आपणा सर्वांना माहित आहे की वाढते प्रदुषण,व्यसन, किटकनाशक, खत यांचा बेसूमार वापर, भेसळयुक्त अन्न, ताणतणाव, जीवाणु संक्रमण, अशुद्ध पाणी इ. कारणांनी व्याधी होत असतात. पण अति प्रमाणात पाणी पिण्याने देखील व्याधी होऊ शकतात, हे कित्येकांना माहित नसते. पाण्याची गरज किती असते ? आपल्या शरीराला नेमके किती पाणी गरजेचे असते ? योग्य प्रमाणात पाणी पिण्याची सवय का असावी ? पाणी केव्हा आणि कसे प्यावे ? इ. गोष्टींचा उहापोह या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे….
मूत खडा म्हणजे स्टोन हा सर्रास आढळणारा आजार असून या आजारा विषयी परिपुर्ण माहिती सर्वसामान्य जनतेला नसली तरी त्यावर करण्यात येणा-या उपचाराची माहिती मात्र अनेकांना असते. तो उपचार म्हणजे भरपुर प्रमाणात पाणी पिणे. अनेक रुग्णांकडून किंवा वर्तमान पत्रातून सर्व सामान्य जनतेस अनेक आजारांविषयीची माहिती मिळते त्यातून काही समज-गैरसमज पसरु शकतात.त्यापैकीच एक गैर समज असा आहे की भरपुर प्रमाणात पाणी पिण्याने मुतखडा होत नाही. शरीर आणि आतडे स्वच्छ राहतात. पाणी पचवण्यासाठी शक्ती लागत नाही, उत्साह येतो, किडणी स्वच्छ राहते इ.
अति सर्वत्र वर्ज्यते – असा एक सर्वसामान्य नियम आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. कित्येक लोक अधिक पाणी प्या असे ऐकुन-वाचून त्याचा अतिरेक करतात. आपल्या शरीराला पाण्याची जेवढी गरज आहे तेवढे पाणी आपण अवश्य घ्यायला हवे, त्या पेक्षा कमी अथवाअधिकनक्कीच नको.दिवसभरात म्हणजे २४ तासात आपल्या शरीराला किती पाण्याची गरज असते ?या प्रश्नाच ढोबळ मानानं उत्तर ४ ते ५ लिटर असं देता यीएल. मात्र हे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक ऋतुत तंतोतंत बरोबर नाही. शरीराला पाण्याची गरज किती? हे पुढील गोष्टींबर अवलंबून असते…..
१. प्रकृती – मनुष्याची पित्त प्रकृतीअसल्यास इतरांपेक्षा थोडे अधीक पाणि घेणे आवश्यक असते.
२. वय – वयानुसार पाण्याची गरज कमी-अधीक असते.
३. ऋतु – उन्हाळ्यात पाण्याची गरज अधीक असते कारण घामाद्वारे शरीरातील जलांश कमी होत असतो. तर हिवाळा आणि पावसाळा या ऋतुत पाण्याची गरज त्या मानानं कमी असते.
४. शरीराचे वजन – वजन अधिक असल्यास पाण्याची गरज देखील अधिक असू शकते.
५. राहण्याचे ठिकाण – उष्ण प्रदेशात, समुद्र किनारी, समुद्र सपाटी पासून खूप उंचावर राहणे या गोष्टी देखील शरीरची पाण्याची गरज बदलवितात.
६. कामाचे स्वरुप – बैठे काम, सतत प्रवास, उष्णते जवळ काम, उन्हात फिरणे, ए. सी. मध्ये काम, विविध प्रकारचे खेळाडू इ. व्यक्तींच्याकामांचे स्वरुपावर शरीराच्या पाण्याची कमी अधीक गरज भासते.
७. आजारपण – खूप दिवसांच्या आजारपणानंतर काही दिवस थोडे अधिक पाण्याची गरज असते, अशा वेळी विविध सूप, पेज, फळांचे रस इ. देतात.
८. सूतीका – बाळ अंगावर दूध पित असतांना स्त्रीयांना अधीक पाण्याची गरज असते, म्हणून बाळंतीण स्त्रीला विविध पेय देतात.
९. आहार पद्धती – नेहमी कोरडे अन्न (टोस्ट-कोरडी भाजी) घेणा-या व्यक्तींना थोडे अधीक पाणी घेण्याची गरज असते पण जे व्यक्ती आहारात पातळ भाजी, सूप इ. घेतात तसेच इतर वेळी फलाहार भरपुर प्रमाणात करतात त्यांना पाण्याची गरज त्या मानाने कमी असते.
तहान लागणे – भूक लागणे, मल-मूत्र विसर्जन करणे, निद्रा घेणे इ. शरीराच्या मुलभूत गरजा आहेत, यांची संवेदना होताच त्या गरजा पूर्ण करणे आवश्यक असते. शरीराची गरज पूर्ण न केल्यास आरोग्याची हानी संभवते. पाण्याच्या बाबतीत विचार केल्यास कित्येक व्यक्ती आपल्या गरजेपेक्षा अधिक पाणी पितात तर काही व्यक्ती खुप कमी पाणी पितात.
ऑफिस मध्ये काम करणारे किंवा काही व्यापारी आपल्या कामाचे व्यापात कित्येक तास पाणी पित नाहीत तर काही महाभाग पाणी प्याल्याने सारखे लघवीला जावे लागेल म्हणून पाणी पित नाहीत. कामाचे व्यापाने कित्येक तास पाणी न पिणारे काही व्यक्ती वेळ मिळाल्या नंतर एकाच वेळी खूप प्रमाणात पाणी पितात तर काही व्यक्ती जेवतांना किंवा जेवणानंतर लगेच १ ते २ लिटर पाणीएकाच वेळीपितात, हे देखील आजार निर्माण करण्यास प्रमुख कारण ठरते. आयुर्वेदात म्हटले आहे –
अजीर्ण भेषजं वारि जीर्णे वारि बल प्रदम !
भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम ‼
अपचन झाल्या नंतर कोमट पाणि पिल्याने ते औषधी ठरते, भोजन पचल्या नंतर पाणी पिणे बलदायक, शक्ती देणारे ठरते, भोजनाचे मध्ये थोडे थोडे पाणि पिणे अमृता प्रमाणे लाभ देणारे ठरते, तर भोजनाचे शेवटी पाणी पिणे विषा सारखेच असते. म्हणजे ते पचन क्रिया बिघडवून व्याधी उत्पन्न करण्यास कारण ठरते.
खुप तहान लागल्या नंतर लोक एकाच वेळी १ ते २ लिटर पाणी पितात, शरीरासाठी २०० मि.लि. ते २५० मि.लि. म्हणजे एक ग्लास पाणी एवढीच त्यावेळीची गरज असते परंतु मानसिक तृप्ती साठी खुप पाणी घेतले जाते. थोडे थोडेपाणी थोड्या थोड्या कालावधीने घेतल्यास शरीराची गरज योग्य प्रकारे भागविली जाते.
अधीक प्रमाणात चहा-कॉफी, शीत पेय घेणा-या व्यक्तींना तसेच मद्यपान-तंबाखु-बार-धुम्रपानाचे व्यसन असणा-यांना पाण्याची किती गरज आहे याचा अंदाज समजत नाही, या व्यक्तींना कदाचीत पाण्याची गरज अधीक असू शकते. अशी व्यसने टाळावीत. विविध आजारांमध्ये औषधी सिद्ध जल – औषधी पाणी वापरले जाते यात प्रामुख्याने – धणे भिजवून गाळलेले पाणी, सोने टाकून उकळलेले पाणी, चांदीच्या-तांब्याच्या भांडयात ठेवलेले पाणी, रुद्राक्ष ठेवलेले पाणी, तुळस पानं, मंजुळा टाकून ठेवलेले पाणी, वाळा टाकलेले पाणी, गरम पाणी, उकळून थंड केलेले पाणी इ. चा समावेश होतो.
तहान लागणे ही संवेदना शरीराला पाण्याची गरज असल्याचे द्योतक असल्याने तहान लागताच पाणी प्यायला हवे. एका वेळी १०० मि.लि. ते १५० मि.लि म्हणजे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी प्यावे. उन्हाळ्यात थोडे अधीक पाणी घेता येते. जेवण करीत असतांना एक एक घोट पाणी पित रहावे. पुर्ण जेवणाचे संदर्भात एक ग्लास पेक्षा अधीक पाणी पिऊ नये. जेवणा नंतर लगेच पाणी पिऊ नये, अर्धा ते एक तासाने तहान लागल्यास पाणी प्यावे.
योग्य प्रमाणात प्राशन केलेले पाणी अमृता प्रमाणे जीवन देणारे असते अन्यथा विषा प्रमाणे मारक किंवा विविध व्याधींना उत्पन्न करणारे असते.

Leave a Reply