सामान्यांचा असामान्य कार्यकर्ता – गोपाळ भेरडे यांचे दुःखद निधन
कार्याचा श्रीगणेशा विघ्नहर्ता श्री गजाननाच्या कृपेने करतात. तदवत महाराष्ट्रात, सामान्यतः सामाजिक कार्यकर्ता हा गणेश मंडळांच्या कार्यातूनच निर्माण होतो.
अमरावती शहरात पन्नास साठ वर्षांपूर्वी काही मोजक्याच गणेश मंडळांचा दबदबा होता. त्यातीलच एक राजापेठ सार्वजनिक मंडळ होते. त्यात अनेक लहान थोर कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांमधून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गोपाळ महादेवराव भेरडे यांचा उदय झाला.
शून्यातून विश्व निर्माण करणारा म्हणून त्याची ख्याती होती. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे लहानपणापासून त्यांना काबाडकष्ट करावे लागले. प्रसंगी कुदळीने खड्डे सुद्धा खोदावे लागले. जिद्दीने सायकल रिपेरिंगचे काम करीत त्यांनी हळूहळू टॅक्सी सायकलचे दुकान सुरु केले.
काही दिवसात त्यांचा जम बसल्यानंतर एक-एक पायरी वर चढत त्यांनी बिल्डिंग मटेरियल सप्लाय, ट्रक व्यवसाय, कॉन्ट्रॅक्टर अशा प्रकारचे अनेक व्यवसाय यशस्वीरीत्या केले. मातोश्री स्व. ताईबाई भेरडे यांची त्यांच्या भरभराटीमध्ये अमूल्य साथ होती. तसेच त्यांच्या भगिनी स्व. मालतीबाई (माई) भेरडे, जेष्ठबंधू स्व. भालचंद्र भेरडे, श्री सुभाष भेरडे व समस्त भेरडे परिवाराचे मोलाचे सहकार्य होते.
सोबतच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे अडचणीत असलेल्या अनेक लोकांना सर्वप्रकारे मदत करून स्वतःचे एक स्थान निर्माण केले. कोणाच्याही संकटाच्यावेळी रात्रीबेरात्री ते स्वतः धावून जात असत. अशाच एका रात्री इतवारा बाजार परिसरात आग लागली होती. त्यावेळी सर्वप्रथम पाण्याचे टँकर विनामूल्य नेवून त्यांनी आग विझवण्यास मदत केली.
एकदा म.न.पा. सफाई कर्मचाऱ्यांच्या महिला कामगार व पुरुष कामगार यांना समान वेतन व वेतनवाढ मिळावी आणि अमरावती सूतगिरणी कामगारांसाठी यशस्वीरीत्या आंदोलन केले.
सन १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातील मतदारांचा काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ होता. सर्व जनतेने तनमनधनाने कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार भाई सुदाम देशमुख यांना सहकार्य केले. त्यावेळी भाईंच्या प्रचाराची व इतर सर्व जबाबदारी प्रामुख्याने गोपाळ भेरडे यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमरावती शहरामध्ये कम्युनिस्ट पार्टीचा खासदार, न भूतो न भविष्यती असा पहिल्यांदा विजयी झाल्याबद्दल संपूर्ण भारतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
सन १९९६ मध्ये अकल्पितपणे भाजपाचे श्री अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान पदाकरिता मा. राष्ट्पती शंकरदयाल शर्मा यांनी आमंत्रित केले होते. त्यावेळी गोपाळ भेरडे यांना अत्यानंद झाला होता. उत्साहाच्याभरात त्यांनी राजापेठ रेल्वेगेट ते गोपाल टॉकीज पर्यंतचा परिसर विद्युत रोषणाईने लखलखीत केला होता. दुर्दैवाने अटलबिहारी यांनी बहुमत सिद्ध न केल्यामुळे फक्त १३ दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. परंतु गोपाळ भेरडे यांना त्याची ना खंत होती ना, ना दुःख. आज नाहीतर उद्या अटलजी पंतप्रधान होणारच हा त्यांचा दृढ आत्मविशास होता. कालांतराने तो पूर्ण देखील झाला.
बालाजी प्लॉट येथील श्रीराम नवमी शोभायात्रे मध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग राहत असे. तसेच वर्ष कॉलनी व परिसरामध्ये मित्रमंडळींच्या सहकार्याने श्रीराम मंदिराची मुख्य जबाबदारी सुद्धा ते पार पाडीत. त्यात शोभायात्रा व हजारो लोकांना महाप्रसाद वितरणाची जबाबदारी अत्यंत चोखपणे ते करीत असत.
महानुभाव पंथातील बांधवांची शोभायात्रा, सिंधी बांधवांची चेत्रीचंद्र मिरवणूक व इतर सर्व प्रकारच्या यात्रांचे ते राजापेठ येथे स्वागत करून जलपान, अल्पोपहार वगैरेची स्वखर्चाने व्यवस्था सुद्धा करीत असत.
बैलांचा पारंपरिक सण पोळा त्याचे राजापेठ येथील आयोजन त्यामध्ये जागेची साफसफाई करणे, पाणी शिंपडणे, तोरणे बांधणे, सजावट करणे, यात्रेतील दुकानांची व्यवस्थित मांडणी करणे याची संपूर्ण व्यवस्था ते स्वतः जातीने करीत असत. त्यांची अर्धांगिनी माजी नगसेविका व भा.ज.पा. कार्यकर्त्या श्रीमती शारदाताई भेरडे यांची सुद्धा प्रत्येक क्षणी त्यांना साथ असायची.
सर्व जातीधर्मामध्ये त्यांचा मित्रपरिवार होता. कोणत्याही प्रकारे भेदभाव न ठेवता लहानथोरांशी ते मिळून मिसळून व समानतेने वागत, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत व संकटकाळी तत्परतेने धावून जात. अशा सामान्यांच्या असामान्य कार्यकर्त्यास माझ्या परिवार व गुजर/बडगुजर समाज विकास अमरावती, तसेच अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि वेब पोर्टल टिम तर्फे विनम्र अभिवादन.
रामकृष्ण पां. भेरडे
अमरावती


Leave a Reply