अभियंत्यांचे दैवत डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या १५ सप्टेंबर-इंजिनिअर्स डे – श्री. टी. टी. बडगुजर सर, बोराडी

अभियंत्यांचे दैवत डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
१५ सप्टेंबर-इंजिनिअर्स डे
(अभियंता दिन)

नोकरीतून निवृत्त झाल्यावर सर्वसामान्य व्यक्ती कुटुंबाबरोबर व्यक्तिगत जीवन जगते;मात्र निवृत्तीनंतरही पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने थोडीथोडकी नव्हे तर ५५ वर्षे देशाच्या जनतेच्या सेवेसाठी देणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने भारतरत्न असते.होय,मी आज ज्यांच्याबद्दल माहिती सांगतोय ते आहेत- देशातील साऱ्या अभियंत्यांचे दैवत,आधुनिक भारताचे रचनाकार ‘सर,भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’
१५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन! संपूर्ण भारतभर १९६८ पासून त्यांचा जन्मदिन हा अभियंता दिन (इंजीनियर्स डे) म्हणून साजरा होतो.सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील सक्कर या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी कल्पकतेने सोडवला. घाणेरडे,दूषित पाणी प्यावे लागत असलेल्या तिथल्या लोकांना अतिशय कमी खर्चात शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यायला मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि भारताच्या एका युवक आणि कल्पक अभियंत्याचे नाव जगासमोर आले. १८८४ मध्ये त्यांना इंग्रज सरकारने नाशिक विभागात अभियंत्याची नोकरी दिली.मात्र १९०७ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अर्थात ती आराम करण्यासाठी नव्हे तर आपल्या कर्तृत्वाला नवनवीन क्षितिजे निर्माण करून देण्यासाठी! आपल्या निवृत्ती वेतनातून आपल्या गरजेएवढे पैसे घेऊन उर्वरित पैसे ते गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करीत.

शालेय शिक्षण घेत असतानाच ते आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले होते.त्यांच्या घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती.पण त्यांची आई मनाने श्रीमंत आणि जिद्दी होती. आपल्या शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून त्यांनी शिकवण्या करून पैसा उभा केला आणि नंतरच्या सर्वच परीक्षा ते पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. शिक्षणासाठी आपल्यासारखा संघर्ष करण्याची वेळ अन्य कुणावर येऊ नये म्हणून आपल्या निवृत्ती वेतनातून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पैसा देऊ केला होता.


निवृत्तीनंतर ते स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी युरोपला गेले.हैदराबादच्या निजामाच्या निरोपानुसार तिथला दौरा अर्धवट सोडून ते भारतात परत आले आणि मुसा नदीच्या पुराच्या पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला. यामुळे त्यांचा नावलौकिक अधिकच वाढला.म्हैसूरचे मुख्य अभियंता झाल्यावर त्यांनी कावेरी नदीवर कृष्णसागर नावाचे धरण उभे केले. महात्मा गांधी देखील हे अजस्त्र धरण पाहून चकित झाले होते.या धरणाच्या पाण्यावर त्यांनी वीज निर्मिती केली.या विजेने त्यावेळी म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन गार्डन उजळून निघाले.पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूर संस्थांचे दिवाण झाले. त्या सहा वर्षातच त्यांनी म्हैसूर विद्यापीठ,पोलाद कारखाना, सिमेंटचा कारखाना, रेशीम,चंदन,तेल,साबण यांची उत्पादने त्यांनी त्याकाळात सुरू केली.शिक्षण,उद्योग आणि शेती या क्षेत्रातही म्हैसूर संस्थानने नेत्रदीपक कामगिरी केली.मुंबई औद्योगिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष,भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष,नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार असे विविध पदे त्यांनी भूषविली. कराची,बडोदा,सांगली,नागपूर, राजकोट,गोवा आदि नगरपालिकांना आणि इंदोर, भोपाळ,कोल्हापूर,फलटण अशा संस्थांनांना त्यांनी अडचणीच्या काळात मदत केली.हैदराबाद शहर वसविले, पुण्याजवळील खडकवासला जलाशय उभारण्यात योगदान दिले.
राष्ट्र बांधणीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना इंग्रज सरकारने सर हा सर्वोच्च मानाचा किताब दिला तर मुंबई, कोलकाता,अलाहाबाद,म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना मानाची डिलीट ही पदवी दिली.भारत सरकारने १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न या उपाधीने अलंकृत करून त्यांच्या कार्याला सलाम केला.
विश्वेश्वरय्या हे आधुनिक काळातील विश्वकर्मा होते. झिजलात तरी चालेल पण गंजू नका हा मंत्र त्यांनी तरुणांना दिला. वयाची नव्वदी ओलांडल्यावरही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता.१५ सप्टेंबर १९६१ ला भारतभर त्यांची जन्मशताब्दी म्हणजे १०० वा वाढदिवस साजरा झाला. निष्ठावान,चारित्र्यवान आणि विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता असल्याचा गौरव पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला.पृथ्वीवर प्रकाश पर्व निर्माण करणाऱ्या या अभियंत्याची प्राणज्योत १४ एप्रिल १९६२ ला मावळली.एक कल्पक इंजिनिअर,वैज्ञानिक, निर्माता आपल्यातून निघून गेला. १९६८ पासून त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो.


सुनियंत्रित आचरण,प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद ही त्यांच्या प्रदीर्घ जीवनाची पंचसूत्री होती.त्यांच्या स्मृती आणि कार्यास विनम्र अभिवादन!!! देशातील सर्वच अभियंत्यांना इंजिनियर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐💐💐
—————––————————————————-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*