बेटी बचाव-बेटी पढाव संदेश देत लहान मुलींच्या हस्ते नंदुरबार स्नेह मेळाव्याची सुरुवात

समाज एकत्र आल्यास समाजाला बळकटी येते-सुनिल नंदवाळकर

बेटी बचाव-बेटी पढाव संदेश देत लहान मुलींच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात

नंदुरबार-समाजात कुठल्याही प्रकारचे तट-गट न ठेवता सर्वांनी समाजाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. समाज एकत्र आल्यास त्या समाजाला बळकटी येते. आज ज्याप्रमाणे सासू-सुना कार्यक्रमास आनंदाने जमल्या आहेत, त्याचप्रमाणे घरातही कायम नाते जोपासावे, जेणेकरुन घरातील वातावरण पोषक राहील. यातून येणार्‍या पिढीवर चांगले संस्कार रुजतील, असे प्रतिपादन नुकतेच रुजू झालेले नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर यांनी केले. ते येथील बडगुजर समाजाच्या स्नेह मेळाव्यात बोलत होते.
येथील नगरपालिका शाळा क्र. १ येथे दि.३ मार्च २०१९ रविवार रोजी बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हळदी-कुंकू, सर्वांसाठी विविध खेळ, तसेच समाजाची वार्षिक मिटींग झाली. मंडळाने बेटी बचाव बेटी पढाव संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात समाजातील लहान मुलींच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर पुलवामा अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात येवून महिलांना वाण वाटप करण्यात आले. यावेळी सर्वांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात समाज बांधव-भगिनींनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदविला. यावेळी नंदवाळकर पुढे म्हणाले की, अनेक गावातील समाजातील कार्यक्रमास उपस्थिती दिली आहे. परंतु नंदुरबार शहरातील बडगुजर समाजाचा कार्यक्रमास समाजाची उपस्थिती तसेच मंडळाने घेतलेले उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. यापुढे समाजाच्या मदतीसाठी मी बांधील आहे, असेही आश्‍वासन त्यांनी शेवटी दिले. समाजात कुठे निधन झाले की अंत्ययात्रेत व कार्यक्रमाच्या दिवशी समाज बांधव जमतात. परंतु यापुढे ज्या घरी अशी दुखद घटना घडली असेल तर त्या घरी प्रत्येक समाज बांधवाने बारा दिवसा दरम्यान वेळात वेळ काढून कमीत कमी पाच ते सात दिवस त्यांच्या दुखात सहभागी व्हावे, असा ठराव सर्वानुुमते मान्य करण्यात आला. याविषयी सौ.सुनिता मनोज बडगुजर यांनी आपल्या प्रतिक्रीया देत सांगितले की, आमचे नंदुरबार शहरात कुटुंबाचे एकच घर आहे. माझे सासर्‍याचे निधन झाल्यावर आम्हाला मोठी चिंता उद्भवली होती. परंतु अशावेळेस मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी आम्हाला घराच्या बाहेरही पडू न देता सर्वोतोपरी सहकार्य केले. याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक करुन आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी खेळातील विजेत्यांना मंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली. कार्यक्रमात बडगुजर समाजाचे वेब पोर्टल तसेच बडगुजर ऍपची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष विजय संतोष बडगुजर यांनी केले. सूत्रसंचाल दिलीप राघो बडगुजर यांनी केले. तर आभार पंडीत तोताराम बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र काशिनाथ बडगुजर, अश्‍विन भालचंद्र बडगुजर, संदीप लक्ष्मण बडगुजर, देविदास भगवान बडगुजर, दिनेश शामराव बडगुजर, विजय जगन्नाथ बडगुजर, भरत सुरेश कोतवाल, गणेश दत्तात्रय बडगुजर, प्रकाश नागो बडगुजर, विलास अशोक बडगुजर, भाईदास दगा बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.

2 Comments

  1. नंदुरबार येथिल समाज बांथवांंनी आयोजित केलेला कार्यक्रम खुपच आवडला असून असेच कार्यक्रम व केलेला ठराव सर्व गावागावातील मंडळांनी घ्यावेत त्यामुळे समाजात एकोपा निर्माण होईल तरी हा नंदुरबार पँटर्न सर्वांनी अंमलात आणावा अपेक्षा राजेन्द्र त्र्यंबक पवार,विमा प्रतिनिधी गौरीनंदन कन्स्ट्क्शन्स,जळगा़व

  2. अभिनंदन नंदुरबार समाज मंडळ व दिलीप भाऊ सेना

Leave a Reply

Your email address will not be published.


*