समाज व समाजाची प्रगती, हा तसा खूप विस्तृत विषय आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास आवश्यक आहे. पण हाच विषय अनेकांच्या सहकार्याने सोपा करून थोड्या कालावधीत जास्त अभ्यास शक्य आहे. एकमेका सहाय्य करू, , अवधे धरू सुपंथ’ या न्यायाने हा एक छोटासा प्रयत्न! ही संकल्पनाच मुळात एकजुटीच्या पाया उभारणीसाठी आवश्यक आहे, ती अनेक व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांचे कुटुंब या सर्वांना एकत्र आणण्यास सहाय्यभूत ठरेल. प्रत्येकाकडे असणारे विविध गुण, एकाच विषयाचा विविध प्रकारे, विविध अंगांनी विचार करण्याच्या विविध पद्धती, विविध स्वभाव वैशिष्ट्ये यामुळे या विषयाचे अनेक पैलू उलगडण्यास नक्कीच मदत होईल आणि अशा या समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रगतीच्या ‘रामसेतू’ साठी माझा हा अल्पसा प्रयत्न – एक खारीचा वाटा !
कोणत्याही समाजाच्या प्रगतीतील महत्वाचा घटक म्हणजे शिक्षण! अर्थात हे दोन प्रकारचे अपेक्षित आहे, औपचारिक व अनौपचारिक. एकीकडे गुण-दोष, संस्कार- संवर्धन, यातून व्यक्तिमत्व विकास, तर दुसरीकडे भवितव्याची पायाभरणी. इथे इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार व नामांकित शाळा कॉलेजकडे ओढा व स्व-प्रतिष्ठा जपणे यामुळे बऱ्याचदा पाल्यांच्या शिक्षणाचे तीन-तेरा झाल्याचे दिसून येते. आर्थिक अडचणी निर्माण होतात. अशा प्रकारे घेतलेल्या शिक्षणाचा भविष्यात प्रत्यक्ष काही उपयोग न झाल्याचे दिसून येते. कारण शिक्षण घेताना पाल्याच्या व्यक्तीगत क्षमता व आवड निवड यापेक्षा आजुबाजूचे समज-गैरसमज याला आपण बळी पडलेलो असतो. याउलट काही वेळा खेडेगावांमध्ये आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव, बेताची आर्थिक परिस्थिती यामुळेही आवश्यक ते शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे शिक्षणात मागे राहिल्याने पुढची प्रगती खुंटते. एकंदरित आजकाल उपलब्ध विविध क्षेत्र-संधीचा आपल्या पाल्याच्या वैयक्तिक आवड व क्षमतेनुसार विचार होणे आवश्यक ठरते. केवळ नोकरीसाठी शिक्षण न घेता व्यक्तिमत्व विकासाकरिता शिक्षण घेणे हा हेतू असावा. व त्यापद्धतीने प्रयत्न व्हावा. शिक्षण घेताना अभ्यासाबरोबरच अनुभवाचाही व्यासंग हवा, तरच ते परिणामकारक ठरु शकते. केवळ उच्च शिक्षणाकडे आकर्षित न होता, शिक्षणातून उच्च ध्येय प्राप्तीकडे वाटचाल होण्यास मदत झाली पाहिजे. त्यातून करिअर घडले पाहिजे. याच बरोबर केवळ उच्च शिक्षण असल्यावरच करिअर घडते हे १००% खरे नाही हेही लक्षात घ्यायला हवे. शिक्षण हा करिअरचा आधार होवू शकतो पण पुरेसे शिक्षण नसलेल्या व्यक्तीही आयुष्यात प्रयत्नांती यशस्वी होतात याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्याचीही नोंद घेणे आवश्यक ठरते.

मुला-मुलींना शिक्षण देताना समान संधी दिली पाहिजे हे प्रगतीशील समाजासाठी बरोबर असले तरी मुलींच्या बाबतीत त्यांच्या केवळ गुणवत्तेचा विचार न करता, आवडी-निवडी, तसेच भावी आयुष्यातील काही संभाव्य नैसर्गिक अडचणी लक्षात येवून शिक्षणाची दिशा ठरवल्यास अपेक्षाभंग होणार नाही. अगोदर इतर प्रवाहांबरोबर शिक्षण घ्यायचे व लग्नानंतर ते निरुपयोगी ठरल्याने पश्चाताप करायचा किंवा निराश व्हायचे यापेक्षा सुरुवातीलाच सर्व बाबींचा विचार व्हायला हवा.
दुसरी अडचण म्हणजे आपल्या समाजात हल्ली मुलींच्या शिक्षणात बरीच वाढ झाली आहे. अर्थात हे समाजाची प्रगती अधोरेखित करते. बऱ्याचदा मुलापेक्षा मुली शिक्षणात जास्त यशस्वी ठरल्याचे दिसून येते, तसेच त्या सरसही ठरत आहे. पण हेच शिक्षण आपल्या समाजाच्या प्रगतीला अडसर तर ठरत नाही ना? अशी शंका येते. कारण उच्चशिक्षणाबरोबरच मुलींची तसेच मुलांचीही संस्कारापासून फारकत होत असल्याचे दिसून येते. सध्या ‘हम दो, हमारा एक किंवा दोनच!’ यामुळे मुलामुलीचे नियोजनबध्द लाड होतात. सर्व काही त्यांच्यासाठीच असा आई-वडिलांचा अट्टाहास असतो. त्यामुळे नंतर या पालकांच्या सर्वच अपेक्षा वाढलेल्या असतात. वैवाहिक संबंध जुळवताना या अपेक्षा एक अडसर ठरतो असे दिसून येतो. हल्लीच्या पिढीला सर्व काही मिळू शकते अशी एक चुकीची समज असल्यामुळे आयुष्यात अनेक वेळा ‘तडजोड’ करावी लागते हे सहसा पटत नाही. सर्व काही पैशाने मिळवता येते. यामुळे पैसा हेच या पिढीचे मुख्य ध्येय बनत आहे त्यामुळे ही पिढी दिशाहीन होत आहे.

उच्च शिक्षणामुळे मुला-मुलींच्या (की त्यांच्या पालकांच्या) अपेक्षा भरपूर वाढलेल्या दिसून येतात. मुला-मुलींचे रंग, वय, ऊंची यामधील अंतर ठराविकच पाहिजे, दोघांचे शिक्षण एकाच क्षेत्रातील असावे, वार्षिक उत्पन्न उत्तम पाहिजे, अमूक गावची सोयरीक नको, मुलीला सासू-सासरे, इतर जबाबदारी नको, स्वतंत्र वेगळे घर पाहिजे, काही वेळा मुलीचे शिक्षण पाहिजे पण लग्नानंतर नोकरी करू देणार नाही, अशा एक ना अनेक अटी व अडचणीतून लग्न जुळणे-जुळवणे कठिण ठरत आहे. यातूनही जमलेच तरी त्यांचे मनो मिलन होणे दूर पण हे अपेक्षांचे ओझेच संकुचित कुटुंबाकडे वाटचाल करते, आपल्या मुलीच्या सुखाचा एकांगी विचार करताना आई-वडिल समोरच्या बाजूचा विचार करणे टाळतात व आपल्यावर ती वेळ आल्यावर मात्र दुसऱ्याच्या मुलीला व समाजाला दोष देवून मोकळे होतात. आई ही मुलीला कुटुंब-घर सांभाळण्याऐवजी आत्मकेंद्री बनवते असे प्रकार होतात. एकंदरित नवीन पिढीसुध्दा कुटुंबाचा परिपक्व विचार करताना दिसत नाही. त्यामुळे हल्ली लग्न यशस्वी होणे कठिण ठरत असून बऱ्याचदा घटस्फोटाकडे वाटचाल दिसून येते. जेष्ठ वर्ग सुद्धा मुला-मुलींची जडण-घडण करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे तरुण पिढी व जेष्ठ वर्ग यामध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. फक्त मुली असलेल्या पालकांच्या वृद्धापकाळाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर मुले असलेल्यांचे सुध्दा विविध कारणांनी, प्रश्न निर्माण होत आहे.
एकंदरित वैचारिक बैठक कुठेतरी चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहे असे वाटते. प्रत्येकजण आपुलकी-जवळीक, नाते यापेक्षा पैशाला अधिक महत्व देताना दिसतो. ‘पैसा’ हा महत्त्वाचा ठरतो. पण ‘सर्वस्व’ नसतो हेही तितकेच खरे आहे. पण तसा अनुभव आल्याशिवाय बरेचदा हे पटत नाही आणि तसा अनुभव येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. समाजाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक कुटुंबाचा सहभाग महत्वाचा ठरतो. त्यासाठी प्रत्येक कुटुंब सुखी- समाधानी व आनंदी असण्यातूनच ती अधोरेखित होते, यासाठी तसे प्रयत्न होण्याची गरज जाणवते. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे तशी वाटचाल करणे आवश्यक ठरते.
त्यासाठी युवा पिढीने आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आवडीनुसार आपल्या भवितव्याला आकार देण्यासाठी करून घेतला पाहिजे. केवळ नोकरीवर विसंबून न राहता व्यवसाय, शेती या संधीचा सुध्दा विचार केला पाहिजे. हल्ली सर्व प्रकारची माहिती सहज उपलब्ध आहे. तसेच आपल्या समाजातही विविध क्षेत्रात अनेक यशस्वी व्यक्ती आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग, जाणीवपूर्वक योग्य दिशेने प्रयत्न, कष्टाची तयारी या प्रकारे शून्यातूनही यशशिखर गाठता येईल यात शंका नाही. यासाठी समाजातील सरकारी क्षेत्रातील अधिकारी, उद्यमशील यशस्वी उद्योजक, शेतीक्षेत्रातील प्रयोगशील व्यक्ती, खाजगी क्षेत्रातील उच्च पदस्थ व्यक्ती यांनी आपला समाजासाठी उपयोग व आपली त्यासाठी उपलब्धता याबाबत सक्रीय राहिले पाहिजे व वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. तसा प्रयत्न सध्या सुरु असला तरी ते सर्वदूर व सर्वांपर्यंत पोहोचणे तेवढे शक्य झालेले नाही, असे दिसते. त्यासाठी समाजाच्या वेबसाइटवर अशा सर्व व्यक्तींची तालुका – जिल्हा – क्षेत्र यानुसार सूची व कार्यक्षेत्र याबाबत उपलब्धता याविषयी सर्व माहिती उपलब्ध झाल्यास ने समाजाच्या प्रगतीस सहाय्यक ठरेल. आणखी एक विषय महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे ‘लग्नसोहळे’ हल्ली आम्ही हुंडा मागत नाही, मात्र लग्न थाटामाटात झाले पाहिजे, हा एक आधुनिक प्रकार बऱ्याचदा दोन्ही कुटुंबांसाठी अडचणीचे ठरतो. समाजाने या दिखावूपणातून बाहेर पडून साधेपणाकडे वाटचाल केल्यास कुटुंबाची (दोन्ही) पर्यायाने समाजाची प्रगती होण्यास हातभार लागेल. यामधून पैशाचा स्त्रोत उद्योगधंदा, शेती, व्यवसायवृद्धी यासाठी वळवता येईल. काही अनावश्यक प्रथा बंद होऊन पैशाच्या योग्य विनियोगाने समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच हातभार लागेल. नोकरी, व्यवसाय अशा अनेक कारणांनी विखुरलेला आपला समाज आधुनिक संपर्क माध्यमांच्या सहाय्याने ‘एकत्र या, एकत्र काम करा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा’ या सूत्राने एकत्र आल्यास ‘एकमेकां सहाय्य करू, अवधे धरू सुपंथ’ या न्यायाने संघटन शक्तीचा फायदा होऊन समाजाची प्रगती नक्कीच उंचावेल यात शंका नाही. मात्र त्यासाठी प्रत्येकाने कार्यरत (active) होणे आवश्यक आहे. थोडक्यात,
माणसा रे माणसा
हरवलय तुझ माणूसपण
म्हणूनच म्हणतो सावर रे
कधी येईल तुला शहाणपण – १
विसरलास सगळी तू
माणसा माणसातील नाती
पैशासाठी पळतोस वेड्या
राहिली नाही नीती ..२
घरात आहे चार माणसे
आणिक चार भिंती
पण नाही तिथे ओलावा
वाटते एकमेकांची भीती… 3
आहे एक संधी
चला, उठा, नका सोडू
सोन करू, प्रत्येकाच्या विकासाने
सगळे मिळून ‘समाज’ घडवू…४
चला सर्व ‘संकल्प’ करू
चित्र बदलवू समाजाचे
हळू हळू यश मिळवू
ध्येय गाठू ‘प्रगती’चे….५
माझी थोडक्यात माहिती
नाव : कवी विभास/ श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
: 30४, इमारत क्रमांक ८, अमृत सिध्दी, दळवी वाडा,
टिटवाळा (पूर्व) ता.कल्याण, जि.गणे 421605
भ्रमणध्वनी : 8888284265 (व्हाट्स अप नं.)
आवड / छंद
• निबंध व काव्यस्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग :
: संवेदना हा काव्यसंग्रह प्रकाशित – 2010
‘स्पंदन – मनातील लहरींचे’ दिवाळी अंक तीन वर्षे संपादन व प्रकाशन 2012 ते 2014
अनेक पुस्तकांचे संकलन व संपादन. (संस्कार भारती, ज्येष्ठ पर्व व ज्येष्ठांसाठी आरोग्य पर्व)
आपला प्रतिसाद/अभिप्राय अपेक्षित


Leave a Reply