शिक्षणाने ‘माणूस’ घडविला की‘बिघडवला’? – लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

कॉलेजमधील विद्यार्थीनीची अमानुषपणे हत्या, शालांत परीक्षेत नापास झाल्याने आत्महत्या, शाळेच्या मुख्याध्यापिकेचा जळून मृत्यू; बेकारीमुळे आत्महत्या,…… अशा एक ना अनेक, मानवाचा विध्वंस दर्शविणाऱ्या विविध बातम्यांनी हल्ली वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरलेले आपल्या वाचनात येतात. आपण ते असहायतेने व अगतिकपणे वाचतो. ‘आपण काय करू शकतो?’ ‘आपल्याला काय करायचा!’ असे प्रश्न ठेवून वाटल्यास एखादी बरी वाईट प्रतिक्रिया व्यक्त करतो. आपल्यातला माणूस हा त्यावेळी सगळ काही समजून निष्क्रीय बनतो. याला कारण काय? माणसातली मानवता हरवली आहे काय?
खरं पाहता माणूस जन्माला येतो तेव्हापासून म्हणण्यापेक्षा मातेच्या उदरात असल्यापासून तो शिकत असतो. एवढच काय, माता- विल्पांकडे असलेले ज्ञानही थोड्याफार प्रमाणात घेऊन येत असतो. माणसाने आयुष्यभर अनुभवाने शिकायला हवे, अशी निसर्गाची अपेक्षा आहे. पण केवळ एवढयावरच माणसाचे शिक्षण थांबत नाही. हल्ली शिक्षणाला जो औपचारिकपणा आला आहे त्यामुळे ‘शिक्षण म्हणजे नेमक काय? असा संभ्रम निर्माण होतो शिक्षणाने नेमक काय साधलं? शिक्षण हे माणसाचे साध्य की साधन? अशी प्रश्नश्रृंखलाच निर्माण होते
शिक्षण महणजे केवळ शाळा कॉलेजात जाणे, आयुष्यभर आत्मसात झाला नाही तरी ज्ञानाचा भारा अस्ताव्यस्तपणे कोंबणे का ? खचितच नाही. पण हल्ली या कोंबलेल्या माहितीलाच महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण किती ज्ञान मेंदूत साठवून ठेवू शकता, ऐनवेळी आठवून किती सांगू शकता? यावरच आपल्याला मिळणारे गुण, पदव्या, काही नोकऱ्या (बाकीच्या वशिल्याने मिळतात) अवलंबून असतात. त्यामुळे शिक्षणाला हल्ली अवास्तव – अवाजवी महत्व प्राप्त झाले आहे.
नको तेवढे स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. आपल्या आयुष्याचे सार्थक होण्यासाठी आपला आत्मविश्वास, गुण, परिश्रम, कर्तृत्व याहीपेक्षा शिक्षणा‌ला जास्त महत्त्व आहे व ते आपल्याला कोणत्याही मार्गाने मिळवता आले पाहिजे, असा आजच्या समाजाचा समज झाला आहे. आपले भविष्य घडविण्यासाठी पैसा मिळवला पाहिजे, पैसा मिळवण्यासाठी शिक्षण पाहिजे आणि हवे ते शिक्षण मिळण्यास पुन्हा पैसा पाहिजे, अशा दुष्टचक्रात हल्लीचा माणूस अडकला आहे. शिक्षण म्हणजे माणसात होणारे अपेक्षित वर्तनबदल, ज्यामुळे माणसाला इतरांपेक्षा – पशुंपेक्षा वेगळे असे माणूसपण प्राप्त होईल. पण शिक्षणाने माणूस घडावा, माणसाने आपले भविष्य आपल्या हाताने घडवावे ही वृत्तीच हल्ली लोकांमध्ये दिसत नाही. पैशानेच भविष्य घडते असे कटू सत्य बऱ्याचवेळा आपल्याला सभोवती पहायला मिळते. मग याचा नेमका अर्थ काय? मानवाचा अध:पात की शिक्षणाचे अपयश ?
एकंदरित शिक्षण आणि संस्कार यांच्यात हल्ली गफलत होताना दिसते, नव्हे! फारकतच झालेली दिसते. संस्कार हे केवळ ग्रंथांची पान सजवण्याकरिता असतात का? अशी शंका निर्माण होते. अर्थात परिस्थितीत होणारा अपूर्व बदलही यास कारणीभूत ठरू शकतो. एखाद्यास अपघात झाल्यास त्याला उचलून दवाखान्यात न्यायला लोक घाबरतात. याचा अर्थ त्यांच्यावर संस्कार झालेले नाहीत असा नक्कीच नाही. कारण पोलीसांच्या चौकशीच्या दंडुक्यापुढे त्यांची मानवता शरण गेलेली असते. मग अशी परिस्थिती बदलू शकत नाही ते कसले शिक्षण? “माणसाला माणूस बनवते ते शिक्षण!” पण हल्लीच्या शिक्षणाने होणारे परिणाम पाहिले की शिक्षणाची व्याख्या बदलावी लागेल. ज्ञानाच्या विस्फोटाने- शिक्षणाने ज्ञानकक्षा विस्तारत आहे. काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणतेही ज्ञान पोहोचू शकते एवढे जग जवळ आले आहे. पण माणसाचे विचार मात्र तेवढे विस्तारले आहे का? माणसाचे मन मोठे झाले आहे का? समोर उपासमार होणारी मुले पाहून त्याचे मन द्रवते का? गरिब, दरिद्री लोकांची केवळ दिखाऊ कणव न वाटता तो खरोखरच त्यांच्यासाठी काही करतो का? की केवळ प्रसिद्धीपुरतेच ! (विश्वसुंदरी प्रमाणे!)
हल्ली शिक्षण घेण्यासाठी होत असलेली जीवघेणी स्पर्धा, राखीव जागांचे – स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी राजकारण्यांनी भिजत ठेवलेले धोंगडे, त्यामुळे जातीयतेला अप्रत्यक्षपणे मिळणारे खतपाणी, त्यातून प्रवेश मिळाल्यानंतर रॅगिंग, गुन्हेगारी, शिक्षण पूर्ण झाल्यावर निर्माण होणारी बेकारी, स्वयंरोजगारीता, व्यवसाय यातील अनेक अडचणी, अपयश यातून व्यसने, गुटखा, ड्रग्ज दारु, इ, सायबरफॅफे, इंटरनेटचे वेड इ. मुळे माणूस नेमका कुठे चालला आहे? हे प्रश्नचिन्हच आहे. त्याचप्रमाणे पालकांच्या अवास्तव कल्पना-अपेक्षांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्याऐवजी कुंठितच होतात. मने संकुचित होत आहे, आत्मकेंद्री होत आहे. परस्परांमधील विश्वास नाहीसा होत आहे. माणूस माणसापासून दुरावत आहे. माणसाने उच्च शिक्षण घेतले की तो ज्ञानाच्या जवळ जातो पण या ज्ञानाने माणूस जोडण्यापेक्षा या ज्ञानाच्या जंगलात तो एवढा अडकतो की स्वतःच्याच कोशात गुरफटून जातो. माणूस आपलेपणा विसरुन परकेपणात हरवून जातो.
शिक्षणाचे माणूस घडतो हे पूर्वजांनी दाखवून दिले आहे. पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्याकाळात माणसासमोर असलेली नीतीधर्म मुल्ये -आदर्श यामुळे जे साधले ते आज साध्य होऊ शकत नाही. आजकाल पैसा मिळवण्यासाठीच फक्त शिक्षणाचा माध्यम म्हणून वापर होऊ पहात आहे. पूर्वीच्या व आताच्या ध्येयात मुळात फरक पडल्यामुळे माणूस हा दिशाहीन मार्गक्रमण करू लागला आहे. एखादा निष्णात डॉक्टर त्याच्या शिक्षणाचा जसा विधायक – मरणपंथाला लागलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी उपयोग करतो तसा तो विघातक – गर्भपात, अवयव विक्री यासाठीही करतो हे सत्य आहे. शिक्षणाच्या कक्षा जशा रुंदावत आहे तसे त्याचा उपयोग मानवाच्या विकासाबरोबर विध्वंसालाही कारणीभूत ठरत आहे. गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. अजूनही शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या अंदमान- लक्ष्मदीप भागात तुरळकसुध्दा गुन्हे घडत नाही. मात्र शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्या-मुंबईत मात्र दिवसागणिक अनेक हृदयद्रावक गुन्हे घडतात. यावरून “शिक्षणाने माणूस घडवला का?” हे प्रश्नचिन्हच उभे राहते.
हल्लीच्या परिस्थितीत माणसाला माणसाऐवजी पैसा अधिक महत्त्वाचा वाटतो. बरेच तसे प्रसंगही येतात की जेव्हा पैशाला पर्याय नसतो. त्यामुळे माणूस पैशाच्या मागे लागला आहे. त्यामुळे पुढच्या पिढीवर संस्कार करण्यास त्याचेकडे वेळ नाही. त्यामुळे ज्या वयात मुले घडावयास हवीत त्या वयात ती दिशाहीन, संस्कारहीन होत आहेत. त्यांच्यापुढे हवे तसे आदर्श नाहीत. सगळीकडे नीतीशून्य हीन राजकारण, भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरलेला समाज, जातीधर्माचे अंधानुकरण यामुळे नवीन पिढी भरकटत चालली आहे. ‘बोले तैसा चाले’ अशा व्यक्तीची संगत दुरापास्त झाली आहे. गेल्या ५० वर्षात अशी व्यक्ती (केवळ नावाजलेली, लोकप्रिय व्यक्ती नव्हे.) निर्माण झालेली नाही. (काही अपवाद) म. गांधी, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, नेताजी बोस अशा ध्येयाने प्रेरित व्यक्ती हल्लीचे शिक्षण निर्माण करू शकत नाही. उलट अशा व्यक्तींच्या नावाने वाद मात्र निर्माण करते. यावरून शिक्षणाची परिणामकारकता लोप पावत आहे हे सिद्ध होते.थोडक्यात,

क्रमशः
👉 भाग २(अंतिम) लवकरच…….

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*