जन्म, बालपण, तारुण्य, मृत्यू….. प्रत्येक सजीवाची, मानवाची जडणघडण याच क्रमाने होत असते. प्रत्येकाला मिळालेला मानवाचा जन्म ही एक देणगीच असते. क्रम एकच असला तरी घडणारे प्रत्येक आयुष्य दुसऱ्यापेक्षा वेगळे असते. प्रत्येकाला आपला बालपणीचा काळ सुखावत असतो. गरीब वा श्रीमंत, प्रत्येकालाच हा काळ सुखाचा वाटतो. पण त्यानंतर सुरु होते खरी वाटचाल! हळूहळू जसजशी जाण येते, आजूबाजूची परिस्थिती कळू लागते. वाढत्या वयाबरोबर जबाबदारीची जाणीव होऊ लागते, तसतशी भविष्याबद्दलची स्वप्न मनात रुंजी चालू लागतात. तशी माझ्याही मनात विविध स्वप्न रंगू लागली, जसजसे वय वाढले तसतशी सभोवतालच्या परिस्थितीनुसार अनुभवविश्वानुसार या स्वप्नातले रंग बदलत गेले.
सुरुवातीला ग्रामीण भागात त्या वयामध्ये शिक्षक, शेतकरी, लोहार, सुतार, न्हावी या व्यतिरिक्त वेगळ पहिल व्यक्तिमत्व पाहण्यात आलं ते कंडक्टर. सर्वप्रथम त्याचं खूप अप्रूप वाटे. नंतर दुकानदारी, चित्रपट्टीका निर्मिती, रस्ते बांधणी, ड्रायव्हींग अशा अनेक क्षेत्राचे नकळत आकर्षण वाटत गेले. हळूहळू पुढे हे आकर्षण बदलत गेले. वडिलांच्या (शिक्षक) इच्छेनुसार म्हटलं तर एक मुलगा इंजिनियर, एक डॉक्टर व एक वकिल या क्रमवारीनुसार मला वकिल व्हायचे होते. सुरुवातीला या बाबतही आकर्षण होतेच. पण ही सगळी वरवरची आकर्षण, इतरांनी सांगितलेली. पण स्वतः ठरविण्याइतकी जाण नसल्याने, प्रगल्भता नसल्याने नेमकी निवड शक्य झाली नाही. मी मला स्वतःला घडवणे तेवढे जमले नाही. याउलट परिस्थितीच मला घडवत गेली. मी काय करायचे हे ठरविण्याऐवजी परिस्थितीने……. नियतीने मला मार्ग आखून दिला…… चालण्यासाठी. असे म्हणतात की नशीब, नियती काही नसते. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. पण मी असा जो काही शिल्पकार बनण्याचा प्रयत्न केला त्यात फारसे यश आले नाही. आणि सरते शेवटी सगळ्या विविध बाबींचा परिपाक होऊन मी शिक्षकी पेशा पत्करला. पण…..
मला नेमक काय व्हायला आवडल असतं ? हा प्रश्न आजपर्यंत मी स्वतःला कधी विचारलाच नाही. पण आज जेव्हा मी या विषयावर गंभीरपणे विचार करायला सुरवात केली तरी आतासुध्दा हे मन कुठेही सहजपणे स्थिर होत नाही. अनेक ठिकाणी मनाचा कल बदलत जातो. थोडे इथे… थोडे तिथे… असे भरकटत राहतं. पण शेवटी अनेक पर्यायांपैकी एके ठिकाणी येऊन ते जास्त रेंगाळल आणि मला खरोखर वाटू लागलं की खरच मला लेखक व्हायला आवडलं असत. अर्थात आवड असण एक आणि त्या क्षेत्रात यशस्वी होण वेगळ. हे जरी खर असल तरी आपण मन मारुन एखाद्या दुसऱ्या क्षेत्रात जेव्हा जातो, तेव्हा आपण यशस्वी होऊच याची कुठे खात्री असते. पण एकंदरीत रोजगार, करियर, उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जरी मनाला हे फारस पटत नसल, तरी मनाला एक ओढ असलेली दिसून आली. नोकरी किंवा व्यवसायात दुसऱ्या व्यक्तिच्या अधिकारात दबून काम करण्यापेक्षा स्वच्छंद काम करता आल पाहिजे, असे नेहमीच वाटत आले. आणि असे स्वच्छंद काम करण्याची संधी लेखकाला मिळू शकते. काय लिहायच? हे कुणीही ठरवून दिलेले नसते किंवा स्वतःलाही ठरवलेच पाहिजे असे नाही किंवा एखादा विषय आवडलाच तर ते ठरवूनही लिहिता येते. म्हणजे सगळाच आनंदी आनंद! वेळेची मर्यादा नाही कमी किंवा जास्त वेळ असा प्रश्न नाही. वाट्टेल तेव्हा वाट्टेल तेवढ लिहिण्यास मोकळ! म्हणजे पूर्णपणे मुक्त, विषयांना मर्यादा नाही, असंख्यात विषय आपल्याला साद घालतच असतात. विषयाचे प्रचंड स्त्रोत आपल्या सभोवताली विश्व व्यापून शिल्लक आहेत… आपला आवाका सगळ्यांना कवेत घेऊ शकत नाही, एवढे हे विषय व्यापक आहेत. निसर्ग, समाज यातून सतत ते पाझरत आहेत.
आपण जसे मानवाला निसर्गाशी एकरूप होण्याचे आव्हान करतो, आपले आयुष्य सुखी व समृध्द होण्यासाठी निसर्गाची कास धरण्याचे सांगतो, तसे लेखन हे एक मला नैसर्गिक काम वाटते. त्यामुळे यामध्ये कृत्रिमपणा येऊ शकत नाही, असे वाटते. अर्थात हल्लीच्या स्पर्धात्मक जगात लेखन क्षेत्रही अपवाद ठरू शकत नाही. टीव्ही सिरीयल्समधून पाहिजे त्या प्रकारचे लेखन कृत्रिमपणे करून घेतले जातेच, तोही एक वेगळा वर्ग निर्माण झाला आहे. यातही व्यावसायीकता आली आहे. पण असे अपवाद सोडल्यास या क्षेत्रातील अनुभव आनंददायी ठरावा. तसेच आपले अनुभवविश्व वाचनाने समृध्द करुन आपल्या भावविश्वाला विविध कंगोरे प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे विविधांगी लेखन करता येणे शक्य झाले असते. तसेच कालानुरूप अनुभव, आवड बदलली तर त्यानुसार लेखनाची दिशाही बदलता आली असती.
पण एक शंकेची पाल मनात चुकचुकत होती, ती म्हणजे लेखकाचे भवितव्य हे पूर्ण प्रकाशकावर अवलंबून असते. प्रकाशक अनुकूल असेल किंवा मिळाला तरच लेखक प्रकाशात येऊ शकतो. या प्रकाशकांचेही अनेक किस्से प्रसिध्द आहेत. तसेच एखाद्या पुस्तकाला पुरेशी प्रसिध्दी मिळाली तरी बाकी साहित्य धूळ खात पडणार नाही याची खात्री नसते. आयुष्यात एखादेच पुस्तक यशस्वी ठरले तर? सध्याची जीवघेणी स्पर्धा, लेखनातील चौर्यकर्म यासारख्या गोष्टी मनाला या ओढीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. पण‘कोंबड कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा रहात नाही’ तशी प्रतिभा असल्यास ……. तसा मनाचा कल असल्यास, ते लपून रहात नाही. तसेही मी कधीकधी उत्स्फूर्तपणे लेखन केले आहे. एखादे वेळेस रात्री अपरात्रीही लिहिण्याची उर्मी उफाळून येते. काही लिहिण्याचे मनोरेही रचले जातात. पण त्याला म्हणावी तशी उंची गाठली जात नाही म्हणा किंवा पुरेसा परिणाम साधला जात नाही. कारण आपल्या आयुष्यातील होकायंत्र भलत्याच दिशेने भरकटले आहे. कारण सध्या जगण्यासाठी पहिली गरज म्हणजे पैसा आणि सर्वात महत्त्वाचा परिणामकारक घटक म्हणजे परिस्थिती. यातून एकंदरीत मी लेखन क्षेत्रापासून दुरावत गेलो. पण परिस्थिती अनुकूल असती आणि मनाप्रमाणे सर्व मार्गक्रमण झाले असते, योग्य दिशा मार्गदर्शन मिळाले असते, तर मला लेखकच व्हायला आवडले असते, यात शंका नाही.
असे एकंदरीत प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकते. आयुष्याच्या संध्याकाळी आपलं बरंच काही करायचं राहून गेलं असं वाटत राहतं. त्यामुळे माझ्या या‘जीवन प्रवासाचा’ इतरांना आपल्या भविष्यातील वाटचालीचा मार्ग ठरवण्यास उपयोग व्हावा, मार्गदर्शन व्हावे, असे वाटते. जेणेकरून आयुष्यातील मर्यादित वेळेचा सदुपयोग करता येईल. प्रत्येकाने आपला आयुष्याचा मार्ग ठरवताना तो केवळ आपल्या सभोवतालचे विश्व पाहून ठरवू नये, तर आपल्यामधील स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आणि ठरवावा, असे मला वाटते. त्यामुळे जीवन जास्त अर्थपूर्ण होण्यास मदत होईल. आपल्या आयुष्यातील खरे कर्म करण्याची संधी मिळेल आणि अर्थात त्यातून ‘आनंद आणि समाधान’ मिळेल अशी अपेक्षा!
लेखक – कैलास भाऊलाल बडगुजर, टिटवाळा
भ्रमणध्वनी : 8888284265
Great & very interesting creation 👍 guruji