सर्वांनी संपूर्ण आवश्य वाचा करियर साठी देखील चांगले आहे.
देशातल्या शेतकर्यांना स्वावलंबी बनवायचे असेल तर त्यांना विविध प्रकारचे जोडधंदे उपलब्ध करून दिले पाहिजेत, असे वारंवार सांगितले जाते. अशा जोडधंद्यांमध्ये अलीकडच्या काळात कृषी पर्यटन नावाचा एक जोडधंदा वेगाने पुढे येताना दिसत आहे. त्याला अधिक गती मिळावी यासाठी जागतिक पातळीवर आज म्हणजे १६ मे रोजी जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा जात आहे.
कृषी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून वर्ष २००९ पासून १६ मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या ‘जागतिक पर्यटन संघटने’ कडून त्याला मान्यता देण्यात आली आहे.
या निमित्ताने या व्यवसायाचे स्वरूप, फायदे आणि त्यातील संधी याचा मोठ्या प्रमाणावर विचार केला जात आहे. भारतामध्ये बहुसंख्य लोक शेतीशी निगडित आहेत, असे वारंवार म्हटले जाते. परंतु, हळूहळू शेती करणार्यांची संख्या कमी होत आहे. आणि देशातले जवळपास ५० टक्के लोक शेतीपासून आणि पर्यायाने निसर्गा पासून दूर चालले आहेत. परिस्थिती नुसार आणि बदलत्या जीवनशैली नुसार हे लोक शेतीपासून दूर जात असले तरी त्यांच्या मनातले निसर्गा विषयीचे आकर्षण कमी झालेले नाही. कधीतरी शेतात जावे, हिरव्या पिकातून फिरावे, कालव्यातल्या पाण्यातून नाचावे, विहिरीत डुंबावे, बैलगाडीतून सफर करावी आणि हिरव्यागार आंब्याच्या झाडाखाली निसर्गातला थंडावा अनुभवत शांतपणे झोपावे, असे प्रत्येकालाच मनातून वाटते. एकदा अशी झोप संपली की उठून हुरडा खावा, चुलीवर भाजलेली गरम भाकरी आणि चवदार वांग्याची भाजी यांच्यावर ताव मारावा असेही प्रत्येकाला वाटते. अशा प्रकारे शेतात एक दिवस काढला की माणूस ताजातवाना होतो आणि शहरातल्या आपल्या धकाधकीच्या जीवनातील दगदग सहन करण्याची नैसर्गिक ऊर्जा त्याला मिळते.
शहरातल्या लोकांचे असे थंड हवेत येणे शेतकर्यांनाही फायदेशीर ठरू शकते. त्यातून त्यांचा कृषी पर्यटन हा व्यवसाय होतो. शहरातल्या लोकांना शेतातली मजा उपभोगता यावी यासाठी काही विशेष सोयी शेतकर्यांनी आपल्या शेतात निर्माण केल्या तर त्याला त्यातून चांगले उत्पन्नही होऊ शकते आणि एक प्रकारचा जोडधंदा उपलब्ध होतो. शहरातला माणूस अशा प्रकारच्या एक दिवसाच्या शेताच्या सफरीसाठी शेतकर्याला दरडोई ५०० ते १००० रुपये सहज देऊ शकतो. जे त्या शेतकर्यासाठी खूप असतात. अमेरिकेत हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. अमेरिकेतील मनुष्यबळाचा ६ टक्के इतका हिस्सा कृषी पर्यटनात रोजगार कमवत असतो. भारतातही असे होऊ शकते आणि शेतकर्यांना एक वेगळाच जोडधंदा उपलब्ध होऊ शकतो.
सद्यस्थितीला ५०० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे महाराष्ट्रात आहेत, असे कृषी पर्यटन विकास मंडळाने (ATDC) नमूद केले आहे. कृषी पर्यटनाचे दिसणारे सकारात्मक परिणाम महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वाढीसही नक्कीच पूरक ठरतील अशी आशा आहे.
कृषी क्षेत्रातील करिअर संधी…
बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्या कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी जाणवतो. देशातील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात या या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी संधी आहे.
पात्रता : बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम…
1) बी.एस्सी (कृषी)
2) बी.एस्सी (उद्यानविद्या)
3) बी.एस्सी (वनशास्त्र)
4) बी.एफ.एस्सी
5) बी.एस्सी (कृषी जैवतंत्रज्ञान)
6) बी.एस्सी (पशुसंवर्धन)
7) बी.टेक (अन्नशास्त्र)
8) बी.बी.ए. (कृषी)
9) बी.टेक (कृषी अभियांत्रिकी)
10) बी.एस्सी (गृहविज्ञान)
प्रवेश प्रक्रिया : कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीला मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी धरण्यात येते. शेती विषय बारावीला घेतला असल्यास त्याचे १० गुण वाढीव मिळतात. ७/१२चा उतारा असणाऱ्या शेतीधारकांच्या तसेच भूमिहीन शेतमजुरांच्या (तहसीलदार/नायब तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक) पाल्यासाठी १२ टक्के वाढीव गुण प्रवेशासाठी धरले जातात.
करिअर संधी…
महसूल विभाग, वन विभाग, पोलीस खाते, वित्त विभाग इत्यादी विभागांमध्ये वर्ग-१, वर्ग-२ पर्यंतच्या सर्व पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी/ विकास अधिकारी, अन्न महामंडळ, पणन महामंडळ व खादी ग्रामोद्योग या ठिकाणीही कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
ही आहेत कृषि विद्यापीठे…
▪ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर, 413722
http://mpkv.mah.nic.in
▪ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, 444104
http://pdkv.mah.nic.in
▪ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, 431402
http://mkv2.mah.nic.in
▪ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, 415712
http://www.dbskkv.org

Leave a Reply