नात्यातील आठवणींचे भावनिक अनुभव कथन
आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू या मधल्या कालावधीतील अनेक नाती, काही रक्ताची तर काही हक्काची, आपुलकीची, त्यांच्या आठवणींची गुंतागुंत! काही गोड तर काही अबोल, नाही का? जन्माला आल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत माणसाला अनेक नाती चिकटत असतात. जन्मताच पहिले नाते नाळेने जोडलेले असते ते आईशी! इथून झालेली सुरुवात हळूहळू आपली नाती उलगडत जातात. काही हवी हवीशी, तर काही नकोशी वाटणारी सुद्धा! अशाच काही आठवणीतील नात्यांविषयी हे अनुभव!
आई-बाबांचा विवाह झाला तेव्हा 1962- 64 चा काळ असावा. वडील तेव्हा शेतकरीच होते. पण मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झालेले होते म्हणून नोकरी लागण्याची अपेक्षा होती. थोड्याफार प्रयत्नाने ती मिळाली सुद्धा. (एक धेला म्हणजे अर्ध्या पैशाच्या एका कागदापैकी अर्ध्या कागदावर लिहिलेल्या अर्जाने) पण गावापासून दूर, जवळ जवळ जंगलच असलेल्या खेडेगावात. गावातील लोक बहुतांश अशिक्षित, राहण्यासाठी फारशा सुविधा उपलब्ध नाहीत, अशा परिस्थितीत त्या भागात बाहेरूनच आलेले एक बंगाली जोडपे (काका व काकू) राहत होते. थोडी शेती, गाय आणि टपरीवजा दुकान व झोपडी सारखे घर अशी त्यांची परिस्थिती होती. त्यांनी बाबांना राहण्यास जागा दिली आणि बाबांचा नवा प्रवास सुरू झाला.
सुरुवातीला चार महिने ते एकटेच राहिले. सकाळी दूध, दोन्ही वेळा जेवण अशी सोय काकूंमुळे होत असे. शाळेची वेळ संपल्यावर काकांबरोबर बाबा थोडेफार काम करीत असत. यामध्ये काही नवनवीन गोष्टी सुद्धा ते काका सांगत/ शिकवत असत. पण कालांतराने काकू बाबांना विचारू लागल्या. घरी कोण- कोण असते, लग्न झाले आहे का? झाले असल्यास बायकोला का नाही आणत? मी तुला कुठपर्यंत जेवण करून पुरवणार? अनोळखी असले तरी काका काकू बाबांना अगदी मुलाप्रमाणे सांभाळत होते, काळजी घेत होते, अनोळखी ठिकाणी मदत करत होते.
अखेर चार महिन्यानंतर बाबा आईला घेऊन आले आणि पुन्हा नवीन नाते निर्माण झाले आई-मुलीचे! पहिल्यांदा येथे आल्यावर तर आईला रडूच कोसळले. रामाने जसे सीतेला वनवासात नेले होते तसे तुम्ही मला जंगलात घेऊन आले असेच आई बरेच दिवस म्हणत होती. पण काका काकूंनी अशा अनोळखी ठिकाणी आईला दिलेला आधार, यामुळे आईला बऱ्याच वेळा अनेक पद्धतीने तशी मदतच झाली. आणि यातूनच परिस्थितीशी झगडण्याचे एक वेगळे बळ मिळाले. जंगलातून लाकडे गोळा करणे, या भागात मिळणाऱ्या नवनवीन भाज्या, इकडचे लोक, त्यांच्या पद्धती, काय करावे, काय करू नये, कसे वागावे अशा एक ना अनेक सगळ्या बाबतीत काकूंनी आईला सांभाळून घेतले. समजावून सांगितले आणि काकूंच्या आधारानेच आईचा हा प्रवास यशस्वीपणे सुरू झाला. त्या काळात संपर्क माध्यमांचा अभाव आणि खडतर परिस्थिती, प्रवासाची साधने दुर्मिळ असल्यामुळे घरच्या लोकांचा फारसा संपर्क होत नसे. प्रसंगी आई-वडिलांपेक्षा काका काकू हे योग्य वेळी दिलेल्या आधारामुळे आईला जास्त मायाळू व महत्त्वाचे वाटले. अर्थात ते खरेच आहे. केवळ सहा महिन्यांचा सहवास हा साठ वर्षानंतर सुद्धा आई अजूनही विसरू शकत नाही.
कालांतराने साधारण दोन वर्षानंतर बाबांची बदली पुन्हा एका नवीन खेडेगावात झाली. येथे सुद्धा वामन बुवा यांच्या घरात राहण्यासाठी एक खोली मिळाली. त्या काळात शिक्षकांना पुरेसा मान असल्यामुळे तशी राहण्याची सोय सहज होत असे. पण त्यासोबतच भेटलेली माणसं, त्यांचा स्वभाव, अनुभव, त्यांनी केलेली मदत, मार्गदर्शन, हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरत असे. हल्लीच्या काळात प्रत्येक जण आपले नोकरी आणि आपले जग यातच गुरफटलेला असतो. त्यामुळे प्रसंगी दुसऱ्याकडून काही शिकायला कोणी तयार नसतो. त्या काळात खेडेगावामध्ये तुटपुंज्या पगाराची नोकरी करून उत्पन्नाचे दुसरे काही साधन असं नव्हतेच. पण खेडेगावातील या वामन बुवांचे अनुभवाचे बोल हे बाबांना बरेच मार्गदर्शक ठरले. बचत करुन बैल विकत घेऊन ते शेतकऱ्याला वापरण्यास द्यायचे व त्याचा मोबदला म्हणून भात घ्यायचा. अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचा अर्थार्जनाचा मार्ग बाबांना वामन बुवांनी शिकवला. तसेच आईला सुद्धा अनेक नवनवीन गोष्टी संसारात कशा उपलब्ध होतात, काटकसर करणे कसे उपयुक्त ठरते, धान्य साठवणूक कशी करायची, ते कसे टिकवायचे अशा एक ना अनेक गोष्टी वामन बुवांनी शिकविल्या.
एकंदरीत अपरिचित अशा गावामध्ये वामन बुवा हे आई-बाबांना मिळालेले एक भक्कम आधारच होते. अशा गावांमध्ये अनेक समवयस्क लोकांनी तरुण असल्यामुळे बाबांना व्यसन लावण्याचा प्रयत्न केला. पण वामन बुवांचे आध्यात्मिक, वैचारिक, कौटुंबिक मार्गदर्शनामुळे बाबा या सर्व गोष्टींपासून दूर राहिले आणि म्हणूनच त्यांच्याशी तयार झालेले मित्रत्वाचे, प्रसंगी मोठ्या भावाचे नाते अजूनही कायम स्मरणात राहिले.
शेवटी बऱ्याचदा जिथे रक्ताची नाती आपल्या जबाबदाऱ्या विसरून जेव्हा एकमेकांना दूर ढकलतात, तेव्हा अशी वेळेनुसार निर्माण झालेली आपुलकीची नाती कायमची जवळीक निर्माण करतात, अविस्मरणीय ठरतात, असा अनुभव आहे. का कुणास ठाऊक? पण हल्लीच्या परिस्थितीत अगदी मुलगा आपल्या आई-वडिलांची जबाबदारी सहज विसरतो, अशावेळी इतर कोणीतरी त्याच आई-वडिलांना आधार देतो. तेव्हा रक्ताचे नाते खरे की आपुलकीचे नाते खरे असा प्रश्न निर्माण होतो, तो यामुळेच! मात्र काही असले तरी आपल्या संचित प्रारब्धामुळे, एकमेकांमधील असलेल्या काहीतरी जुन्या ऋणानुबंधामुळे निर्माण झालेली ही आपुलकीची नाती कायम स्मरणात राहतात, राहतील, राहावी आणि आपण त्यांच्या कायम ऋणात राहावे हेच खरे!! नाही का??
नाते तुझे नि माझे
क्षणिक वाटेवरचे
की अनंत काळाचे
नाते तुझे नि माझे
सोबती सुखदुःखाचे
की आधार मना-मनांचे
नाते तुझे नि माझे
नाही स्वार्थ, कर्तव्याचे
ते तर प्रेम जिव्हाळ्याचे!
म्हणूनच हरवलेल्या नात्यांपेक्षा सापडलेले हे मौलिक मोती अनमोल वाटतात. ते कधीच हरवू नये, असे वाटते. त्यातूनच या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने हे शब्दपुष्प साकारले. त्यामुळे स्पर्धा आयोजकांचे सुद्धा आभार!
धन्यवाद!!
श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी - 88882 84265
Leave a Reply