भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त…आजचा विद्यार्थी, उद्याचा भारत – लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

टिक... टिक... टिक... इतिहास. . वर्तमान ... आणि भविष्यकाळ.....काळ हा वेगाने पुढे सरकत असतो, न थांबता मागे गेलेल्या काळाचा इतिहास बनतो, चालू काळ हेच आपले वर्तमान असते, आणि उद्या आपल्यासमोर येणारे भविष्य. मानवाच्या जन्मापासूनचा इतिहास, अथांग ज्याचा अजूनही आपल्याला थांग सापडू शकत नाही. काही गोष्टी कालौघात लुप्त झाल्या काहींचे अवशेष शिल्लक राहिले. काही घटना आपल्या दिपस्तंभ बनल्या, काही पुढच्या वाटचालीस मार्गदर्शक ठरल्या. पण म्हणून इतिहासास कवटाळून बसणे आपल्याला योग्य नाही. आजच्या वर्तमानात जगताना आपले पाऊल इतिहासाच्या भक्कम आधारावर पडले पाहिजे व आपली नजर भविष्यातल्या बदलांवर हवी. तरच आपले वर्तमान सुसह्य होवू शकते.

लक्षावधी वर्षापासून माणसाने आपल्या बुध्दीने आणि कष्ट करुन आपल्यात हळूहळू बदल केला. काळ जरी अनंत असला तरी बदल हा कालानुरुप अपरिहार्यच होता. पण सुरवातीला हे बदल कासवाच्या गतीने होत होते. त्यावेळी विज्ञान तंत्रज्ञानाची जोड नव्हती. कालांतराने विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीने माणसातील बदलांचा वेग वाढला. पाषाणयुग, ताम्रयुग, लोहयुग, प्लॅस्टीक युग व आता संगणक युग, आता मोबाईल युग, नंतर काय? या स्थित्यंतरातून मानवाचा प्रवास सुरु आहे. हल्ली प्रगतीचा वेग प्रचंड वाढल्यामुळे तर जग हे खूप जवळ आल्यासारखे वाटते. जगाची (विश्वाची ) व्याप्ती तसे पाहिल्यास खूप मोठी, पण विज्ञान व तंत्रज्ञानामुळे ते खूपच लहान झाल्यासारखे वाटते. एकीकडे मोबाईल युगामुळे, इंटरनेटमुळे माणसं जवळ आलीत म्हणजे जगातल्या कोणत्याही दोन कोपऱ्यातील व्यक्ती एकमेकांशी – काही सेकंदात संपर्क साधू शकतात. पण याउलट या बदलत्या परिस्थितीने माणसं दुरावतही चाललीत. शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो याचा आपल्याला पत्ता नसतो. तशी गरज वाटत नाही. माणूस आणि त्याच्याशी संबंधीत जग संकुचित होत चालले. फार मोजकेच संबंध टिकवले जातात. पूर्वी बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, विविध सार्वजनिक ठिकाणी दोन माणसं भेटली की मनसोक्त गप्पा मारीत असत, चर्चा करीत असत. पण आता जो तो आपल्या मोबाईलवरुन बोट फिरवित असतो. वेळ यांत्रिकपणे घालवित असतो. ही विसंगतीच आजची स्थिती आहे हे आपले वर्तमान आहे मग भविष्याचे काय ?
आजचे जग गतिमान आहे विज्ञान व तंत्रज्ञानाने पर्याने माणसाने अफाट प्रगती केली आहे(?), त्यात रोज नवनवीन भर पडत आहे. मागील पिढी काळाबरोबर चालण्याचा प्रयत्न करीत होती. पण आताची पिढी काळाची पावले ओळखून काळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. भविष्यातील संभाव्य घडामोडीबाबत आतापासून विचार प्रक्रिया सुरु झाली आहे. भविष्याकडे डोळेझाक करणारा वर्ग आहेच. तसेच त्याचे गांभीर्य ओळखणाराही एक वर्ग आहे. विविध अंगांनी विविध दिशांनी होणारा हा विकास या विश्वाची पूर्ण उलथापालथ घडविणारा आहे.

यातून आता पुढे औदयोगिकीकरणाचा, आधुनिकीरणाचा वेग प्रंचड वाढणार आहे. बदलत्या काळाबरोबर आपली मानसिकता बदलत जाणार आहे. राहणीमानात बदल होणार आहे. भौतिक राहणीमान सुधारले तरी सामाजिक आधार कमी होत जाणार आहे. मानव आत्मकेंद्री बनत असून ज्यावेळी ज्ञानाची कवाडे विस्तारत आहेत त्याचवेळी मनाची कवाडे बंद होत आहेत. माणूस स्वतःची ओळख हरवून बसला आहे.

अशा परिस्थितीत आजचा विद्यार्थी प्रचंड गोंधळलेला आहे. त्याची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झालेली आहे. या विशालकाय जगामध्ये प्रवेश करता येणे त्याला अशक्य होत आहे, त्यासाठीच्या अनंत वाटा त्याला माहित आहेत पण त्यातून यशस्वी होऊन बाहेर पडण्याबाबत मात्र त्याला संभ्रम आहे. अशा संभ्रमावस्थेत आजच्या विद्यार्थ्यांना स्वतःचा विकास करणे कठिण ठरणार आहे, गुंतागुंतीचे बनणार आहे. कारण पूर्वीपासून ठराविक मार्ग प्रशस्त मानण्याचे दिवस बदललेले आहेत. बदलत्या परिस्थितीत गरजा पूर्ण बदलत आहे. नवनवीन क्षेत्र उदयास येत आहे. वैदयकीय व अभियांत्रिकी क्षेत्राबरोबर इतर क्षेत्रांचे महत्त्व वाढले आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार सर्वच विविध क्षेत्रांना महत्व प्राप्त होण अपरिहार्य ठरत आहे. गरजा या केवळ स्थानिक पातळीवरच्या न रहाता वैश्विक पातळी गाठत आहेत. इंधने, पाणी, ऊर्जा, अन्न यासारख्या मूलभूत गरजा संपूर्ण जगाला भेडसावत आहेत व त्यातूनच नवनवीन संधीही उपलब्ध होत आहेत. यातूनच तरुण पिढीला स्वतःच्या विकासाचे अनेक मार्ग सापडतील, पण स्वतःची क्षमता ओळखून त्यांनी आपण कसं मोठं व्हायचं याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. जागतिकीकरणामुळे स्पर्धाही खूप वाढलेली आहे. या स्पर्धेत आपण जगू की बुडून जाऊ याचा विचार तरुणांनी केला पाहिजे. उद्योगी बनल्याखेरीज आपला स्पर्धेत टिकाव लागणार नाही याबद्दल जाणीव निर्माण होणे गरजेचे ठरते आहे. या सर्व गोष्टींसाठी योग्य मार्गदर्शन ही त्याची महत्त्वाची गरज आहे.
यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या ज्ञानकक्षांचा विस्तार करीत रहाणे आवश्यक ठरते. हल्लीच्या मार्गांना मुरड घालून नवीन वाटा धुंडाळाव्या लागतील. आपल्या क्षमता आणि आवड त्यानुसार उपलब्ध मार्गांची ओळख करुन घ्यावी लागेल. प्रत्येक वाटेतील युक्त्या, अडथळे यांची जाणीव ठेवून आतापासूनच सद्यःस्थिती व त्यामध्ये कालानुरुप होत जाणारी स्थित्यंतरे व बदल यांची नोंद ठेवावी लागेल. माहिती अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यार्थ्यांला जो मार्ग निवडायचा आहे त्या मार्गाबद्दलचा अनुभव गोळा करावा लागेल, चाचपणी करावी लागेल. संगणक युगाने अधिकाधिक संधी जशा उपलब्ध होतील तशीच निवड करणेही तेवढेच कठिण होत आहे. त्यासाठी संगणकाचीच मदत घेऊन मार्ग काढावा लागेल. अभियोग्यता चाचण्यांची मदत घेणे अपरिहार्य ठरेल. विद्यार्थ्याने एखाद्या क्षेत्राविषयी अनुभवविश्व समृध्द करण्याचा प्रयत्न करावा जेणे करुन त्याला पुढची निवड सोपी होईल. एकंदरित आपला अनुभव कौशल्य पणाला लावून विद्यार्थ्यांना परिश्रम करावे लागतील.
मगच भावी भारताच्या जडणघडणीसाठी आजच्या विद्यार्थ्याची भूमिका तेवढीच महत्त्वाची ठरु शकेल. त्यासाठी मदत होऊ शकेल. तरुणाची उपयुक्तता, ऊर्जा, अयोग्य दिशेने वाया जाण्याऐवजी योग्य दिशेने वापरता येऊ शकेल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यास हातभार लागेल.


बलशाली भारत होवो, विश्वात शोभुनी राहो।
हे करू की ते करु
कुणाचे मी बोट धरु,
धरल तर चावतयं
सोडल तर पळतयं.
मी काय करु?
आईच एक बाबांच दुसरं
जगाची तर रीतच न्यारी
माझं नका विचारू.
जेवढ्या व्यक्ती
तेवढ्या वाटा
जेवढ जावं खोलात
तेवढा वाढतोय गुंता.
पण एक खरं
माझं आहे मजपाशी
अन मी हिंडतो दारोदारी.
माझ्यातल्या जाणीवेला
मिळावी एक दिशा,
टाकीचे घाव सोसून
माणसातल माणूसंपण जपून,
आकारहीन दगडातून
घडावे एकच शिल्प.
अप्रतिम आणि वेगळं
स्वतःच स्वत्व उमटवणारं.
कारण मीच आहे माझ्या
“जीवनाचा शिल्पकार.”

अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी घडत गेल्यास भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नक्कीच सार्थ ठरेल त्यातूनच भविष्यातील भारत सक्षमपणे उभा राहील.
माणसाला सद्‌विवेक बुद्धीचे वरदान मिळाले आहे. याचा सदुपयोग करून जर आपल्या माणसात व बाकी सर्व प्राणी व पशुपक्षी, वन्य जीवन वा वनस्पती, सगळ्यांचा आदर करून आपसात गुण्यागोविंदाने नांदण्याची कला साध्य झाली, तर समतेची व संस्कृतीची पुरातन काळापासूनची वैदिक काळातली “वसुधैव कुटुम्बकम” ही संकल्पना प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. यात शंका नाही.
|| भारत माता की जय ||

लेखक – श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
304/8 अमृतसिद्धी संकुल, टिटवाळा (पूर्व)
जि. ठाणे.
भ्रमणध्वनी 8888284265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*