संवाद स्वतःशी – लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल लागला प्रत्येकाची टक्केवारी कळली आणि अभिनंदन congratulation याचा वर्षाव सुरू झाला. बरोबर आहे, व्हायलाच पाहिजे. कौतुक झालं पाहिजे. पण हे होत असताना बऱ्याच जणांकडून मार्गदर्शनही मिळत असते. अनेक वाटा-पळवाटा, खाच-खळगे, सगळं काही मित्र, शिक्षक, पालक, नातेवाईक प्रत्येक जण आपल्याला विविध पर्याय सांगत/ सुचवत असतो. काय उपयुक्त आहे, हे पटवून देत असतो. पण त्यामुळे आपला मार्ग मोकळा होण्याऐवजी गुंता जास्तच वाढत जातो. त्यामुळे आपली अवस्था चक्रव्यूव्हातील अभिमन्यू सारखी होते. सर्वजण आपल्याला चक्रव्यूव्हाच्या आत जाण्यास मदत करायला तयार असतात. पण तेथून बाहेर कसे पडायचे? हे कोणी सांगत नाही. तो निर्णय सर्वजण आपल्यावर सोडून देतात. मोकळे होतात. आपल्याला फक्त एवढंच कळतं अभ्यास करणे, परीक्षा देणे, टक्केवारी मिळवणे, स्पर्धेत टिकणे आणि पुढे जाणे! टक्केवारी म्हणजेच यश असा आपला समज होतो. तसा तो सर्वांचाच असतो. मुळात हाच एक गैरसमज ठरू शकतो. percentage and personality (टक्केवारी आणि व्यक्तिमत्व) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थात त्यांचा संबंध आहे. पण आपण समजतो तसा नाही. या टक्केवारीने व्यक्तिमत्व विकास होतो, आपल्याला यश मिळते, असे आपण गृहीत धरतो. पण सत्य वेगळे आहे. व्यक्तिमत्व योग्य पद्धतीने विकसित झाले तर टक्केवारी मिळवणे सोपे असते, हे वास्तव आहे. त्यामुळे आयुष्यात यश मिळवण्यासाठी केवळ टक्केवारी नाही, तर त्या सोबत व्यक्तिमत्त्व विकसित होणे आवश्यक ठरते. अगोदर आपण व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्यायला हवे. जेणेकरून टक्केवारी आपोआपच आपल्याकडे येईल आणि आपल्याला यशाकडे घेऊन जाईल. शेवटी यश हे व्यक्तीसापेक्ष असते. त्यामुळे यश कशाला म्हणायचे? याचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असते आणि त्यामुळे अर्थातच मिळणारा आनंद सुद्धा! आपण आपलं जीवन आनंदी बनवण्यासाठी टक्केवारीच्या मागे लागतो. पण या उलट आपल्या आनंदी दिनचर्येतून होणारा अभ्यास आपल्याला खरोखरच टक्केवारी कडे घेऊन जातो. त्यामुळे आपली दिनचर्या आपल्या आवडीनिवडीनुसार असायला हवी. आपण आपला मार्ग आपल्या आवडीने, आपली इच्छा, आपले स्वप्न, आपला परिसर, आपली गरज, आपल्या कुटुंबातील परिस्थिती या सर्व मुद्द्यांचा सखोल विचार करून निवडायला हवा. आपण स्वतःला ओळखायला हवं. तरच आपला प्रवास सुखद, आनंदी, आरामदायी, त्रासविरहित होईल यात शंका नाही. प्रत्येकाला आयुष्यात असंख्य संधी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला, उपलब्ध असतात. आजची संधी गेली म्हणजे सगळं संपलं असं काही नसतं. मात्र संधी सोडायची नसते, हेही तेवढेच खरं! पण काही कारणाने सुटलीच, तर रडायचं नसतं हेही तेवढेच खर! पुन्हा नव्या संधीचा शोध घ्यायचा आणि ती साधायची. यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपल्या आवडीनिवडीनुसार आपल्याला जे काही उत्तम उत्तम साध्य करता येईल त्यासाठी आपण अखंड, अविरत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व हे एक बहुरंगी चित्राप्रमाणे असते. हे बहुरंगी चित्र आपण स्वतः आपल्या इच्छेप्रमाणे रंगवायचे असते. यामधील रंग आपल्या आवडीचे असायला हवेत. या रंगांमध्ये वारंवार बदल होऊ शकतो आणि चित्राचे स्वरूप बदलू शकते. चित्र जास्तीत जास्त आकर्षक कसे होईल याचा विचार, प्रयत्न आपण वारंवार करत राहिलं पाहिजे. उपलब्ध ज्ञानाच्या अफाट सागराचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. योग्य मार्गदर्शन, योग्य पुस्तकांचे वाचन, अभ्यास, यातून आपण बरंच काही साध्य करू शकतो. आयुष्य म्हणजे केवळ एक छापील नकाशा नव्हे. आयुष्य हे सुंदर स्वप्न आहे. आयुष्याचे हे सुंदर स्वप्न आपण अधिकाधिक आकर्षक, आनंदमय करूया, त्यासाठी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा!!

लेखक – कवी विभास/कैलास भाऊलाल बडगुजर,
बी.एस्सी. बी.एड.
करिअर ॲडव्हायझर
केपी विशारद (ज्योतिष)
टिटवाळा.
भ्रमणध्वनी : 8888284265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*