1 मे…..आणि मुलांचा सुट्टीचा आनंद! – श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

*1 मे…..आणि मुलांचा सुट्टीचा आनंद!*

     1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. पण माझ्या शिक्षक पेशातील अनुभवातून हा दिवस आणखी एक कारणासाठी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे छोट्या मुलां-मुलींसाठी दीर्घ मुदतीची उन्हाळी सुट्टी सुरू होण्याचा दिवस! हल्लीच्या काळात अगदी लहानपणापासून मुलांच्या  शालेय जीवनाला प्रारंभ होतो आणि तिथूनच त्यांची ओढाताण सुरू होते. शाळा, क्लास, होमवर्क, अभ्यास इत्यादी अनेक प्रकारचे ताण घेत हे विद्यार्थी एक एक वर्षाची प्रगती करत असतात आणि त्यातच दरवर्षी येणारी ही सुट्टी त्यांना एक  अवर्णनीय आनंद देत असते वर्षभरातला अभ्यासाचा ताण या सुट्टीमध्ये ते पूर्णपणे विसरतात, तसा प्रयत्न करतात. अर्थात बरोबरच आहे. पण मला वाटते हा सुट्टीचा आनंद दिशाहीन पद्धतीने घेण्याऐवजी तोच आपण योग्य पद्धतीने घेतल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.
            आपल्या शिक्षण विषयक धोरणामध्ये उन्हाळ्यात वाढत्या तापमानापासून विद्यार्थी सुरक्षित राहण्यासाठी सुट्टी असावी. माझ्या माहितीप्रमाणे पूर्वीच्या काळी कोकणात अति पाऊस होत असल्यामुळे ही सुट्टी पावसाळ्यात असे. तरी एकंदरीत सुट्टी कशासाठी या प्रश्नाचा आपण आपल्या मुलांच्या दृष्टीने विचार करायला हवा. सुट्टीचा उपयोग आनंद, प्रगती, छंद, कौशल्य यांचा मेळ साधण्यासाठी व्हायला हवा. जेणेकरून अभ्यासातील कंटाळवाणेपणा  जाऊन त्यामध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे. अभ्यासाचा साचेबद्धपणा जाऊन त्यात विद्यार्थ्यांचा कृतीशील सहभाग कसा वाढेल यासाठी  प्रयत्न व्हायला हवे. केवळ टक्केवारीसाठी अभ्यास नसून अभ्यासाची जीवनातील उपयुक्तता, आवश्यकता विद्यार्थ्यांना समजायला हवी. त्यातील आकर्षण वाढायला हवे. अभ्यासातील रटाळपणा जाऊन त्यामध्ये विद्यार्थ्यांना रस वाटायला हवा. त्यासाठी विषयांची गोडी वाटायला हवी. त्यासाठी आवश्यक ती कौशल्य मुलांमध्ये विकसित व्हायला हवी. दैनंदिन जीवनात अभ्यासाचा व्यावहारिक उपयोग विद्यार्थ्यांना  कळायला हवा. हे सर्व होण्यासाठी विद्यार्थ्यांचा दैनंदिन जीवनातील कृतिशील सहभाग वाढायला हवा आणि अर्थातच यासाठी सुट्टीचा उपयोग कसा करता येईल याविषयी विचार पालकांनी करायला हवा. त्यासाठी खालील मुद्यांचा उपयोग होईल असे वाटते.

1) औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण, व्यावहारिक हुशारी आवश्यक ठरते. यातून प्रत्येकाला आयुष्यातील गरज आणि तडजोड यांचे महत्त्व कळण्यास मदत होते. पुढे भविष्यात वेळोवेळी येणारी नैराश्य भावना टाळण्यासाठी हे आवश्यक आहे.

2) शिक्षण घेताना बऱ्याच वेळा हस्ताक्षराकडे दुर्लक्ष होते किंवा विशेषतः वेळ देता येत नाही. सुट्टीमध्ये याकडे लक्ष देता येईल. हस्ताक्षर हे आकर्षक असावे कारण हस्ताक्षरांमधूनच व्यक्तिमत्व व्यक्त होते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास नक्की उपयोग होईल.

3) वाचन – व्यक्तिमत्व विकासात वाचन हे महत्त्वपूर्ण ठरते. धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक, आत्मवृत्त विषयक व अवांतर असे अनेक प्रकारच्या साहित्याचे वाचन हे आपले विविधांगी व्यक्तिमत्व घडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन हा पाया आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.

4) लेखन – “दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे” असे समर्थांनी म्हटले आहे. काहीतरी लिहावे म्हणजे व्यक्त व्हावे. यासाठी दैनंदिनी लिहिणे हा चांगला उपक्रम ठरू शकतो. दिवसभरातील आपला उपयुक्त व निरुपयोगी असा दोन्ही प्रकारचा वेळेचा उपयोग, याचे अवलोकन करण्यासाठी दैनंदिनीचा उपयोग होऊ शकतो. काहीतरी शिकता येते, काही संदर्भ पुन्हा केव्हा तरी उपयोगी होऊ शकतात. काही संस्मरणीय प्रसंग जपून ठेवता येतात आणि यातून आपले वर्तन सुधारता येते, आदर्श करण्याची संधी मिळते. कदाचित नवीन साहित्य सुद्धा आकाराला येते.

5) चित्रकला व हस्तकला – यातूनही व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यासाठी मदत होते. वेळेचा सदुपयोग होतो. नवीन कला विकसित होते नाविन्यपूर्ण नवनिर्मिती होते. कदाचित यातूनही भविष्यातील एखादा नवउद्योग निर्माण होऊ शकतो.

खरं म्हणजे बऱ्याचदा पालकांच्या इच्छेनुसार मुला-मुलींचे शिक्षण, बेसुमार अपेक्षा, यामुळे ते कंटाळवाणे ठरत आहे. तसेच थोडे निरस  अभ्यासक्रम आणि निरर्थक स्पर्धा, यामुळे सुद्धा शिक्षणातील आनंदच हरवला आहे असे मला वाटते. जुनी गुरुकुल पद्धती व्यवहार्य, उपयुक्त, कृतीशील व आनंददायी होती हे आता बऱ्यापैकी मान्य होत आहे. आणि त्यातूनच नवीन शैक्षणिक धोरण आकार घेत आहे असे वाटते.

तोपर्यंत आपण सुट्टीच्या काळात मुलांच्या कलाने घेऊन त्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला वाव द्यावा. त्यांचे वेगवेगळे छंद जोपासले जावेत यासाठी प्रयत्न करावे. वाचनासाठी प्रोत्साहन द्यावे. विविध प्रकारची, गोष्टी, गंमती-जंमतीची, विज्ञान विषयक, ज्ञानवर्धक, ऐतिहासिक, उपक्रमशील पुस्तके त्यासाठी उपलब्ध करून दिली तर मुला-मुलींची वाचनाची गोडी वाढेल व त्याचा अप्रत्यक्षपणे अभ्यासात फायदा होईल. एकंदरीत मुलांना अभ्यासात गोडी वाटावी यासाठी सुट्टीचा उपयोग करून घेता येईल. तसेच त्यांच्या मधील इतर क्षमता, आवड हे समजून घेण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचे आहे. मुलांच्या आवडीनुसार त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरविण्यात ही सुट्टी आपल्याला दिशादर्शक ठरु शकते. मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी छंद, आनंद, अभ्यास या त्रिसूत्रीचा वापर करून शिक्षणाने प्रगतीचे शिखर गाठायचे निश्चित केले पाहिजे. आपण सर्वजण तसे करुन पुढील पिढीला सक्षम बनवूया!

१ मे या महाराष्ट्र दिनाच्या
सर्वांना खूप खूप शुभेच्छा

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*