नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती-भाग ८४.
बाबाजींनी पुन्हा सुंदर गुळाचा चहा केला. “बहुत आनंद आया, बहुत आनंद आया,” असं म्हणत त्यांनी लहान मुलासारखी स्वतः भोवती गिरकी घेतली. चहा घेता घेता ते म्हणाले “मै तो पागल हू… पागल! अपनेमेही मुझे बडा मजा आता है, देखो आज तो हनुमान जी को उनका ही भजन सुना दिया….” हे बोलताना ते मनापासून हसत होते. त्यांना खूप आनंद झालेला स्पष्ट जाणवत होता. त्यावेळी फक्त एकच विचार मनात आला… एका क्षणासाठी जे काही मला वाटलं होतं, जो काही भास मला झाला होता, तो खरा तर नसेल?… खरंतर एखादा दिवा चमकावा आणि विझावा याहीपेक्षा तो काळ छोटा होता. आकाशात विजेची रेषा दिसते न दिसते तोच कशी विझून जाते त्याहीपेक्षा कमी काळ ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं… किंवा तो भास माझ्या डोळ्यासमोर होता… तो त्या भजनाचा प्रभाव होता, की भास होता की सत्य हे मला सांगताच येणार नाही.
आमचा चहा घेऊन झाला. आम्ही पुढे निघणार तोच बाबाजींनी चटकन वाकून आम्हाला नमस्कार केला. परिक्रमावासी म्हणून अनेक लोक नमस्कार करतात, तेव्हा मी देखिल वाकून समोरच्या व्यक्तीला नमस्कार करत असते, मात्र बाबाजींनी मला वाकून नमस्कार करू दिला नाही. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले..” जा बेटा जा, प्रभू तेरे साथ है”.
अजूनही संध्याकाळ व्हायला वेळ होता. आभाळ तसंच दाटून आलेलं होतं. आम्ही सूर्य कुंडाच्या दिशेनं निघालो. मध्ये एक वाट झाडीतून जाणारी होती. त्या वाटेवरून आजूबाजूचं, पुढचं मागचं काहीही दिसत नव्हतं, मात्र जशी ती वाट पूर्ण झाली तसा डांबरी रस्ता दिसू लागला. उजव्या हाताला दूरवर सात घोडे असलेला सूर्याचा रथ स्पष्ट दिसत होता. तेच सूर्यकुंड असावं. आम्ही त्या दिशेने वळलो. थोड्याच वेळा नंतर दूरवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही पाट्या लावलेल्या दिसल्या. एक मोठं द्वार दिसलं. आम्ही आता सूर्य कुंडला पोचणार. तरीही अजून अंगावर शहारा येण्यासारखं काहीतरी उरलंच होतं. बाबाजीं कडे झालेल्या प्रकारामुळे मी मंत्रमुग्धच होते अजूनही. गार वारा वाहात होता.दोन चार हलके हलके थेंब अंगावर पडतात आणि पुन्हा थांबून जात, असा हा खेळ दुपारपासूनच सुरू होता. आम्ही हळूहळू पुढे गेलो तसं तसं माझ्या मध्ये जास्त ऊर्जा भरली जात आहे असे मला जाणवू लागलं. त्या पाट्या वाचता येईल तिथवर आम्ही पोहोचलो आणि मी स्तब्ध होऊन उभे राहिले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला हनुमान चालीसा ची दोहावली प्रत्येक पाटीवर लिहिलेली होती. येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन्ही वाटसरूंना संपूर्ण हनुमान चालीसा वाचता येईल अशा प्रकारे ह्या पाट्या एका मागे एक लिहिलेल्या होत्या. मला हनुमान चालीसा पाठ आहेच, तरीही प्रत्येक पाटील जवळ उभे राहून मोठ्या आवाजात, मोकळ्या गळ्याने हनुमान चालीसाचा एक एक दोहा मी मोठ्या आनंदाने म्हणत होते. बाबा ही खूप उत्साहाने माझ्याबरोबर लिहिलेल्या पाट्या वाचत होता. अशात आता पाऊस आला तरी आम्हाला तमा नव्हती. तो आनंद घेतल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नव्हते. पाऊस मात्र आमच्या आश्रमात पोहोचण्याची वाटच बघत असावा. आमचा हनुमान चालीसा वाचून झाल्यानंतर आणि आश्रमात पोहोचलो, खांद्यावरच्या बॅगा उतरवल्या, जोडे मोजे काढले, आणि कधीचं कोसळायला आतुर असलेलं आभाळ ओतायला सुरुवात झाली… धुवांधार पाऊस सुरु झाला… तिथेच आश्रमाच्या पडवीत बसून मंदिराच्या वर असलेल्या सात घोड्यांच्या रथाकडे मी टक लावून बघत होते…. बाबाजींचा चेहरा माझ्या डोळ्या समोरून दूर होत नव्हता… आता सूर्यकुंड च्या मारुतीरायांचं दर्शन घ्यायचं होतं… ते रहस्य अजूनही उलगडलं नव्हतं.. तीन वेगवेगळ्या रूपा मधले मारुतीराय अजूनही बघणं बाकी होतं… खरंतर नक्की काय आहे तिथे हेही समजलं नव्हतं. एकाच मंदिरात, कदाचित एकाच मूर्तीमध्ये, कदाचित वेगवेगळ्या मूर्तींमध्ये, कदाचित वेगवेगळ्या वेळेला…. कसे आणि कुठले रूप दिसत असेल नक्की? सांगणार आहे पण पुढच्या ८५ व्या भागात..
नर्मदे हर…..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Leave a Reply