आज २८ मे-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती.🌹
*कर्यकाळ: २८ मे १८८३ ते २६फेब्रुवारी १९६६)
वीर सावरकर हे महान स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण,स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी,विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे महान क्रांतिकारक.
समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते…
प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार,शिक्षक,चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला,त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यां पैकी हे दुसरे होते. वि. दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते.
सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसू वहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ. स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले.ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते.वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते.जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत.त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.
मार्च-१९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले.लग्नानंतर,१९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व१९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरानी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली.मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती.ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत.जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये,१९०५ साली विदेशी कापडाची होळी केली.श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले.ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती.लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले.ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.
‘इंडिया हाउस’ लंडनमधे अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले.मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य..!मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली,त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली.त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला.’अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर’ हा तो ग्रंथ होय.हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय.
हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले.ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे -अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.
ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली.समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. (सन १९१०) ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला,पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही,आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले.त्यांच्यावर खटला भरण्यात आला.त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली.(सन १९११)मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता.दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता.
फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता.पण तसे घडले नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले व हवे तसेप छळले.खड्या बेडीत टांगले.तेलाच्या घाण्याला जुंपले.नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते,मातृभूचे स्वातंत्र्य,तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते.बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.ब्रिटिशांची बदललेली नीती,मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता.आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत.पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल,रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.
अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन,असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात.पहिल्या भागात आक्रमक,क्रांतिकारी सावरकर,क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर,धगधगते लेखन करणारे सावरकर.
त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर,समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर,विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.
अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले.(जानेवारी,१९२४.)
१. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले.हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (नोव्हेंबर,१९३०.) जबाबदार आहे,हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले.
२. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे,विषमतेचे समर्थन आहे.त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली.आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा,जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवर पण निर्भीड टीका केली.
३. तसावरकरांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या.जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले.अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी.
‘पतित पावन मंदिर’ सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.
४. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले,या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला.सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.
“गाय हा एक उपयुक्त पशू आहे: वीर सावरकरांचे या बाबतीत झणझणीत विचार आहेत.ते लिहितात..मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय,बल- पशू आहे,तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे, मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे,म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाटय़ाने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.
एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल,पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, आणि त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निभ्रेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील. (संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )
जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे
१)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.
२) व्यवसायबंदी
३) स्पर्शबंदी
४) सिंधूबंदी
५) शुद्धीबंदी
६) रोटीबंदी
७) बेटीबंदी.
आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.
सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा,सैनिकांची संख्या वाढवणे,शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ. स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला.१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे निधन झाले.
♨️♨️♨️♨️♨️
साहित्यिक सावरकर: त्यांचे काव्य असो वा निबंध, नाटक असो वा कादंबरी किंवा असोत ऐतिहासिक ग्रंथ. त्यात हिंदू धर्माची महत्ता आणि देशप्रेम ठासून भरलेले असणारच. परकीय सत्तेविरुद्धची चीड आणि स्वातंत्र्याची आस दिसून येणारच.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ातीलच नव्हे तर हिंदुस्थानच्या मागील सहस्र वर्षांच्या इतिहासातील सर्वार्थाने महान व्यक्तिमत्त्व. कुणीही नतमस्तक व्हावे असे तेजोमय, दिव्य महापुरुष म्हणजे सावरकर. ते शतपैलू होते, त्यांच्या एकेका गुणाचा अभ्यास करायचा म्हटले तर एक जन्म पुरणार नाही इतके कार्य. साहित्यिक म्हणून विचार केला तर त्याची सुरुवात ते अगदी लहान 8-9 वर्षांचे असताना झाली. तेव्हा त्या वयात त्यांनी लिहिले वीरश्रीचे पोवाडे, फटके. शूर चापेकर बंधूंवर लिहिलेला फटका विशेष गाजला.
छत्रपती शिवाजी महाराज हे कुणीही देवतेपेक्षा कमी नाहीत. ते होते म्हणून देवळे वाचली, देव वाचले, धर्म वाचला मग अशा दैवताची कुणी आरती कशी लिहिली नाही? हा विचार मनात येताच ११ वर्षांच्या विनायकाने महाराजांच्या देदीप्यमान कारकीर्दीला शोभेल अशी ओजस्वी-तेजस्वी आरती लिहिली. निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, ऐतिहासिक ग्रंथकार, उर्दू गझलकार आणि महाकवी अशी साहित्यिक म्हणून त्यांची ओळख सांगता येईल, पण साहित्यिक म्हणून त्यांची तितकीच ओळख नाही. मराठीत रुढ झालेल्या शेकडो परकीय शब्दांना त्यांनी मराठी शब्द निर्माण केले. त्यांनी तयार केलेले जवळपास सारे शब्द मराठी भाषेत रुढ झाले, जे शासकीय पातळीवर व सामान्य लोक रोज बोलतात-लिहितात. निबंध, कथा, नाटके, कादंबऱ्या, चरित्रे, प्रवासवर्णने, कविता व साहित्यातील अन्य प्रकार हाताळले म्हणजे साहित्यिकाचे काम संपले असे होते का?
“१८५७ चे स्वातंत्र्यसमर” या पुस्तकाला इंग्रजांनी प्रकाशनापूर्वीच बंदी घातली तरी त्या पुस्तकाने जगभर प्रवास केला. ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक क्रांतिकारकांसाठी ‘गीता’ ठरले. ‘काळे पाणी’, ‘माझी जन्मठेप’ वगैरे पुस्तके वाचकप्रिय ठरली. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. काही लोक, ‘हिंदू धर्म दास्याचा, जेत्यांचा नव्हे’ अशी वरचेवर टीका करीत. तसे लेख वृत्तपत्रांमध्ये सतत लिहीत तेव्हा वृद्ध सावरकर लेख लिहून त्यांचे म्हणणे खोडून काढीत, पण असे किती दिवस करणार? पुढेही असे कुणी बोलले तर त्याला पुढल्या पिढीला उत्तर देता आले पाहिजे म्हणून बॅरिस्टर सावरकरांनी, हिंदू राजे महाराजांनी केलेल्या अभिमानास्पद पराक्रमाचा, हिंदूंच्या मागील शतकांतील इतिहासाचा अभ्यास करून वयाच्या 83 व्या वर्षी ‘सहा सोनेरी पाने’ हा ऐतिहासिक अजरामर ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ वाचल्यास त्यांच्या अभ्यासाची थोडी कल्पना येईल. सावरकर हिंदू धर्माभिमानी असले तरी प्रखर वैज्ञानिक दृष्टीचे असल्याने त्यांनी हिंदूंच्या अवाजवी कर्मकांडांना विरोध केला. त्यांचे काव्य असो वा निबंध, नाटक असो वा कादंबरी किंवा असोत ऐतिहासिक ग्रंथ. त्यात हिंदू धर्माची महत्ता आणि देशप्रेम ठासून भरलेले असणारच. परकीय सत्तेविरुद्धची चीड आणि स्वातंत्र्याची आस दिसून येणारच. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची, विद्वत्तेची, व्यासंगाची प्रचीती त्यांचे साहित्य वाचताना पदोपदी येते. त्यांचा जागतिक इतिहासाचा अभ्यास अचंबित करणारा होता. अंदमानसारख्या ठिकाणी काळय़ा पाण्याची शिक्षा भोगताना कसलेही लेखन साहित्य व लेखन स्वातंत्र्य नसताना त्यांनी जंगली झाडाच्या काटय़ांनी भिंतीवर कमला व गोमंतक ही महाकाव्ये लिहिली. म्हणूनच सावरकर म्हणजे या सम हा. हात पाय लोखंडी साखळीत जखडलेले, त्यात कोलू फिरवण्यासारखे अतिकष्टाचे काम, धड अन्न नाही आणि कसलीही सुविधा नाही अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे कविता स्फुरणे हे नवलच नव्हे का? असा साहित्यिक शोधून तरी सापडेल का? आई सरस्वतीचा असा आशीर्वाद, कृपा अन्य कुणावर झाली नसेल. अंदमानात शिक्षा भोगत असतानाच त्यांनी निरक्षर कैद्यांना साक्षर केले व स्वतःही उर्दू भाषा शिकून उर्दू गझलही लिहिल्या. असे किती चमत्कार सांगावेत. त्यांनी सर्वप्रथम आपला देश मानला. तो पारतंत्र्यात असताना त्याला स्वतंत्र करणे हे प्रथम कर्तव्य. त्यापेक्षा महत्त्वाचे आपले कुटुंब नाही की आपणही नाही.
ने मजसी ने परत मातृभूमीला…
या अजरामर गीतात ते म्हणतात,
भूविरह कसा सतत साहूं या पुढती |
ही फसगत झाली तैशी…
मातृभूमीचा विरह यापुढे कसा सहन करू? येथे येण्याची फसगत माझ्याकडून अशी कशी झाली..?
जरी उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा |
हा व्यर्थ भार विद्येचा…
आपण इतके शिकून जर मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करू शकत नसू तर मग त्या शिक्षणाचा उपयोगच काय? सारे शिक्षण व्यर्थ आहे.
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा |
मज भारतभूमीचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी |
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिय साचा |
वनवास तिच्या जरी वनीचा…
नभांगणात अगणित नक्षत्र असली तरी मला मात्र माझ्या भारतभूमीचा ताराच त्याहून भारी वाटतो, मोठा वाटतो. येथे (इंग्लडमध्ये) वा जगात अन्यत्र मोठ्या हवेल्या, भव्य प्रासाद असले, तरी माझ्या आईची झोपडीच मला प्रिय आहे. माझी मातृभूमी गरीब असली, तिच्याकडे भौतिक सुखे कमी असली, जीवन वनवासी वाटत असले तरी ती गरिबी, तो वनवास मला जगातील कोणत्याही सुखापेक्षा अधिक सुखकर आहे.या व अशा कितीतरी उदाहरणांवरून देशाइतका, मातृभूमीइतका त्यांना कुणीही प्रिय नव्हता हे लक्षात येते. ते म्हणत, देह आणि देव यांच्यामध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे देणे लागतो.
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यपदावरून भाषण करताना त्यांनी साहित्यिकांना, ‘लेखण्या मोडा, बंदुका घ्या’ असा उपदेश केला. लेखण्या मोडा याचा अर्थ लेखणीचा त्याग करून बंदुका घ्या असा नसून तुम्ही जे साहित्य निर्माण कराल त्यात देश पारतंत्र्यात आहे, इंग्रजांच्या गुलामीत आहे याची वास्तव मांडणी झाली पाहिजे. एखाद्या बंदुकीसारखी लेखणी चालवा, जनजागृती करा, लेखणीचा सदुपयोग करा. या सावरकरी विचारांचा, तत्त्वज्ञानाचा विचार केला तर आज देश स्वतंत्र आहे, पण देशात चाललेला भ्रष्टाचार, अनाचार, धार्मिक वाद यावर आजचे छोटे-मोठे साहित्यिक किती लेखन करतात? उलट राजकारणाचा, धर्माचा विषय काढला की सगळे अंगावर पाल पडल्यासारखे दचकतात आणि आपल्याला काय करायचे राजकारण आणि धर्म? ते विषयच नको असे साहित्यिक म्हणतात. जे साहित्य समाजाच्या, देशाच्या, धर्माच्या कामाचे नसेल, ज्यात वास्तवतेचे दर्शन नसेल तर ते काय उपयोगाचे? रद्दीच ती. एकूणच स्वा. सावरकरांच्या सकल साहित्याचा विचार केला तर तसा साहित्यिक दुसरा नाही. त्यांनी सारे सोडून फक्त साहित्य निर्मिती केली असती तर त्यांची ग्रंथसंपदा किती झाली असती याचा कुणी विचार तरी करू शकेल का..?
१४० व्या जयंती निमित्ताने स्वातंत्र्य संग्रामवीर,थोर साहित्यिक वीर सावरकर या महामानवास शत् शत् नमन.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



Leave a Reply