मी कोण ? मला ओळखलं नाही? इथे तिथे, अवतीभोवती, सगळीकडे तर मी आहेच! हो मी अनामिका, मीच ती अनामिका! भरतवर्षातील रामायणातील सीताही मीच ! महाभारतातील द्रौपदीही मीच ! वनवास भोगणारी मीच ! कृष्णाचा धावा करणारी मीच!
काय म्हणालात ? मी अबला ? छे ! छे ! मी अबला नाहीच मुळी. अबला असती तर शिवाजी राजांसारख्या बहाद्दराला कसे घडवलं असत? “मेरी झाँसी नही दूँगी” ची गर्जना कशी केली असती?, काय म्हणालात “सती जाते?” “अहो, विसरा ते दिवस आता, मी पती मेल्यानंतर सती तर जात नाहीच, पण साधं रडतसुध्दा नाही, माझा मेकअप बिघडेल ना! आणि रडून तरी काय तो परत येणार आहे थोडाच, सत्यवानासारखा ! मेल्यानंतर सावित्रीप्रमाणे परत आणणे तर दूरच पण मला वाटल्यास जिवंत असतानाच घटस्फोट देवून मोकळी होते मी. मग तो कितीही गुणी असला तरी ? हो, हो, तरी! त्याच्या गुणांना काय करायचय? माझ्याही काही आकांक्षा आहेत. आवडी निवडी आहेत. तो पती असला तरी परमेश्वर आहे थोडाच? तरीही फारच चांगला असला तर करीन की संसार, फार तर रडत– रखडत !
पण काहीही म्हणा मी अबला नाही हे निश्चितच. सबला आहे सबला! ते दाखविण्यासाठीच तर नोकरी करतेय. काय म्हणता? मुलं? हा, होते थोडी मुलांची आबाळ, पण आहेत की पाळणाघर ! ‘काय ? आजी-आजोबा ? नको ग बाई इथे आमचच होत नाही, तर त्यांच कोण करेल? आणखी त्यांचे ते बोलणे, टोमणे कोण खाईल? काय म्हणालात? संस्कार ! नाही तरी घरी बसून किती आया संस्कार घडवताहेत, माहीतच आहे. मुलांना अभ्यासाला नाही तर खेळायला पिटाळलं असेल, टीव्ही पुढे बस्तान मांडल असेल किंवा महिला मंडळात गेली असेल नाहीतर शॉपिंगला! हो कालच नाही का, शेजारणीने पाचशेची साडी आणली, मग मला नको सहाशेची आणायला. मुलं काय वाढतील की?
नोकरी म्हणजे कसे, नोकरीच्या नावाने थोडा आरामच मिळतो म्हणा ना! सकाळी कामात त्याची मदत होतेच. का नाही होणार? पगार हवा असतो ना? बरं ऑफिसला लेट गेलं तरी फारसं कोणी रुष्ट होत नाही बाया माणसांवर! आणि कामाचं काय, होतं हळूहळू, गप्पाटप्पा मारत! हा चुली जवळच्या म्हणा ना! शिवाय संध्याकाळी इतर मैत्रीणींबरोबर निघता येत शॉपिंगला! काय म्हणालात? रोजचा खर्च? अहो होणारच, कमावते ना! मग खर्चायला नको? आणि काय हो नोकरी न करणाऱ्या खर्चच करत नाही का अजिबात? आमच्याकडून होत असेल थोडाफार जास्त! पण लिपस्टिक, पावडर, टिकल्या बांगड्या सोडलं तर कुणासाठी ? घरासाठीच ना? ते बरं नाही दिसत? दिसते ती फक्त आमची फॅशन! आमचे नटणे! त्याच्यावरच तर प्रमोशन मिळते. कामाला कोण विचारतं? आणि फॅशनला संस्कृती कशाला आड यायला पाहिजे? ही तर आधुनिक संस्कृती आहे आणि विशेष म्हणजे उपयुक्त आणि इकॉनॉमीकलही, साडीचा पदर आवर आवर आवरण्यापेक्षा, जीन पैंट व शर्ट कसे एकदम फिट्ट ! (पण संधी मिळेल तेव्हा, नवरोबा कडून हट्टाने, आई-बाबा किंवा भावाकडून हक्काने, नटण्या-मुरडण्यासाठी साडी हवीच!) लांब गोंडा घोळत बसण्यापेक्षा छोटे केस कसे ? सगळं कस, पटापट आणि सुटसुटीत. हा, थोडं सौंदर्य होत तस कमी, पण घाबरता कशाला! ब्युटी पार्लर आहेत की! होईल थोडा खर्च, पण माझ्यासारखी लावण्यवती मग मीच! नाहीतरी या बाबतीत मी आहेच जगभर प्रसिद्ध?
काय म्हणालात मर्यादेतदेखील ? अहो, सोडा ती मर्यादा, सीतेनेही लक्ष्मणाची मर्यादारेषा ओलांडली म्हणून तर एवढं रामायण घडलं. मी मर्यादा सोडली, तरच हे जग कुठेच्या कुठे पोहोचेल. काय? विनाशाकडे!, अहो विनाश तेव्हा होईल जेव्हा मी चार भिंतीच्या आत राहील. विसरू नका आम्ही पंतप्रधान झालो म्हणून हे दिवस आले. नाहीतर गेले होते सगळे केरात. विसरू नका, मी आहे म्हणून जग चालते आहे. मी फिरते, म्हणून जग चालते. नाहीतर जगाची अवस्था होईल पाण्याच्या डबक्यासारखी ! मी ओढते, म्हणून चालतो संसाराचा गाडा! नाहीतर बसला असतात, चिखलात रुतून !
चला, मला अजून बरंच चालायचयं, पुढं जायचयं. काय म्हणालात? मुक्ती मिळवायला? कुणापासून? पुरुषांपासून, कशासाठी? वर्चस्व गाजवण्यासाठी? का, मी त्याची अर्धांगिनी राहून नाही करू शकत कर्तुत्व? मिळवू नाही शकत नाव? मुक्ती मिळवून मला काय स्त्री राज्य स्थापन करायचे आहे? आणि हे विसरून कसं चालेल, गाडा एका चाकाने व्यवस्थित चालतो थोडाच! त्याला दोन चाके हवीच, सुख आणि दुःखाची! म्हणूनच खांद्याला खांदा लावून सुखदुःखाची चाके असलेला हा जीवनाचा गाडा आनंद घेत ओढण्यासाठी हा सगळा खटाटोप! कशाला हवी मुक्ती? हा, मात्र अबला राहून नाही चालायचं नाही हे निश्चितच. त्यासाठी सबला झालं पाहिजे, सबला! मी होणार सबला! मी अनामिका! मी होणार सबला! मी अनामिका!
लेखक – कैलास भाऊलाल बडगुजर
टिटवाळा
भ्रमणध्वनी 8888284265
खूप छान मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!!!!!