?सावीत्रीची लेक शिकली शाळा?‍♀


जीच्यासाठी झेलला शेणाचा गोळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

सनातन्यांच्या खावुन शिव्या,
दिशा उघडल्या तिने या नव्या,
कर्मठांच्या हातून सोडवला समाज भोळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

लेक तिची आज शिकू लागली,
पोथीपुराणे वाचु लागली,
उपासतापासांना नाही बसला आळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

वटपोर्णिमेला नटायची संधी,
ग्रहणकाळात कापायला बंदी,
धजवत नाही सोडण्यासाठी रुढींचा पिळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

डॉक्टर झाली घरी विटाळ पाळी,
शास्त्रज्ञ झाली तरी रुद्राक्ष गळी,
नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

वास्तुशास्त्राने बदल घरात,
गर्भसंस्कार चालतो जोरात,
नविन फँशन येईल फक्त त्यावर डोळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

नागपंचमी अन संक्रांत वाण,
एवढ्या साठीच का बाईच जीण,
शिकलेली महिला बनली अहिल्याशिळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

हे स्वातंत्र तुझे देणे तीचे आहे,
उपकार तीचे फेडायचे आहे,
साथ हवी आहे नको कोरडा उन्माळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

जातिभेद अन लिंगभेदाची,
कीड मारूया विषमतेची,
साथ दे फुलवायला समतेचा मळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

जीच्यासाठी झेलला शेणाचा गोळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।
सावित्रीची लेक शिकली शाळा।।

1 Comment

  1. सावित्रीची लेक शिकली शाळाI
    म्हणून भामट्यांवर बसला आळाII
    सावित्रीची लेक शिकली शाळाI
    म्हणून दिसेना दिवस काळाII
    सावित्रीची लेक शिकली शाळाI
    म्हणे मत्सर-द्वेश-राग-लोभ टाळाII
    ……….

Leave a Reply

Your email address will not be published.


*