?⚕ अॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ उपाय
अॅसिडिटी म्हणजे आम्लपित्त. याची मुख्य लक्षणे म्हणजे मळमळणे, डोके दुखणे, तोंडाची चव कडवट होणे. अॅसिडिटीचा आणखी एक प्रकार म्हणजे खूप जळजळ होणे, छातीत आग होणे, डोळ्यांची जळजळ होणे. अशा वेळी उलटी, मळमळणे ही लक्षणे असतातच असे नाही.
बऱ्याचदा अगदी साधे जेवण आहारामध्ये घेतले तरी अॅसिडिटीचा त्रास होत असल्याची तक्रार अनेक जण करतात. याला कारण आहे धावपळीचे दैनंदिन आयुष्य, बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, जागरण, बदललेले आहाराचे स्वरूप. त्यावरील उपाय जाणून घेऊयात…
1) आहाराच्या वेळा पाळा : जर तुम्हाला सातत्याने अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आहारांच्या वेळा योग्य आहेत का याची एकदा खात्री करून घ्यावी.
सकाळची न्याहारी सर्वसाधारणपणे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घ्यावी. न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार ते पाच तासांचे अंतर असायला हवे. हे शक्य नसेल तर न्याहारीमध्ये पोळी-भाजी खावी. दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मधल्या वेळात हलक्या पदार्थाचे सेवन करावे.
2) पथ्ये सांभाळा : सातत्याने अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास शिळे पदार्थ, आंबट दही, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. या पथ्यांचे पालन केल्यास नक्कीच फरक जाणवतो. भाज्यांमध्ये मेथी, मेथीचे पदार्थ, मुळा आणि मुळ्याचे पदार्थ, सिमला मिरची यांचे प्रमाण कमी असायला हवे. हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेली मिरची हे पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत.
3) व्यायाम सर्वात फायदेशीर उपाय : अॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांसाठी व्यायाम हा अतिशय फायदेशीर उपाय आहे. रोज अर्धा तास ते एक तास चालण्याचा व्यायाम करणे फायदेशीर असते. योगतज्ज्ञांकडून पचनक्रिया सुधारण्यासाठी आवश्यक आसने शिकून नियमितपणे करावीत. यामुळे पचनशक्ती सुधारण्यास आणि पित्त कमी होण्यास चांगला फायदा होतो.
4) झटपट उपाय धोकादायक : अॅसिडिटीचा त्रास असहय्य झाल्यास झटपट उपाय म्हणून इनो, सोडा, पेप्सी किंवा कोकसारखी सोडायुक्त पेय घेण्याकडे कल वाढत आहे. लक्षात घ्या प्रत्येक व्यक्तीला होणारा अॅसिडिटीचा त्रास हा सारखाच असतो असे नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषधांच्या दुकानातून औषधे घेऊ नयेत. बऱ्याचदा झटपट उपायांमुळे अॅसिडिटी तात्पुरती बरी होते. मात्र अॅसिडिटीचे मूळ दुखणे तसेच राहते आणि तिचा त्रास वारंवार होत राहतो.
5) ट्राय करा घरगुती उपाय :
▪ रोज एक चमचा मोरावळा खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
▪ आवळा पावडर आणि ज्येष्ठमध समभाग एकत्र करून अर्धा चमचा रोज सकाळ-संध्याकाळ दोन वेळा घ्यावी. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते.
▪ डोळ्यांची आग होत असल्यास थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून डोळ्यांवर ठेवल्यास आराम मिळेल.

Leave a Reply