व्यक्तिमत्व विकास (Personality Development) – करिअर म्हणजे काय??- लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

भाग ३

४. प्रयत्न –
आपण आपल्या आयुष्याचे सोनं करण्यासाठी, आपलं आयुष्य घडवण्यासाठी, त्याला आकार देण्यासाठी म्हणजेच एकंदरीत आपलं व्यक्तिमत्व घडविण्यासाठी, आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी दिशा ठरवली म्हणजे सार काही झालं असं नाही. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. ठरवलेल्या मार्गावर चालायचे आहे आणि यश मिळवायचे आहे. अर्थात त्यासाठी आवश्यक आहेत प्रयत्न
“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे” असं आपण म्हणतो. पण ते प्रत्यक्षात आणत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा अपयश मिळाल्याचे खापर मात्र आपण दुसऱ्यावर फोडून मोकळे होतो. अनेक कारणे सांगतो, मात्र आपण योग्य प्रयत्न केलेच नाही, हे मान्य करत नाही. पण त्यामुळे नियम बदलत नाही. कोणत्याही ध्येयासाठी, ध्येय प्राप्तीसाठी, प्रयत्न करणं अत्यावश्यक ठरते. प्रवास केल्याशिवाय आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचू शकत नाही किंवा ते एक दिवास्वप्न ठरू शकते. तसे प्रयत्न, परिश्रम केल्याशिवाय यश मिळणे, ध्येय प्राप्ती होणे हे शक्य नसते. “कष्टेविणं फळ नाही” हेच खरे! यानुसार कष्ट करणे हे अत्यावश्यक ठरते. काहीवेळा एखाद्याला कष्ट न करताच ध्येय प्राप्ती झाली असा आपला गैरसमज होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्याला नाण्याची दुसरी बाजू माहित नसते किंवा आपण ते विविध निमित्त सांगून ध्येय प्राप्तीच्या वाटेवरून पळ काढत असतो. मात्र त्याच वेळी आपण आपला “आत्मविश्वास” गमावत असतो. त्यापासून स्वतःला दूर नेत असतो व आपले आयुष्य दिशाहीन करत असतो. त्यामुळे आपले स्वतःचे नुकसान होत असते. एकंदरीत प्रयत्नांना पर्याय नाही हे आपल्याला मान्य करावे लागेल. केवळ आंब्याच्या झाडाखाली बसले की आपल्याला भरपूर आंबे मिळतील असं नाही. त्यासाठी कष्ट करणे, हालचाल करणे अपेक्षित आहे. तसेच केवळ प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटले आणि परमेश्वर प्राप्ती झाली असे होत नाही. तोच न्याय आपल्या ध्येयप्राप्ती बाबत लागू होतो आणि प्रयत्नांचे महत्व अधोरेखित होते. त्यामुळे आपण प्रयत्न करणे अनिवार्य ठरते. पुन्हा किती प्रयत्न करावे? ही शंकेची पाल प्रत्येकाच्या मनात डोकावते. प्रयत्न किती? करावेत हे व्यक्तीसापेक्ष असते. त्यामुळे येथे तुलना करणे अपेक्षित नाही. स्वतःला यश मिळेपर्यंत प्रयत्नांची शिदोरी पुरवावी लागते आणि हीच आहे यशाची गुरुकिल्ली

५. आत्मविश्वास
आयुष्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी जसे प्रयत्न करण्यास सुरुवात केली तसे यश मिळत जाते, तसा आत्मविश्वास वाढत जातो. पण सर्वांसाठी नेमकं असच घडतं असे नाही. कधीकधी अपयश सुद्धा येते आणि आपला आत्मविश्वास डळमळीत होतो. त्यामुळे आपण ध्येयप्राप्तीचा वाटेवरून दूर जातो. पण असे करून चालत नाही. धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुरुवातीलाच एखादा स्पर्धक पुढे गेला म्हणून बाकी स्पर्धक धावणे थांबवत नाही. अन्यथा स्पर्धा तिथेच संपते. स्पर्धेमध्ये घेतलेला सहभाग हा बऱ्याचदा आपल्याला यशाकडे घेऊन जातो. आपल्या मनात इर्षा निर्माण करतो. बऱ्याचदा असे होते की शेवटी दिसणारा स्पर्धा विजेता ठरतो. त्याला कारण ‘मी जिंकेन’ हा त्याचा आत्मविश्वास असतो. हेच तत्त्व आपल्याला आयुष्याच्या ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असते. आपण धेय्य गाठणार असा हा आपला आत्मविश्वास आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातो. अन्यथा आपण स्वतःला अपयशी ठरवतो. त्यासाठी अनेक कारणे सांगतो. पण अनेकांनी आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक उत्तुंग यशशिखरे पादाक्रांत केल्याची उदाहरणे आपल्यासमोर असतात. आणि ती तशी समोर ठेवूनच आपल्याला स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपलं ध्येय प्राप्त करायचे असते.

६. जिद्द
ध्येयप्राप्तीसाठी वाटचाल सुरू केली की सर्वांनाच पहिल्याच प्रयत्नात पूर्ण अपेक्षित यश मिळेलच असं नाही. अर्थात असे घडण्यास अनेक कारणं असतात. त्यामध्ये बऱ्याचदा आपण स्वतः दोषी असतो. पण तरीसुद्धा आपण लगेच आपल्या ध्येयापासून विचलित होण्याचे कारण नसते. कारण ‘आपलं आयुष्य’ हाच एक धडा असतो आणि त्याच्या अनुभवातून आपलं शिक्षण चालू असते. मिळालेल अपयश हे त्याचाच एक भाग असते. त्यामुळे त्यातूनच आपण घडत असतो हे सत्य नाकारता येत नाही. हिऱ्याला पैलू पडल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही, तसेच आपलं असतं. अपयश आल्याशिवाय यशाची किंमत कळत नाही असाही अनुभव आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणत आपण त्यातून पुढे वाटचाल सुरू ठेवायची असते आणि प्रयत्नांची साखळी तुटू द्यायची नसते. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची असते, तेव्हा कुठे यश मिळतं. हे सर्व करण्यासाठी आवश्यक असते तीच आपली जिद्द! मी हे मिळवणारच! ही जिद्दच आपल्याला ध्येयाच्या यशापर्यंत घेऊन जाते. कितीही अडचणी आल्या तरी आपल्या मार्गापासून आपल्याला विचलित करत नाही. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व घडवण्यात महत्त्वाची ठरते ती जिद्द

क्रमशः
👉 भाग ४(अंतिम) लवकरच…….

© कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)

भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*