पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालयामधील शिक्षिका श्रीमती जया माधव मांडेवाल यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्यातर्फे राष्ट्रस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार नंदुरबार येथे भव्य अशा कार्यक्रमांमध्ये या फोरमचे नॅशनल डायरेक्टर श्री गौरव दिलीप देवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 22 डिसेंबर 2024 रोजी नंदुरबार येथे संपन्न झालेल्या या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून 250 शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. मात्र केवळ 105 शिक्षकांना सदर पुरस्काराचे वाटप करण्यात आले. त्यात आपल्या बडगुजर समाजातील श्रीमती जया माधव मांडेवाल यांना हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रधान करण्यात आला. श्रीमती जयाताई या कै. शंकरराव विठ्ठल पवार यांच्या सुनबाई असून श्री. विलास शंकर पवार यांच्या धर्मपत्नी आहेत. अत्यंत सुशिक्षित अशा या घराण्यातील ताईंना हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल प्रथमत: त्यांचे शतशः आभार.

गेल्या वीस वर्षापासून श्रीमती जया माधव मांडेवाल या पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासह वंचित गरीब विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवून त्यांचा शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास घडवून आणला. आपण चांगले कार्य करत राहावे त्याची दखल कुठे ना कुठे घेतली जात असते. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

जया ताईंनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच शिष्यवृत्ती मार्गदर्शन कौटुंबिक समस्या निवारण करणे यासाठी मोलाचे कार्य केले आहे. जिल्हास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणांमध्ये त्या रिसोर्स पर्सन म्हणजेच आदर्श ट्रेनर म्हणून कार्य करत असतात. या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांना ते मार्गदर्शन करत असतात. तसेच शाळेमध्ये विविध प्रकारचे सण उत्सव साजरे करून त्यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यावर त्यांचा नेहमी भर असतो. विद्यार्थ्यांचा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून तसेच लेझीम, वेलकम गीत, देशभक्तीपर गीत गायन, तसेच विविध नाटिकांचे नाट्यीकरण करण्यामध्ये कोरिओग्राफी करण्यामध्ये जयाताई नेहमी विद्यार्थ्यांना प्रेरित करत असतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कार रुजवण्याचे कार्य ते करत असतात.
ग्रामीण भागातील बालवाडी पासून ते बारावी पर्यंतच्या मुलांमधील इंग्रजी विषयाची भीती नाहीशी करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. इंग्रजी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलते करण्यासाठी त्या नेहमी धडपड करत असतात. सतत बावीस वर्ष त्यांनी इंग्रजी अध्यापनाचे कार्य कौशल्यपूर्ण पद्धतीने पूर्ण केले आहे. यामुळे आज त्यांचे विद्यार्थी विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. देशाच्या जडणघडणीत या माध्यमातून त्या नेहमीच हातभार लावत असतात. शिक्षक हा केवळ अध्यापनच नाहीतर राष्ट्रनिर्माणाचे काम करत असतो हे त्यांच्या कार्यातून नेहमीच प्रतीत होत असते.
त्यांच्या या परिश्रम पूर्ण कार्यामध्ये नेहमीच त्यांना त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे मौलिक सहकार्य लाभत असते. त्यात प्रामुख्याने त्यांचा मुलगा श्री कुंदन विलास पवार हे सुद्धा एक स्वतः इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये IES Officer या पदावर कार्यरत आहे. तर त्यांची सुनबाई सौ हर्षदा कुंदन पवार ह्या सुद्धा आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

नंदुरबार येथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमचे अध्यक्ष गोरख देवरे साहेब, तसेच नंदुरबार महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.डॉ.महेंद्र रघुवंशी, फोरमचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. ज्योती मॅडम, प्रोटॉन संघटना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे सचिव प्रा. डॉ. बागुल सर,तसेच श्री प्रशांत नरवडे गटशिक्षणाधिकारी अक्कलकुवा, मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल प्लॅनेट ब्युटी क्वीन डॉ. नूतन मिस्त्री, श्री सारांश भावसार प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य, आणि सायबर क्राईम गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे नॅशनल डायरेक्टर श्री.प्रदीप कुमार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला.
श्रीमती. जया ताई यांना या पुरस्कारा निमित्त अखिल भारतीय बडगुजर महा समिती बडगुजर युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या वतीने अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. ताईंच्या हातून यापुढेही असेच समाजाचे आणि देशाचे कार्य घडत राहो या सदिच्छा आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
शब्दांकन प्रा. मिलिंद बडगुजर जळगाव,( 9421184495. )
श्री विलास पवार ( 9960737405 )
सौ जया पवार ( 9503525247 )
Leave a Reply