिवशी वेळ काढून घरी आले आणि परिक्रमेची पूर्ण माहिती दिली आणि एक पुस्तक मला भेट म्हणून दिलं. संपूर्ण परिक्रमेत जिथे जिथे मला नेटवर्क असेल तिथे तिथे मला यांचा दुबईहून फोन येत. फोन करून हा माणूस मला पुढची माहिती सांगायचा आणि एक मागणी करायचा…”मैयाजी मागच्या फोन नंतर काय अनुभव आले सांगा”. नेटवर्क अभावी बरेचदा फोन होत नसत. अविनाशजींच्या माध्यमातून माई मला सतत सोबत देत होतीच. आता सांगा, कोण कुठले हे अविनाश जी…मला परिक्रमेच्या महिना भर आधी पासून सोबत करत होते, ते अगदी परिक्रमा संपे पर्यंत. माझी परिक्रमा होणे हे खरच सांगा, फक्त माझा निर्णयामुळे साध्य झालंय का? नाही. ह्या लेकराकडून परिक्रमा करवून घ्यावी हा माझ्या माईचा आशीर्वाद आणि माझ्या जन्मदात्यांची आणि पूर्वजांची पुण्याईच आहे. आणि हे जाणवून देणारे शिवाय अविनाशजींच्या मदतीचे अजूनही अनुभव आहेत.
लक्कडकोट ची झाडी, नेमावर हे अनुभव मी विसरू शकत नाही…पण अनुभव सूची मध्ये त्यांचा क्रमांक जरा नंतर आहे, पण त्या आधीचे विलक्षण आणि अविश्वसनीय अनुभव आहेत, ते पुढच्या भागांमध्ये येतीलच.संकल्प घेतल्या गेला, आता परिक्रमेला सुरवात करायची. आम्ही तिघी एकत्र होतो, आणि एकत्र राहू असं वाटत होतं. सौ मंत्री यांना चालण्याचा फ़ारसा सराव नव्हता असं त्या म्हणाल्या त्यामुळे संकल्प घेण्या आधी देखिल मोरटक्का ते ओंकारेश्वर आम्ही पायी चालून गेलो होतो, सराव करण्यासाठी. असं म्हणतात संकल्पात बळ असतं.. आणि हो, ते असतच! ते कसं याचा समजलं याचा अनुभव सांगते. पण त्या आधी एक कबूली नामा मला द्यावासा वाटतो. संकल्प झाला होता, खरं तर आता माझी मैयावर पूर्ण श्रद्धा असायला हवी होती, मनातून तशी इच्छा ही होती, पण कुठली तरी भिती मनात होतीच… ओंकारेश्वर ते मोरट्क्का मैया किनारी जाऊ नका असा सल्ला अनेकांनी दिला. तुमचं वजन जास्त आहे, तुम्हाला झेपणार नाही, वाट कठीण आहे असं ही सांगण्यात आलं…इथे माझ्या मनानी दोन कारणं पुढे केली..१ कठीण असेल, काही झालं तर? परिक्रमा पूर्ण व्हायची नाही आणि दुसरं, सौ मंत्री आणि सौ. डोंगरे या दोघीही त्या मार्गाने जाण्यास तयार नव्हत्या…मी सुद्धा हाय वे नी जायचं ठरवलं… खर तर ती मैयानी माझ्या मनाची घेतलेली परिक्षा असावी, मी त्यात नापास झाले आहे…आणि पुढे आलेल्या अनुभवांनंतर आज मला हे जाणवतय की त्या वेळी मी चूक केली. यथा शक्ती केलेला संकल्प हे माझ्या भित्रा मनाला झाकणारं आवरण ठरलं.. संकल्प कसा असावा असं सांगताना यांनी सांगीतलेली गोष्ट मुद्दाम इथे सांगतेय, आधीच सांगतेय म्हणजे संकल्प हा शब्द जरी आला तरी तो पाळल्या जाईल आणि जी चूक मी केली ती इतरांकडून होणार नाही.
गोष्ट अशी आहे, एक व्यापरी होता, त्यानी ठरवलं, आता यापुढे आपण कुणालाही पैसे द्यायचे नाही, जे काही देणं असेल ते देऊन मोकळं व्हायचं आणि मग पुढे कुणालाही एक पैसा पण द्यायचा नाही. त्यानी ठरल्याप्रमाणे जे काही देणे होते ते पूर्ण केले आणि संकल्प घेतला…पुढे काही दिवसांनी एक सन्यासी त्या व्यापा-याकडे आला, आणि म्हणाला मला तुमच्याकडून १ रुपये घेणे आहे. व्यापा-याने संकल्प घेतलेला, तो म्हणाला मी काहीही झालं तरी पैसे देणार नाही. सन्यासी निघून गेला, काही दिवसांनी परत आला, तेव्हा व्यापा-यानी त्याला दुरून बघितलं, मुलाला सांगितलं, जा बाबा झोपलेत म्हणून सांग… सन्यासाला तसं सांगितल्यावर सन्यासी म्हणाला मी वाट बघतो…पण आज मी माझे पैसे घेऊन च जाईन! बराच वेळ निघून गेला… व्यापा-यानी मुलाला सांगीतलं, जा सांग त्या संन्याशाला, बाबा आजारी आहेत, तुला आता १ रुपया मिळनार नाही. मुलाने व्यापा-याला समजवल, १ रुपया तर आहे, देऊन टाका नं…. व्यापारी आपाल्या मतावर ठाम… मुलाने सांगितलं, बाबा आजारी आहेत… सन्यासी म्हणाला “मी वाट पाहीन” अनेक दिवस निघून गेले, व्यापा-याच्या घरासमोर संन्यासी ठिय्या मारून बसलेला…एक दिवस व्यापारी मुलाला म्हणाला..जा संन्याशाला सांग बाबा वारलेत….मुलाने संन्याशाला तसाच निरोप दिला…. संन्यासी म्हणाला “ अरे रे, माझा रुपया ही गेला आणि व्यापारी ही, आता याचा अंतिम विधी झाल्यावर मी माझ्या गावी परत जाईन” मुलगा घाबरला…त्याने वडिलांना सांगितले…व्यापा-याने मुलाला अंतिम संस्कारांची तयारी करायला सांगितलं…मुलगा बिचारा नाईलाजाने तयारी करू लागला…लोक जमा झाले, व्यापा-याला चितेवर ठेवण्यात आलं, आता मात्र मुलगा घाबरला, आपल्या वडिलांना जिवंतपणीच अग्नी द्यायचा?…त्याचे हात थरथर कापू लागले…वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून तो वडिलांना विनवू लागला..”बाबा अहो एका रुपयासाठी तुम्ही मरण सुद्धा पत्करताय? काय हा मूर्खपणा?.. व्यापरी काही ऐकेच ना..म्हणाला..अग्नी दे, पेटव चिता, पण मी रूपया देणार नाही….मुलाने नाईलाजास्त्व चितेला अग्नी दिला, आणि आता चिता पेटणार तेवढ्यात त्या अग्नी चं रुपांतर फ़ुलांमधे झालं…संन्यासी चितेजवळ गेला आणि साक्षात विष्णू रुपात समोर आला…व्यापा-याला चितेवरून दूर केलं … म्हणाला..संकल्प असावा तर असा….
मी मात्र यथा शक्ती संकल्प केला..म्हणजे कुठेतरी माझा विश्वास माझ्यावर आणि माझ्या मैयावर कमी पडला… ती कनवाळू च आहे, मला त्रास होऊ नये याची काळजी ती घेतेच आहे, पण मी तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून, काही तरी नियम ठेवून संकल्प केला असता तर
तोही तिनी पूर्णत्वाला नेलाच असता…पुन्हा परिक्रमेची संधी मिळाल्यास ही चूक माझ्याकडून होऊ देऊ नको असं मी तिला आताच विनवते.परिक्रमेचे नियम नक्की काय, त्याची कारणं नक्की काय हे खरं तर अजूनही हवं तसं मला समजलेलं नाहीये, पण १००% श्रद्धा हा नियम असायलाच हवा हे नक्की. भिती वाटणे म्हणजे श्रद्धा कमी पडणे च आहे आणि काही वेळेला माझ्याकडून ही चूक झालेली आहे. मात्र काही वेळेला माझ्या नर्मदा माईनी मला अगदी अभयाचं वरदान देखिल दिलं ते कसं ते ही माझ्या अनुभव कथनामध्ये येईलच.
संकल्प करून झाला होता. कार्तिक द्वादशी, १ नोव्हेंबर २०१७ हा दिवस. मी या अनुभव कथनामधे माझी रोजनिशी सांगणार नाहीये कारण ज्याच्या त्याच्या प्रकृती आणि प्रारब्धानुसार परिक्रमा घडत असते. मी इथे मला आलेले अनुभव कथन करणार आहे कारण माझ्या मते ते अनुभव मला मिळणं हेच महत्वाचं होतं.. तर परिक्रमेची वाटचाल प्रत्यक्ष रित्या सुरु होण्या आधीचे अनुभव मी आधीचे अनुभव मी सांगितले, आता अनुभवाला सुरवात करू पुढच्या भागापासून…..नर्मदे हर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Leave a Reply