वैश्विक परिवार निर्माण करणारा महान दार्शनिक परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्म शताब्दी निमित्त विशेष लेख : श्री. महेश रामकृष्ण बडगुजर, नाशिक

परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्म शताब्दी निमित्त…

वैश्विक परिवार निर्माण करणारा महान दार्शनिक…

‘देह झाला चंदनाचा’ ही कादंबरी लिहिण्याच्या निमित्तानं प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले तथा पूजनीय दादाजींच्या वारंवार भेटी होत होत्या. त्या भेटींमधून त्यांचं जीवन आणि विचार समजून घेतानाचा तो कालखंड माझ्यासाठी सुद्धा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांचे तेजस्वी विचार ऐकून माझं मन थक्क होऊन जात असे.
एकदा ते मला म्हणाले, चॅरिटी काय केवळ टाटा-बिर्लांनीच करावी..? चॅरिटी करून जर पुण्य मिळणार असेल तर केवळ पैसे नाहीत म्हणून गरिबांना ते पुण्य का मिळू नये..? या विचारानं मला बौद्धिक चक्कर आली.

एकदा एखाद्या प्रयोगाचा मनात निर्णय झाला की सुयोग्य काळात ते त्याची कार्यवाही करीत असत. कोळी बांधवांपुढे अर्थात सागरपुत्रांपुढे त्यांनी तो विचार मांडला. सागरपुत्र म्हणाले, दादा, आम्ही आमचा चरितार्थ कसाबसा चालवतो. एवढा दानधर्म कुठून करणार..?

पांडुरंगशास्त्रींनी त्यांना समजावलं, तुमच्याकडे धन-द्रव्य नसेलही, पण भगवंतानं तुम्हाला घाम तर दिला आहे..!
मग त्यांनी प्रयोग समजावला, रोज तुम्ही तुमच्या स्वत:साठी – मासेमारीसाठी नावा घेऊन जाता. आता महिन्यातला एक दिवस तुम्ही देवासाठी नाव न्यायची. त्या दिवसाचा गाळलेला घाम देवाचा. उत्पन्नही देवाचं..!

प्रयोग सिद्ध झाला. महिन्यातला एक दिवस सागरपुत्रांच्या नावा देवासाठी सागरात जाऊ लागल्या. पहिल्या वर्षाअखेर त्यांनी पंचवीस लाखांची चॅरिटी उभी केली. दुसर्‍या वर्षी तीस तर तिसर्‍या वर्षी चाळीस लाखांची चॅरिटी त्या सागरपुत्रांनी घामदानातून निर्माण केली. पांडुरंगशास्त्री नेहमी म्हणायचे, I can do ही वृत्ती जोपासली तर आपण हवं ते दिव्य करू शकतो.

केवळ प्रयोग उभे करणं हा पू. दादांच्या कार्याचा हेतू मुळीच नव्हता. ‘आहे रे’ (Haves) आणि ‘नाही रे’ (Have nots) अशा दोन्ही वर्गांमधला माणूस एकदिलानं जवळ आणणं महत्त्वाचं होतं. ते म्हणायचे, डोकी उडवून कधीच प्रश्न मिटणार नाहीत – डोकी (विचारांनी) बदलून मिटतील..! आणि ती गोष्ट त्यांनी लाखो जनांचा स्वाध्याय परिवार निर्माण करून सिद्धही केली. अशा चाळीस-पन्नास प्रयोगांमधून त्यांनी समाजातल्या सर्व थरांना एकत्र आणलं. कोट्यधीश आणि शेतमजूर एकत्र बसून स्वाध्याय करू लागले. वाईट चालीरीती, भ्रष्टाचार, खून-मारामार्‍या, स्मगलिंग सह घरगुती प्रश्नही स्वाध्यायमध्ये मिटू लागले. एक-दोन नव्हे, तर हजारो गावं पूर्णत: स्वाध्यायी झाली. केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या जवळपास ३२ देशांमध्ये हे कार्य मोठ्या संख्येनं विस्तारित झालं. कोणत्याही प्रसारमाध्यमाचा आधार न घेता ‘हार्ट टू हार्ट’ आणि ‘हट टू हट’ संपर्कातून त्यांनी हे कार्य उभं केलं. एक आचार, एक विचार आणि एक उपासना पद्धतीतून काही कोटी जनांचा परिवार निर्माण करणं हे एकविसाव्या शतकातलं एक आश्चर्यच म्हणावं लागेल..!

या अनोख्या परिवाराला पू. दादाजींनी भक्तीची बैठक दिली. भक्तीची समज रुजवली. ईश्वरी विचारापासून जो विभक्त राहू शकत नाही तो भक्त. भक्ती ही कृती नसून वृत्ती आहे.

‘Bhakti is a social force.’ नाश पावणार्‍या सांस्कृतिक मूल्यांचा जीर्णोद्धार करणं हे प्रभुकार्य आहे. ही सुद्धा भक्ती आहे. भक्तीची ही समज केवळ रूढीतून आलेली नव्हती. त्यामागे त्यांचं प्रचंड विचारमंथन होतं. प्रचंड व्यथा होती. लहानपणापासून अवती भवती पाहिलेल्या दारुण वास्तवाची प्रेरणा होती. त्यासाठी लागणारी वैचारिक बैठक अभ्यासातून तयार झाली होती.

त्यांचे पिताश्री वैजनाथशास्त्रींनी त्यांना पाठशाळेचं शिक्षण दिलं होतं. बारा वर्षांचा अभ्यासक्रम पू. दादाजींनी केवळ सात वर्षांत पूर्ण केला. वेदोपनिषदं, न्याय, व्याकरण, दर्शनशास्त्र, भगवद्गीता त्यांना मुखोद्गत होतीच, पण जोडीला शेक्सपिअर, विल ड्यूरंड, बरट्रांड रसेल, कांट, व्हाइटहेड, मार्क्स अशा अनेक पाश्चात्त्य विद्वानांच्या ग्रंथांचाही सखोल अभ्यास होता. श्रीकृष्ण जेवढा त्यांच्या आवडीचा तेवढाच लेनिन आवडीचा होता. मार्क्सला तर ते ऋषी मानत. ऋषींची परमकारुणिक वृत्ती मार्क्सकडे होती, असं ते म्हणत. जे जे उत्तम-उदात्त, मग ते जगातल्या कोणत्याही भागात निर्माण झालेलं असो, ते त्याचा आदर करायचे. म्हणूनच त्यांच्या स्वाध्याय-विचारांना संकुचितता आली नाही. जगाच्या व्यासपीठावर बोलताना ते म्हणत, ‘Be good Christian- be Swadhyayee, Be good Muslim and be Swadhyayee.‘ याच विचारसरणीमुळे स्वाध्याय परिवारात अनेक धर्मांचे लोक आज कार्यरत आहेत. व्हॅटिकन सिटीमधल्या चर्चमध्ये आणि परदेशातल्या अनेक मशिदींमध्ये प्रवचन दिलेला हा एकमेव महात्मा असावा..!

परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले

शिकागोला स्वामी विवेकानंदांनी विश्वधर्म परिषद गाजवली. पू. दादाजींनी जपानमधे 1954 साली द्वितीय तत्त्वज्ञान परिषद गाजवली.

स्वामीजींप्रमाणेच पांडुरंगशास्त्रींनाही तिथे अनेक ऑफर्स मिळाल्या. त्या मनाआड करून त्यांनी भारतात कार्यारंभ केला. पू. पांडुरंगशास्त्रींच्या विचारांचा आणि कार्याचा आवाका समजून घेऊन बेटी एन्टरबर्ग नावाच्या एका अमेरिकन विदुषीनं अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये एक पेपर वाचला. त्यात तिनं म्हटलं होतं, ‘A silent but singing revolution is taking shape in India… आज जगाला या ‘गाणर्‍या’ क्रांतीची कल्पना नाही, पण एक दिवस संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागेल..!

टेम्पल्टन अ‍ॅवॉर्ड, मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड, गांधी अ‍ॅवॉर्ड, हाउस ऑफ लॉर्डतर्फे मानसन्मान यांसह शंभरावर पुरस्कार देऊन जगानं बेटी एन्टरबर्ग यांच्या भाकिताचा आदरच केला, असं म्हणावं लागेल. पण या मानसन्मानां पेक्षा सामान्य माणसा विषयी, त्याच्या उत्कर्षा विषयी पांडुरंगशास्त्रींना तथा पू. दादाजींना चिंता लागून राहिलेली असायची. ही गोष्ट मी अनेकदा अनुभवली.

एकदा मला म्हणाले, परिभाषा येत असेल तरच संस्कृत भाषेचा खरा अर्थ अापण समजू शकतो. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीचा आपण वेगळा अर्थ लावला. एक जीव दुसर्‍या जीवाला मारून जगतो. प्राणिसृष्टीच्या बाबतीत ते खरं असेल पण विचारी माणसांसाठीही हाच अर्थ असू शकेल का..?

मग त्यांनी अर्थ सांगितला, एक जीव दुसर्‍याच्या उबार्‍यावर जगतो. मनुष्य-सृष्टीसाठी हाच योग्य अर्थ ठरेल.
याचप्रमाणे survival of the fittest या म्हणीवरही त्यांचा आक्षेप असायचा. जो समर्थ आहे तोच जगेल. मग ङ्गार मोठ्या संख्येनं असलेल्या असमर्थांचं काय? त्यांनी मरायचं? ते म्हणायचे, why not make unfit to fit..? असमर्थाला समर्थ का नाही बनवायचं..?

या दोन्ही म्हणींचे केवळ नवे अर्थ सांगून दादाजी थांबले नाहीत तर त्यांनी ते प्रत्यक्षात आणून दाखवले. लाखों मधलं चैतन्य दुसर्‍या चैतन्य धारीला उबारा देतं. जो समर्थ नाही तो केव्हा समर्थ होऊन जातो हे समजतही नाही. दादा म्हणायचे, अरे, विश्वातील चैतन्य तुझ्या हृदयात येऊन राहिलं आहे मग तू दीन-अगतिक का? तुझा कणा मोडलेला का? उलट तुझ्या हृदयात भगवंत येऊन राहिला आहे हा तुझा केवढा गौरव आहे..! Post, position आणि Possession वरून माणूस छोटा किंवा मोठा ठरू शकत नाही.

नियमित स्वाध्याय मधून, प्रवचनां मधून पांडुरंगशास्त्रींचे असे शेकडो विचार ऐकलेला तरुण ताठ मानेनं जगू लागला. भक्ताला दीनदुबळा, लाचार, अगतिक न बनवता पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्यायींचं जीवन अस्मिता, तेजस्विता, कृतज्ञता आणि नम्रता या गुण विशेषांनी फुलवलं.

भगवद्गीतेत भगवंतांनी निष्काम कर्मयोगाची महती वारंवार कथन केली आहे. हा निष्काम कर्मयोग पांडुरंग शास्त्रींनी लाखो स्वाध्यायींमध्ये भावफेरी, भक्तिफेरी मधून सहजगत्या उतरवला. यज्ञ, तीर्थयात्रा, मंदिर, एकादशी यांमागील मूळ हेतूंचं पुनरुज्जीवन केलं. दादाजींच्या कन्या सौ. जयश्री दीदी आज हे कार्य समर्थपणे पुढे चालवीत आहेत. अनेक नवीन प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत. गीताजयंतीच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी चाळीस लाख तरुण सहभागी झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त होणार्‍या पथनाट्यातून स्वाध्याय विचार त्यांनी या वर्षी एक कोटी लोकांपर्यंत नेला. याचं श्रेय आदरणीय दीदींकडे जातं.

पूजनीय दादांच्या सह धर्मचारिणी म्हणजे पू. निर्मलाताई. ताई म्हणजे तळपत्या सूर्या मागचा सदोदित तेवलेला जणू नंदादीपच..! (रावसाहेब हे असेच आदरणीय दीदींच्या कार्यामागे समर्थपणे उभे आहेत.) आज जे प्रचंड असं स्वाध्याय कार्य उभं राहिलं त्यामागे ताईंचं दादाजींना मिळालेलं सक्रिय पाठबळ सुद्धा कारणीभूत आहे. जी शिस्त आज स्वाध्याय परिवारात दिसते त्याचं श्रेय दादांप्रमाणेच ताईंकडेही जातं. 1986 सालच्या मार्च महिन्यात प्रयाग संगमावर स्वाध्यायींचं तीन दिवसांचं निवासी शिबिर झालं. या ‘तीर्थराज मीलन’ शिबिरासाठी पाच लाख लोक देशा-परदेशातून आले होते. इतक्या मोठ्या संख्येचं निवासी शिबिर प्रथमच भारतात होत होतं. असंख्य स्वाध्यायी आपलं उचललेलं काम निष्ठेनं पार पाडीत होते. अनेक महिने या विशाल शिबिराचं नियोजन चाललं होतं. स्वाध्याय परिवाराच्या या आणि अशा अनेक कार्यक्रमांच्या व्यवस्थापनात पू. ताईंचा प्रमुख सहभाग असे.

‘देह झाला चंदनाचा’ या कादंबरीच्या निमित्तानं या अनोख्या परिवाराविषयी मला बरच काही जाणून घेता आलं हे मी माझं भाग्य समजतो. पू. दादाजी आणि पू. निर्मलाताई यांच्यासमवेत, सान्निध्यात व्यतीत केलेला तो तीन वर्षांचा काळ म्हणजे माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस होते. आजच्या दिशाहीन स्पर्धेच्या काळात पू. पांडुरंगशास्त्रींच्या कार्याचं देदीप्यमान स्वरूप डोळ्यांत भरतं.

19 ऑक्टोबर रोजी पू. पांडुरंगशास्त्रींच्या शताब्दी वर्षारंभा निमित्त त्यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन..!

संग्रहित – श्री. महेश रामकृष्ण बडगुजर.

1 Comment

Leave a Reply to रामकृष्ण बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*