पिंपळगोठे सारख्या एका लहानशा खेड्यात श्री. लोटन भावलाल बडगुजर व सौ. रंजना लोटन बडगुजर या गरीब व शेतकरी दाम्पत्याच्या घरात जन्मलेली जागृती खुप मोठ्या तपश्चर्येनंतर महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक महसूल अधिकारी पदी नियुक्त झाली.
जागृतीचा आत्तापर्यंतचा जीवन पट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखा आहे. तिचे शालेय शिक्षण पिंपळगोठे येथेच झाले. दहावी एस. एस. सी. ला चांगले गुण मिळाल्याने काहीतरी वेगळं करायचं म्हणून जळगाव येथील गवर्नमेंट पॉलिटेक्निकलला कॉम्प्युटर इंजिनिअरला प्रवेश घेतला. त्यात तिला घवघवीत यश मिळाले. चांगले मार्क्स मिळाल्याने जळगाव येथील गवर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला डिग्रीला प्रवेश मिळाला. उपजत हुशार असल्याने 2014 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले. येथपर्यंत तिने जीवनाचे दोन टप्पे पूर्ण केले. या प्रवासात उल्लेखनीय बाब अशी की तिने सहा वर्षाचे संपूर्ण शिक्षण पिंपळगोठे ते जळगाव या जा करून पूर्ण केले.
घरची परिस्थिती जेमतेम असल्याने साहजिकच आई वडील, आजोबा आजी, नातेवाईक सर्वांची इच्छा होती की आता नोकरी करून, लग्न करून स्थिर स्थावर व्हावे. तिला चांगले मार्क्स असल्याने सॉफ्टवेअर कंपनीत जॉब मिळाला. पण तिच्यातील अधिकारी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने निश्चय केला की लोकसेवा आयोगाची तयारी करून तहसीलदार, उपजिल्हाधिकारी व्हायचं. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने 2019 मध्ये जॉब सोडला. नंतर कोविड साथ सुरू झाल्याने दोन वर्ष परीक्षाच रद्द झाल्यात. पण ती यत्किंचितही डगमगली नाही. मध्यंतरी यश तिला हुलकावणी देत होते. पण चिवटपणा अंगी असल्याने प्रयत्न सोडले नाही. शेवटी तिने यशाला गवसणी घातली आणि तिची सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून निवड झाली. यातही ती समाधानी नाही ती तहसीलदार पदा साठी पुन्हा तयारी करत आहे. जागृतीच्या या यशाबद्दल खुप खुप अभिनंदन..
जागृतीचा हा प्रवास जेवढा खडतर आहे त्यापेक्षाही कठीण परीक्षा तिच्या आई वडिलांनी दिली. सामान्य कुटुंबास वाटते की मुलीने शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी, संसार करावा. पण या बाबत जागृतीचे आई वडील वेगळे आणि ठळक वाटतात. त्यांनी काबाड कष्ट करून तिचे इंजिनिअरिंग पूर्ण केले. नंतर तिने परीक्षा देण्याचा जो धाडसी निर्याण घेतला त्याला यांनी खंबीर पाठिंबा दिला. तुटपुंजे उत्पन्न असूनही तिला दर महा पैसे पाठवले. मध्यंतरीच्या काळात अनेक नातेवाईक टोमणे मारू लागले. पण त्या दोहोंनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि जागृतीला पूर्ण साथ दिली. आज टोमणे मारणारेच त्यांचे कौतुक करतील, सत्कार करतील.
शेवटी मी असे म्हणेन की जेवढी परीक्षा जागृतीने दिली तेवढीच परीक्षा तिच्या आई वडिलांनी दिली. तिच्या या कष्टात थोडीफार साथ तिचे मामा श्री. रविकांत देविदास चव्हाण ( आळंदी, पुणे ) आणि आजोबा श्री. देविदास शेनफडू चव्हाण ( नवी दाभाडी, हल्ली मुक्काम आळंदी ) यांनी दिली.
या यशाबद्दल जागृतीचे त्रिवार अभिनंदन !!!!!
शब्दांकन – प्रा. डॉ. एन. एल. चव्हाण ( फैजपूर/ पुणे )
Hearty congratulations and best wishes for future carrier.
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
Congratulations to Jagruti Badgujar & Parents Go Ahead 🌹🌹