नवी पिढी, नवा जमाना की एक प्रश्नचिन्ह?
स्वप्न नवे, वास्तव वेगळे
सत्य काय, अजून सगळे !
नवी पिढी आकार घेत आहे, आपण ही नवीन पिढी घडवली आहे. संपूर्ण ओढाताण करून, परिस्थितीशी झगडून, आपण या पिढीला शिकवले आहे. आपल्याकडे नसलेले शिक्षण त्यांना दिले आहे. अधिक चांगले/सुखी जीवन जगण्यासाठी, सुशिक्षित बनवले आहे. पण कदाचित हे करताना ते सुसंस्कृत- सुसंस्कारित झालेले नाही, त्याबाबत आपण कुठेतरी कमी पडलो आहोत का? असे वाटते. त्याचे कारण म्हणजे त्यांचे आपल्याशी व इतरांशी वागणे. हे काहीसे अहंकारी, गर्विष्ठ होत चालले आहे. आत्मकेंद्रित झाले आहे. त्यांना हवे ते, हवे तेव्हा, हवे तेवढे, हवे तसे उपलब्ध करून दिल्यामुळे कदाचित असे होत असावे. यापुढे सुद्धा सगळे आपल्या इच्छेप्रमाणे होईल, ‘मी म्हणजे सर्वस्व!’ असा काहीसा भ्रम या पिढीला होत आहे. यातून पुढे होणारा भ्रमनिरास, त्यामुळे पुढे निर्माण होणाऱ्या समस्या – (मानसिक असंतुलन, तणाव, नैराश्य इ. ) कठीण दिसतात.
या नव्या पिढीचे शिक्षण झाल्यावर पुढे नोकरीचा शोध सुरू होतो. ही नोकरी फक्त पुणे, मुंबई, बंगलोर अशा ठिकाणी किंवा शक्य असेल तर परदेशी असावी. (शिक्षण सुविधा देशात उपलब्ध असावी, तिचा फायदा घेऊन मी मात्र परदेशी जाऊन फक्त स्वतःसाठी उपयोग करून घेईन) ती मिळाली की त्यांचा लग्नाअगोदर सर्व भविष्याचा आराखडा तयार आहे. किती पैसा कमवून झाल्यावर स्वतःचं घर घ्यायचे (हल्लीच्या मुलामुलींचे विचार – आई-वडिलांचे घर आपले नसते, कारण आपले व त्यांचे विचार पटत नाही. आपल्यावर त्यांचे दडपण नको, आपल्याला स्वातंत्र हवे, उगाच त्यांच्या घरात राहून त्यांना वागवण्याचे ओझे नको.उद्या यांनी आमच्यासाठी काय केले? असे म्हणायला ते मोकळे कारण सगळेच मुला- मुलींचे आई वडील करतात तेच तुम्ही केले, त्यात काय एवढं?), नंतर आपल्या पसंतीच्या मुला-मुलीशी लग्न (हा एक स्वतंत्र विषय आहे) करायचे. (नंतर सासू-सासरे नको) लग्न म्हणजे नेमके काय? त्याची मूळ संकल्पनाच बदलून गेली आहे. कुटुंब हे केवळ चार भिंतींच्या आत एकत्र रहाणारे २-३ जीव, एवढेच! तेही एकटे एकटेच – एकमेकांपासून दूर! प्रसंगी ओळख नसलेल्या व्यक्तीशी सोशल मीडिया मधून तासंतास संस्कार/संस्कृतीच्या गप्पा मारणारे आम्ही रक्ताची नाती सुद्धा विसरत चाललो आहोत. रोज वेगवेगळ्या पद्धतीचे शाब्दिक दिवस साजरे करताना आम्ही कृती शून्य होत चाललो आहोत.
त्यातूनच लग्न झाल्यावर सगळे कसे नियोजित पध्दतीने झाले पाहिजे. उगाच अपत्य प्राप्तीसाठी घाई नको. नाही तर आपण मजा केव्हा करावी. काही खाजगी जीवन आहे की नाही. त्या नंतर जेव्हा दोघांचं समाधान झाल्यावर अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न! (गर्भ संस्कार शून्य) तेही एकच! तेही आपल्या इच्छेप्रमाणे मुलगा की मुलगी, नियोजित तारखेला, नियोजित वेळेस, प्रसंगी शस्त्रक्रिया करून, संस्कार, संस्कृतीची आवश्यकता नाही पण सर्व सोपस्कार मात्र हवेतच. अपत्य कधी होणार, त्याला कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा (मराठी माध्यमाच्या शाळेत तर नकोच) इंग्रजी माध्यम, शक्यतो सि. बी. एस. ई. किंवा आय. सी. एस. ई. शाळाच हवी. नाही तर तो भविष्यात प्रगती करुच शकणार नाही. (स्वतःचे शिक्षण कसे झाले आहे ते विचारु नका) तसे आपल्या सारखे भविष्यात आपल्या मुलांचे होऊ नये म्हणून तर हा खटाटोप! एक यांत्रिक पद्धतीने हे सर्व होत आहे असे वाटते.
सरते शेवटी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाताना बदल होणे निसर्गाचा नियम आहे. पण हे परिवर्तन होताना एका पिढीची दुसऱ्या पिढीशी असलेली नाळ तुटता कामा नये. ऋणानुबंध, नाती यातून त्यांची जपणूक व्हायला हवी. पण त्यासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये काही चूक तर नाही ना? याचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. केवळ पुस्तकी ज्ञान आपल्याला प्रगतीकडे नेऊ शकत नाही. त्याला सोबत अध्यात्मिक ज्ञानाची, तत्त्वज्ञानाची बैठक आवश्यक आहे, असे एकंदरीत चित्र दिसते आहे. समोर आलेल्या परिस्थितीतून रामायण, महाभारत, भगवद्गीता यांसारख्या ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. मुळात हे सर्व ज्ञान आपला उमेदीचा काळ संपल्यावर वानप्रस्थाश्रमात केवळ वेळ व्यतीत करण्यासाठी उपयोगी नसून सुरुवातीपासूनच नियमित शिक्षणाचा भाग होण्याची निकड दिसून येते. अर्थात अजूनही तेवढं गांभीर्य जाणवत नाही, हे दुर्दैव आहे. परदेशांमध्ये या ग्रंथांचं शिक्षण दिले/घेतले जाते. मात्र भारतामध्ये ते अडगळीला पडले आहे. म्हणजेच आपल्याजवळ असलेल्या उपलब्ध ज्ञानाची किंमत आपल्याला अजूनही कळालेली नाही, याचेच दुःख वाटते.
एकंदरीत कुठे चाललो आहे आपण?? हे मोठे प्रश्नचिन्ह? प्रत्येकाने याचा विचार करायला हवा, नाही का??
श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265



Leave a Reply