आज ३१ मे-अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती.!
एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान,धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी त्यांचे नाव लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा अहमदनगर) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी ३१ मे १७२५ रोजी झाला.धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते.अहिल्याबाईंनी सासर्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासर्यांचा मोठा विश्वास होता. महत्वाचा पत्रव्यवहार त्या सांभाळत.
खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या.अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्य आले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले.त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे. आपल्या सासर्यांच्या इच्छेचा अहिल्याबाईंनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले.
मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता,१७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खर्या अर्थाने राज्यकर्त्या झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली.बाई काय राज्य कारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणार्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी. शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली. अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे.
आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील,त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात न पाहता त्यांनी तशी कृतीही केली. यशवंतराव फणसे या गुणी,शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला. अहिल्याबाईंचे महेश्वर येथे १३ ऑगस्ट १७९५ रोजी निधन झाले.
एक स्त्री असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समर्थपणे राज्यकारभार करून अहिल्याबाई होळकर यांनी २८ वर्षे इंदूर राज्यकारभाराची धुरा सांभाळली हे विशेष.!
अहिल्याबाई होळकर यांनी केलेली शिवोपासना आणि👇कार्य:
१. शिवाच्या उपासनेतून स्वतःमध्ये चैतन्य निर्माण करून राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळणे – अहिल्याबाई होळकर भगवान शिवाच्या भक्त होत्या. त्या प्रतिदिन शिवाची पूजा करत. शिवाच्या उपासनेतून त्यांनी स्वतःमध्ये चैतन्य निर्माण केले होते.
त्या चैतन्यशक्तीच्या द्वारेच त्यांनी राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळली.
२..सतत शिवाची पिंडी समवेत ठेवणे आणि शिवाला स्मरून कार्य करणे – कोणतेही कार्य यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी चैतन्यशक्तीची आवश्यकता असते. याची जाणीव अहिल्याबाई यांना होती. त्यांचा भगवंताविषयी भाव होता. ‘भगवंताची चित्शक्तीच सतत कार्य करत असते’, हा भाव ठेवूनच त्या सतत शिवाची पिंडी समवेत ठेवत असत. भगवान शिवाला स्मरून त्याच्यातील चैतन्यशक्तीद्वारे त्या कार्य करत. यामुळे त्या करत असलेल्या कार्याला यश मिळत गेले. कार्य करतांना त्यांच्यात कुठेच अहंभाव नव्हता. यावरून ‘भगवंताच्या चैतन्यामध्ये किती शक्ती आहे’, हे लक्षात येते.
३. स्वतःसमवेत सर्वांनी शिवाची उपासना करावी, यासाठी शिवाचे मंदिर बांधणे – स्वतःसमवेतच सर्वांनी चैतन्यशक्तीद्वारे कार्य करावे, शिवाची उपासना करावी, यासाठी त्यांनी शिवाचे मंदिर बांधले. ‘मंदिरातील चैतन्यशक्तीचा लाभ सर्व जनतेला होईल आणि आपोआपच सर्व जनता योग्य आचरण करील’, अशी त्यांची श्रद्धा होती.
४. जुन्या देवळांचा जीर्णोद्धार करणे आणि धर्मशाळा बांधणे – अहिल्याबाई होळकर यांनी अनेक जुन्या देवळांचा जीर्णोद्धार केला. प्रजेच्या सुखसुविधांसाठी त्यांनी नदीकिनारी अनेक घाट बांधले, तसेच अनेक धर्मशाळाही बांधल्या. ‘राज्यातील जनतेचा खर्यान अर्थाने विकास कशामुळे होणार आहे ?’, याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी देवळांचा जीर्णोद्धार आणि धर्मशाळा यांना महत्त्व दिले; कारण त्यातील चैतन्यशक्तीमुळेच लोकांमध्ये जागृती होऊन ते सदाचाराने वागत असत. त्यामुळेच राज्यात शांतता आणि सुव्यवस्था होती अन् प्रजा सुखी होती.
भारताची केविलवाणी सद्यःस्थिती सुधारण्यासाठी सर्व शासनकर्त्यांनी अहिल्याबाई होळकरांचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक!
भारताची अत्यंत केविलवाणी सद्यःस्थिती पाहिल्यास सर्व शासनकर्त्यांनी अहिल्याबाई होळकरांचा आदर्श समोर ठेवणे आवश्यक आहे; कारण आतंकवादी आक्रमण, नक्षलवाद, भ्रष्टाचार, शेतकर्यां च्या समस्या,पर्यावरणातील प्रदूषण इत्यादी अनेक समस्यांमुळे मनुष्याला जिवंत रहाणेही कठीण झालेले आहे. या सर्व समस्यांसाठी कुणाकडे काहीच उपाययोजना नाही. यावर चैतन्यशक्तीला जागृत करणे, हा एकच उपाय आहे; कारण या स्थितीला सावरण्याचे सामर्थ्य केवळ चैतन्यशक्तीत आहे, जी शाश्वआत, चैतन्यमय आणि आनंदमय आहे. यासाठी प्रत्येकाने भगवंताला शरण जाऊन भगवंताची उपासना करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे अहिल्याबाईंना भारतभर अनेक मंदिरं बांधळी. द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक यांसारख्या तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधल्या. प्रजेच्या रक्षणासाठी सतत तत्पर असलेल्या अहिल्याबाई अत्यंत न्यायप्रिय होत्या. उचित न्यायदानासाठी त्यांना ओळखले जात होते. तसंच दानशूरता, उदारता, दया, करुण आणि परोपकार हे त्यांचे अजून काही खास गुण.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनातील रोचक गोष्टी…
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट म्हटले आहे. याशिवाय इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून अहिल्याबाई यांची ओळख आहे.
इतिहासाने पानोपानी,
जिची गायिली गाथा…
होळकरांची तेजस्वी ती,
पुण्यश्लोक माता..!
अहिल्या मातेने आपल्या कर्तृत्वाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवला आहे.
भारताच्या संसद भवनात अहिल्यामातेच्या फोटोला वंदन करून कामकाज चालू होते. युनोमध्ये अहिल्याबाईंच्या नावे अभ्यास केंद्र चालते. जर्मनी, फ्रान्समध्ये अहिल्याईंच्या विषयावर पीएचडी होते. लोकशाहीत राजकारण हा अविभाज्य असा महत्त्वपूर्ण घटक आहे. राजकारणात कुणी यावे? राजकारण कसे करावे? का करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आदर्श मातृत्व, कर्तृत्व, आणि नेतृत्व यांचा संगम असलेल्या राष्ट्रमातेजवळ मिळतात. अहिल्यामाईचा विचार घेऊन क्रांतीची ज्योत पेटवू आणि या अंधारलेल्या समाजाला लख्ख प्रकाश देण्याचे कार्य होईल अशी अपेक्षा बाळगू. लोककल्याणकारी राज्य कारभार करून आदर्श राज्याची संकल्पना साकार करणार्या आणि दुःखाच्या अविरत प्रवाहातही सतत लोकहिताचा आविष्कार करणार्या…
राष्ट्रमाता अहिल्यामाई यांच्यातील आदिम स्त्रीशक्तीला शत् शत् नमन.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Leave a Reply