आज १३ जून-क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांची १४४ वी जयंती🌹🙏🌹 – बडगुजर. इन

आज १३ जून-क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांची १४४ वी जयंती🌹🙏🌹
क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू.त्यांनीच वि. दा.सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन,अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.बाबारावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९ रोजी झाला.लहानपणी त्यांची प्रकृती नाजूक होती. सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना बऱ्याच वेळा विंचूदंश झाले.पुढील क्रांतीकारी आयुष्यात यातना सहन करण्याची शक्‍ती यावी, अशीच ही निसर्गाची योजना असावी. तरुण वयातही त्यांनी स्वत:च्या शरीरास मुद्दामहून खूप कष्ट दिले. कडक थंडीत देखील ते उघड्या अंगाने,पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. बलाढ्य ब्रिटीश साम्राज्या- विरुद्ध क्रांती करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही, तर त्यासाठी प्रबळ आणि कट्टर संघटना आवश्यक आहे, हे बाबारावांनी लहान वयातच हेरले. यासाठी *मित्रमेळा'* या संघटनेची स्थापना करण्यात आली.राष्ट्रगुरु रामदासस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, नाना फडणवीस आदी थोर पुरुषांच्या जयंत्या जाहीर सभा घेऊन साजर्‍या करण्यास त्यांनी सुरुवात केली.त्यामुळे तरुणांत आणि जनतेत देशभक्‍ती जागृत होण्यास खूपच मदत झाली. या निमित्ताने लोकमान्य टिळक,काळ’ या वर्तमानपत्राचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांची देशभक्‍तीने रसरसलेली भाषणे नाशिककरांना ऐकण्याची संधी प्राप्‍त झाली.

वन्दे मातरम् अभियोग: बाबारावांचा (साहेब' हा शब्द फारसी. त्यामुळे साहेब ऐवजीराव’ हा शब्द सावरकरबंधूंनी रूढ केला. जसे बाबाराव, तात्याराव) ब्रिटीश शासनाशी पहिला संघर्ष १९०६ साली उडाला. नाशिकमध्ये जाहीर सभा घेण्यास असलेली बंदी मोडली,या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि १० रुपये दंड करण्यात आला. बाबारावांनी याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्यांचा दंड रद्द झाला. २७ सप्टेंबर १९०६ रोजी दसर्‍यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणार्‍या तरुणांनी वन्दे मातरम्' चा जयघोष केला. तो ऐकून एका पोलिसानेबोंब मारणे बंद करा’, असे म्हणत बाबांच्या अंगावर हात टाकला. मात्र त्या पोलिसावरच पश्चात्तापाची पाळी आली. बाबांसकट सर्वांनीच त्या पोलिसाला ठोकून काढले,या प्रसंगाने संतप्‍त झालेल्या ब्रिटीश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. `वन्दे मातरम् अभियोग’ या नावाने तो गाजला. यात बाबाराव मुख्य आरोपी होते.नाशिक जिल्ह्यात हा अभियोग निरनिराळया ठिकाणी सहा महिने चालला. कारण न्यायाधीश फिरतीवर असत आणि ते असतील तेथे हा अभियोग चालत असे. या अभियोगात बाबारावांना २० रुपये दंड होऊन मोठ्या रकमेचा प्रतिभू (जामीन) मागण्यात आला. अन्य तरुणांनाही अशाच प्रकारच्या शिक्षा झाल्या. बाबाराव नाशिकमध्ये असतांना त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने मूलभूत स्वरूपाच्या अनेक चळवळी सुरू केल्या.स्वदेशी चळवळ, विलायती मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात इत्यादी चळवळींचे सूत्रसंचालन बाबाराव धुरिणत्वाने करत असत.

प्रकाशक बाबाराव: याच सुमारास बाबारावांचे पाठचे बंधू स्वा. वि. दा. सावरकर लंडनमध्ये शिक्षण घेत होते.१९०६ साली स्वा. सावरकरांनी लिहिलेले प्रसिद्ध इटालियन क्रांतीकारक जोसेफ मॅझिनी यांच्या चरित्राचे हस्तलिखित बाबारावांकडे आले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे चरित्र अत्यंत स्फोटक होते. जून १९०७ मध्ये बाबारावांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. दोन महिन्यांतच २ सहदा प्रतींची पहिली आवृत्ती जवळ जवळ संपली. पुस्तकाच्या विषयाबरोबर बाबांचे परिश्रमही याला कारणीभूत होते.या पुस्तकाला स्वा. सावरकरांनी लिहिलेली २६ पृष्ठांची प्रस्तावना त्या वेळी अनेकांनी मुखोद्‌गत केली. यातील ज्वलंत विचारांनी प्रभावित होऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला,लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या आणि हॉलंडमध्ये मुद्रित केलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर'* या ग्रंथाच्या प्रती बाबारावांच्या हाती आल्या.बाबारावांनी या प्रतीही अत्यंत गुप्‍तपणे क्रांतीकारकांपर्यंत पोहोचवल्या.या अद्वितीय ग्रंथामुळे ब्रिटिशांविरुद्ध बंगाल,पंजाब आणि महाराष्ट्रातगदर’ पक्षाची स्थापना होऊ शकली.‘अभिनव भारत’* संघटनेतील युवकांना आपण कोणत्या आगीशी खेळत आहोत,तसेच आपल्या कृत्त्यांना भारतीय दंडविधानात (इंडियन पिनल कोड) कोणत्या शिक्षा सांगितल्या आहेत, हे कळावे म्हणून भारतीय दंडविधानाची एक छोटी आवृत्तीही बाबारावांनी छापून घेतली होती. भावनेच्या आहारी जाऊन नव्हे,तर समजून उमजून तरुणांनी क्रांतीकार्याला हात घालावा, हा उद्देश यामागे होता. लंडनहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हातबाँब तयार करण्याचे तंत्र शिकवणारे कागदपत्र सेनापती बापट यांच्यामार्फत बाबारावांकडे पाठवले. बाबारावांनी हातबाँब तयार करण्याची ही कृती क्रांतीकारकां पर्यंत पोचवली. या कृतीवरूनच खुदिराम बोस यांनी न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्या गाडीवर हिंदुस्थानात सिद्ध झालेला पहिला बाँब टाकला.

एक महिना सश्रम कारावास: या सर्व व्यापांमुळे बाबारावांना अटक करण्याची संधी ब्रिटीश शासन शोधू लागले. ११ जून १९०८ रोजी शिवरामपंत परांजपे यांना पुण्यात अटक करण्यात आली आणि दुसर्‍याच दिवशी मुंबईला आणून त्यांच्यावर अभियोग सुरू करण्यात आला.स्वराज्य चळवळीसंबंधी परांजपे यांच्या ओघवत्या आणि परिणामकारक वक्‍तृत्वाने अनेक तरुण भारले होते. त्यामुळे परांजपे यांच्या अटकेने बाबारावांसहित अनेक तरुण प्रक्षुब्ध झाले. त्यांना काही मदत करावी या हेतूने बाबारावही मुंबईत आले.तेथील न्यायालयासमोर एका खोजा जमातीच्या व्यापार्‍याला पोलीस अधिकारी खूप त्रास देत असलेला बाबारावांनी पाहिला.बाबारावांचे तरुण रक्‍त उसळून आले. त्या व्यापार्‍यास पाठीशी घालून बाबारावांनी त्या पोलीस अधिकार्‍याशी वितंडवाद घालावयास सुरुवात केली. त्यामुळे चिडून पोलिसांनी बाबारावांनाच अटक केली. हे काय प्रकरण चालले आहे हे पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी गायडर बाबारावांकडे आला आणि त्याने त्यांचे नाव विचारले. ‘बाबा सावरकर’ हे नाव ऐकताच गायडरला अत्यानंद झाला.त्याने ताबडतोब बाबारावांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ रशियन क्रांतीसंबंधीचे एक पत्रक सापडले.त्या पत्रकाच्या आधारे बाबारावांना एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ती त्यांनी ठाणे आणि नाशिक येथील कारागृहांत आनंदाने भोगली.

जन्मठेपेची शिक्षा: क्रांतीकारकांच्या अनेक गुप्‍त उद्योगांत बाबाराव सावरकरांचा हात आहे आणि त्यांना त्यांचे मार्गदर्शनही लाभले आहे, हे ब्रिटीश गुप्‍तहेर खात्याने ओळखले होते.१९०९ मध्ये बाबारावांनी कवी गोविंद रचित चार क्रांतीकारी कविता प्रसिद्ध केल्या.त्यांपैकी `रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’या कवितेत प्रतिपादले होते की, गुलामगिरीत खितपत पडलेल्या जगातील कोणत्याही देशाला सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळाले नाही.मग त्याला हिंदुस्थानच कसा अपवाद असेल? या कविता प्रसिद्ध केल्या म्हणून सरकारने बाबारावांना अटक करून जन्मठेपेची अतिशय कठोर शिक्षा दिली.८ जून १९०९ रोजी बाबारावांना शिक्षा होऊन अंदमानात नेण्यात आले. त्या वेळी ते जेमतेम ३० वर्षांचे होते.
अंदमान: अंदमानातील ळ”सेल्युलर जेल”मध्ये असतांना बाबारावांच्या शारीरिक यातनांना पारावार राहिला नाही.धोकादायक क्रांतीकारक म्हणून तेथील तुरुंगाधिकार्‍याने बाबारावांकडून अतिशय कष्टाची कामे करवून घेतली. तरीही बाबारावांच्या मनातील क्रांतीची भावना यत्किंचितही कमी न होता ती अधिकच धारदार झाली.संघटनचातुर्य आणि अन्यायाचा प्रतिकार हे त्यांच्या रोमरोमांत भिनले असल्यामुळे त्यांनी अंदमानातच कारावास भोगत असलेल्या स्वातंत्रवीर सावरकरांच्या साहाय्याने तेथील राजकीय कैद्यांना संघटित केले. चांगली वागणूक आणि अन्न मिळावे म्हणून उपोषण, असहकार,संप आदी मार्गांनी लढा दिला. शपरिणामी त्यांना अधिकाधिक कठोर शारीरिक शिक्षा भोगाव्या लागल्या. परंतु त्याची तमा न बाळगता बाबारावांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले. अंदमानातील ११ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांची प्रकृती पार ढासळली आणि त्यांना क्षयाचा विकार जडला. ते अंदमानात असतांनाच त्यांची पत्‍नी सौ.येसूवहिनींनी या जगाचा निरोप घेतला. त्या दोघांची शेवटची भेटही मुजोर शासनाने होऊ दिली नाही.१९२१ मध्ये बाबारावांना हिंदुस्थानात परत आणण्यात आले आणि साबरमतीच्या कारागृहात ठेवण्यात आले. त्या वेळी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. बाबाराव आता काही तासांचेच सोबती आहेत,असे शासनाच्या डॉक्टरने सांगितले तेव्हाच म्हणजे सप्टेंबर १९२२ मध्ये सरकारने त्यांची सुटका केली.

बाबारावांची ग्रंथसंपदा: बाबारावांनी अनेक पुस्तके लिहिली. वीर बैरागी' या भाई परमानंदलिखित पुस्तकाचे त्यांनी भाषांतर केले. या पुस्तकात बंदा वीराचे चरित्र सांगून हिंदूंना स्फूर्ती द्यावी,सूड कसा उगवावा ते शिकवावे तसेच पंजाबातील शीख आणि मराठे यांचा दुवा जोडावा, हा बाबारावांचा उद्देश होता. या पुस्तकात औरंगजेबाच्या मुसलमानी सत्तेशी वीर बंदा बैराग्याने केलेल्या संघर्षाची कहाणी आहे.राष्ट्रमीमांसा’ या पुस्तकात त्यांनी भारत हे हिंदुराष्ट्र आहे' हे सिद्ध केले आहे. "श्री शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप" या पुस्तकात आग्र्‍याला जाण्यात शिवरायांचा हेतू औरंगजेबाचा वध करण्याचा होता,असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.वीरा-रत्‍नमंजुषा’ या पुस्तकात महाराणी पुष्पवती, राजा दाहिरच्या दोन वीरकन्या,राणी पद्मिनी, पन्नादायी आदी रजपूत स्त्रियांची चरित्रे वर्णिलेली आहेत.
“हिंदुराष्ट्र-पूर्वी,आता नि पुढे”
“धर्म हवा कशाला?”
“ख्रिस्तास् परिचय अर्थात्ख्रिस्ताचे हिंदुत्व ही त्यांची अन्य पुस्तके आहेत.
आयुष्यभर देशहितासाठी प्राणपणाने झटणारा हा वीरात्मा… बाबारावांचे चरित्र म्हणजे राष्ट्रासाठी चंदनाप्रमाणे अखंड झिजलेल्या एका थोर देशभक्‍ताची स्फूर्तीदायी कथा आहे. त्यांना विनम्र अभिवादन.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*