शिक्षणाने ‘माणूस’ घडविला की‘बिघडवला’? – लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

भाग २

माणूसच माणसाच्या
जीवावर उठलाय
पोटासाठी, पैशासाठी
राक्षसच झालाय

माणसाच माणूसपण
बालपणातच हरवलय
तिथूनच मानवतेची
गळचेपी सुरु झालीय

देते खाऊची लाच
आईसुद्धा मुलाला
तर कसली असेल
लाज इथे कुणाला

राहिली नाही कुणाला
कर्तव्याची आस
इथूनच येतोय खरा
दुर्दैवाचा वास

राहिले नाही माणूस
माणसांच्यात प्रेम
इथे माणूसच झालाय
पैशांचाच गुलाम

काय खाणे, काय जिणे
नाही कशाचा ठाव
झाले आहे जीवन
एक पत्त्यांचा डाव

    असा हा मानवी जीवनाचा डाव उधळल्यासारखा झाला आहे. जोपर्यंत माणसाला मर्यादित ज्ञान होते. शिक्षणाचा प्रसार फारसा झालेला नव्हता, विश्वाचे कोडे फारसे उलगडले नव्हते तोपर्यंत माणसाला अदृश्य नियंत्रण शक्तीची भीती वाटत असे. त्यामुळे आपोआपच अपप्रवृत्तींना आळा बसत असे. पण हल्ली सुशिक्षित व्यक्ती अशा शक्तीला मान्य न करता आपल्याच हातात सर्व शक्ती एकवटू शकते असे मानतात. स्वतःला स्वयंपूर्ण, स्वतंत्र, कोणतीही बंधने नाहीत असे समजतात. त्यामुळे कशाचीच भीती नाही. त्यामुळे अपप्रवृतीत वाढ झाली आहे. ‘कायदा व गुन्हेगारी’ हे ‘एकमेका सहाय्य करू’ अशी हातात हात घालून वावरताना दिसते. भ्रष्टाचाराने प्रत्येकाचे हात बरबटलेले आहे. – *“माणूस बिघडत आहे.”*
      एकंदरित आपल्याला जीवन घडविणारे, माणूस निर्माण करणारे चारित्र्य घडविणारे व चांगले विचार देणारे शिक्षण हवे. पण हल्लीच्या वातावरणातून शाळाशाळांमधून असे शिक्षण मिळेल व मनुष्य घडेल अशी अपेक्षा करणे निरर्थक ठरेल. म्हणूनच मनुष्य घडणे आणि घडविणे हे तळा-गळातून, घराघरातून होणे आवश्यक आहे. त्यासाठी एखादा सगुण आदर्श डोळ्यासमोर असल्याखेरीज मानवजातीचा उध्दार होणे नाही. तसेच प्रत्येकाच्या मनात इच्छा असणेही तेवढेच गरजेचे ठरते. तसेच जीवन घड‌ण्यासाठी आदर्श असे ध्येय डोळ्यासमोर असले पाहिजे व ते साध्य करण्यासाठी प्रयत्न, परिश्रम हवेतच. आपल्या अनुभवातून चांगल्याचा स्वीकार व वाईटाचा त्याग प्रत्येकाने करावयास हवा. आपल्या भावी पीढीवर तसे संस्कार घडविले पाहिजे. पैसा कमवून केवळ पाळणाघरात मुले वाढवून जबाबदारी न झटकता प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले तर खरोखरच माणूस घडू शकेल. माणसातले माणूसपण टिकू शकेल. नको त्या बाबींचे अवास्तव महत्व झटकून टाकल्यास नक्कीच मानवतेची जपणूक होऊ शकेल. त्यासाठी स्वतःमधील सुप्त शक्ती याविषयी माणसाने जागरूक होण्याची आवश्यकता आहे. *“मनी असे हे स्वप्न दिसे”* असे म्हणतात ते उगाच नाही आणि *“आजचे स्वप्न हे उद्याचे सत्य असते”* यात शंका नाही. वैदिक साहित्य, ग्रंथ यामधून ज्ञानाचा प्रचंड साठा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा पूर्णतः विश्वासाने वापर करून फायदा करून घेतल्यास निश्चितच आपली पुढची पिढी सुसंस्कृत होऊ शकेल. *शिवाजी* घडवण्यासाठी एक *जिजाऊ* मात्र हवीच यात शंका नाही. यासाठी सुरुवात करणे मात्र आवश्यक आहे. आणि हे सुरुवात अर्थात प्रत्येकाला स्वतःपासून करावी लागेल.  *“माणूस घडवण्यासाठी.”*

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*