“विवाह का जमत नाही?” : कारण मीमांसा
लग्न/ विवाह म्हणजे काय? दोन जीवांनी काही मर्यादित कालावधी साठी केलेला करार की एकमेकांच्या सुख-दुःखासाठी आत्मसमर्पण करण्याची तयारी असल्याची कबुली? हे अगोदर निश्चित केल्यानंतरच आपल्याला या विषयावर विचार करता येईल. विवाह जुळणे, हा तसा खूप गुंतागुंतीचा विषय आहे. साधारणतः गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीत यामध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. या बदललेल्या परिस्थितीचा सर्वकष विचार करण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न !
कोणत्याही समाजाच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण! अर्थात हे दोन प्रकारचे अपेक्षित आहे, औपचारिक व अनौपचारिक. एकीकडे गुण-दोष, संस्कार संवर्धन, यातून व्यक्तिमत्व विकास, तर दुसरीकडे भवितव्याची पायाभरणी. बऱ्याचदा घेतलेल्या शिक्षणाचा भविष्यात प्रत्यक्ष काही वेळा उपयोग न झाल्याचे सुद्धा दिसून येते. कारण शिक्षण घेताना पाल्याच्या व्यक्तीगत क्षमता व आवड- निवड यापेक्षा आजुबाजूचे समज-गैरसमज याला आपण बळी पडलेलो असतो. केवळ नोकरीसाठी शिक्षण न घेता शिक्षण घेताना अभ्यासाबरोबरच अनुभवाचाही व्यासंग हवा, तरच ते परिणामकारक ठरु शकते. केवळ उच्च शिक्षणाकडे आकर्षित न होता, शिक्षणातून उच्च ध्येय प्राप्तीकडे वाटचाल होण्यास मदत झाली पाहिजे. त्यातून करिअर घडले पाहिजे. याच बरोबर केवळ उच्च शिक्षण असल्यावरच करिअर घडते हे १००% खरे नाही हेही लक्षात घ्यायला हवे. शिक्षण हा करिअरचा आधार होवू शकतो पण पुरेसे शिक्षण नसलेल्या व्यक्तीही आयुष्यात प्रयत्नांती यशस्वी होतात याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्याचीही नोंद घेणे आवश्यक ठरते. तसेच काही वेळा खेडेगावांमध्ये आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव, बेताची आर्थिक परिस्थिती यामुळेही आवश्यक ते शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे शिक्षणात मागे राहिल्याने पुढची प्रगती खुंटते. आणि अर्थात विवाह जुळण्यास ती अडचण ठरते. तसे विवाह ठरवताना शिक्षण हा निकष विचारात घेताना हे बाकी मुद्दे सुद्धा विचारात घ्यायला हवे.
मुला-मुलींना शिक्षण देताना समान संधी दिली पाहिजे हे प्रगतीशील समाजासाठी बरोबर असते. तरी मुलींच्या बाबतीत त्यांच्या केवळ गुणवत्तेचा विचार न करता, आवडी-निवडी, तसेच भावी आयुष्यातील काही संभाव्य नैसर्गिक अडचणी लक्षात घेवून शिक्षणाची दिशा ठरवल्यास अपेक्षाभंग होणार नाही. अगोदर इतर प्रवाहांबरोबर शिक्षण घ्यायचे व लग्नानंतर ते निरुपयोगी ठरल्याने पश्चाताप करायचा किंवा निराश व्हायचे यापेक्षा सुरुवातीलाच सर्व बाबींचा विचार व्हायला हवा. समानता असली तरी काही गुणवैशिष्ट्यांमुळे मुला- मुलींकडे विवाह नंतर काही जबाबदाऱ्या अपरिहार्य ठरतात त्या आपण टाळू शकत नाही.
तसेच आपल्या समाजात हल्ली मुलींच्या शिक्षणात बरीच वाढ झाली आहे. अर्थात हे समाजाची प्रगती अधोरेखित करते. बऱ्याचदा मुलांपेक्षा मुली शिक्षणात जास्त यशस्वी ठरल्याचे दिसून येते, तसेच त्या सरसही ठरत आहे. पण हेच शिक्षण आपल्या समाजाच्या प्रगतीला अडसर तर ठरत नाही ना? अशी शंका येते. कारण उच्चशिक्षणाबरोबरच मुलींची तसेच मुलांचीही संस्कारांपासून फारकत होत असल्याचे दिसून येते. सध्या “हम दो, हमारा एक किंवा दोनच!” यामुळे मुलामुलीचे नियोजनबध्द लाड होतात. सर्व काही त्यांच्यासाठीच असा आई-वडिलांचा अट्टाहास असतो. त्यामुळे नंतर या पालकांच्या सर्वच अपेक्षा वाढलेल्या असतात. वैवाहिक संबंध जुळवताना या ‘अपेक्षा’ एक अडसर ठरतो असे दिसून येते. हल्लीच्या पिढीला ‘सर्व काही मिळू शकते’ असा एक चुकीचा समज असल्यामुळे आयुष्यात अनेक वेळा ‘तडजोड’ करावी लागते हे सहसा पटत नाही. ‘सर्व काही पैशाने मिळवता येते’ यामुळे ‘पैसा’ हेच या पिढीचे मुख्य ध्येय बनत आहे त्यामुळे ही पिढी ‘दिशाहीन’ होत आहे.
एकंदरीत शिक्षणामुळे मुला-मुलींच्या (की त्यांच्या पालकांच्या) ‘अपेक्षा‘ भरपूर वाढलेल्या दिसून येतात. मुला-मुलींचे रंग, वय, उंची यामधील अंतर ठराविकच पाहिजे, दोघांचे शिक्षण एकाच क्षेत्रातील असावे, वार्षिक उत्पन्न उत्तम पाहिजे, अमूक गावची सोयरीक नको, मुलीला सासू-सासरे, इतर जबाबदारी नको, स्वतंत्र वेगळे घर पाहिजे, काही वेळा मुलीचे शिक्षण पाहिजे, पण लग्नानंतर नोकरी करू देणार नाही, अशा एक ना अनेक अटी व अडचणीतून ‘लग्न जुळणे – जुळवणे‘ कठिण ठरत आहे. परिचित, नातेसंबंधातील, माहितीतील स्थळांकडून आपल्या वारेमाप अपेक्षा पूर्ण होत नाही. म्हणून नातेसंबंध नसलेल्या, फारसा परिचय नसलेल्या स्थळाकडे आकर्षित झाल्याने कालांतराने पश्चातापाची वेळ येते, असे अनुभव आहेत. यामध्ये आपल्याच समाजातील समाज बांधव आणि भगिनींकडून फसवणूक झाल्याचे सुद्धा दिसून येते. फार प्रयत्नांनी जमलेच तरी मुला मुलींचे मनोमिलन होणे दूर पण हे अपेक्षांचे ओझेच संकुचित कुटुंबाकडे वाटचाल करते. आपल्या मुलीच्या सुखाचा एकांगी विचार करताना आई-वडिल समोरच्या बाजूचा विचार करणे टाळतात व आपल्यावर ती वेळ आल्यावर मात्र दुसऱ्याच्या मुलीला व समाजाला दोष देवून मोकळे होतात. आई ही मुलीला ‘कुटुंब-घर’ सांभाळण्याऐवजी ‘आत्मकेंद्री’ बनवते असे प्रकार होतात. एकंदरित नवीन पिढीसुद्धा कुटुंबाचा परिपक्व विचार करताना दिसत नाही. त्यामुळे हल्ली ‘लग्न यशस्वी होणे’ कठिण ठरत असून बऱ्याचदा घटस्फोटाकडे वाटचाल दिसून येते. जेष्ठ वर्ग सुध्दा मुला-मुलींची जडण-घडण करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे तरुण पिढी व जेष्ठ वर्ग यामध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. फक्त मुली असलेल्या पालकांच्या वृद्धापकाळाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, तर फक्त मुले असलेल्यांचे सुध्दा विविध कारणांनी, प्रश्न निर्माण होत आहे.
एकंदरित वैचारिक बैठक कुठेतरी चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहे असे वाटते. प्रत्येकजण आपुलकी-जवळीक – नाते यापेक्षा पैशाला अधिक महत्व देताना दिसतो, ‘पैसा’ हा महत्वाचा ठरतो पण ’सर्वस्व’ नसतो हेही तितकेच खरे आहे. पण तसा अनुभव आल्याशिवाय बरेचदा हे पटत नाही आणि तसा अनुभव येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. व्यक्तीपासून कुटुंब आणि कुटुंब पासून समाज तयार होतो. त्यामुळे समाजाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक कुटुंबाचा सहभाग महत्वाचा ठरतो. त्यासाठी प्रत्येक कुटुंब सुखी-समाधानी व आनंदी असण्यातूनच ती अधोरेखित होते, यासाठी तसे प्रयत्न होण्याची गरज जाणवते. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे तशी वाटचाल करणे आवश्यक ठरते.
त्यासाठी युवा पिढीने आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आवडीनुसार आपल्या भवितव्याला आकार देण्यासाठी करून घेतला पाहिजे. केवळ नोकरीवर विसंबूत न राहता व्यवसाय, शेती या संधीचा सुध्दा विचार केला पाहिजे. हल्ली सर्व प्रकारची माहिती सहज उपलब्ध आहे तसेच आपल्या समाजात ही विविध क्षेत्रात अनेक यशस्वी व्यक्ती आहेत. ‘ज्ञानाचा उपयोग, जाणीवपूर्वक योग्य दिशेने प्रयत्न, कष्टाची तयारी या प्रकारे शून्यातूनही यशशिखर गाठता येते’ असा विश्वास हवा.
आणखी एक मुद्दा महत्वाचा वाटतो तो म्हणजे ‘लग्नसोहळे’! समाजातील प्रतिष्ठा टिकवण्यासाठी हल्ली आम्ही हुंडा मागत नाही मात्र लग्न थाटामाटात झाले पाहिजे हा एक आधुनिक प्रकार बऱ्याचदा दोन्ही कुटुंबांसाठी अडचणीचा ठरतो. श्रीमंत कुटुंबांची प्रसिद्धी यातून होत असली तरी इतरांसाठी मात्र पैशाचा अपव्यय ठरतो. श्रीमंत कुटुंब आपल्या पैसा/ प्रतिष्ठेच्या प्रदर्शनामधून समाजामध्ये एक चुकीचे आकर्षण/परंपरा निर्माण करते, असं खेदाने म्हणावे लागेल. समाजाने या दिखावूपणातून बाहेर पडून साधेपणाकडे वाटचाल केल्यास कुटुंबांची (दोन्ही) पर्यायाने समाजाची प्रगती होण्यास मदत होईल. यामधून पैशाचा स्त्रोत उद्योगधंदा, शेती, व्यवसायवृद्धी यासाठी वळवता येईल. काही ‘अनावश्यक प्रथा‘ बंद होऊन पैशाच्या योग्य विनियोगाने ‘समाजाची आर्थिक परिस्थिती’ सुधारण्यास नक्कीच हातभार लागेल.
नोकरी, व्यवसाय अशा अनेक कारणांनी विखुरलेला आपला समाज आधुनिक संपर्क माध्यमांच्या सहाय्याने जवळ येऊ शकतो त्यातून नवीन पिढीच्या उपयोगी असे मुला मुलींचे नाते निर्माण करू शकतो त्यातून दोघांच्या प्रगतीला हातभार लागू शकतो मात्र त्यासाठी जवळीक निर्माण होणे आवश्यक ठरते. थोडक्यात, ‘मी‘ आणि ‘माझे’ पण जाऊन ‘आम्ही’ आणि ‘आपले’ पण निर्माण होण्याची गरज दिसून येते सामाजिक जाणीवेने त्याची उणीव भरून काढण्याची आवश्यकता दिसून येते. नातेसंबंधातील आपलेपण टिकवून ठेवण्याची गरज आवश्यक वाटते.
एकंदरीत ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या न्यायाने अनेकांच्या सहकार्याने हा गुंता सोडवणे शक्य आहे! ‘लग्न’ ही संकल्पनाच मुळात तडजोडीच्या पायावर उभी आहे. ती अनेक व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांचे कुटुंब या सर्वांना एकत्र आणण्यास सहाय्यभूत ठरते आणि त्यातून स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास करण्यास कारणीभूत ठरते तसेच समाजाला पुढे नेते. प्रत्येकाकडे असणारे विविध गुण, एकाच विषयाचा विविधप्रकारे, विविध अंगांनी विचार करण्याच्या विविध पद्धती, विविध स्वभाव वैशिष्ट्ये यामुळे दोघांमध्ये निर्माण होणारे नाते म्हणजे लग्न! विवाह मध्ये भौतिक सुखापेक्षा मानसिक सुखाचे आधाराची जास्त गरज असते. प्रतिष्ठा जपताना वेळेचा अपव्यय, वाढणारे वय याचे भान ठेवायला पाहिजे. अपेक्षा कधीच संपत नाही. त्यामुळे अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करायला हवी. प्रत्येकाला मनाप्रमाणे सर्व काही मिळतेच असं नसतं. पण मिळेल त्यातून सर्व काही मिळवता येते हे तेवढेच खरे! त्यामुळे मिळेल त्यात आनंद मानल्यास, त्यातून पुढे जाण्यात जास्त समाधान मिळू शकते. परंतु दुर्दैवाने प्रवास सुरू होण्यापूर्वीच एकमेकांवर कुरघोडी करण्यात कोण यशस्वी होतो याकडे तो झेपावत आहे. त्यामुळे दोन मनांच्या मन संवेदनांच्या आकर्षणातून हे नाते निर्माण होण्याऐवजी त्यामध्ये यांत्रिकपणा येत आहे. ‘समंजसपणाचा अभाव’ आणि वैचारिकतेचा दुष्काळ‘ यातून लग्न हे दिवसेंदिवस एक आव्हान ठरत आहे पण ते स्वीकारून हा आयुष्याचा पहिलं तर गाठण्यासाठी प्रत्येक मुला-मुलींची एकमेकांबद्दलची भावना कशी असावी हे मांडण्याचा एक प्रयत्न खालील कवितेतून केला आहे.
तू फक्त हो म्हण
त्याचाच मला आधार होईल
तू फक्त हो म्हण
मी जीवनाचा तंबु
एकट्याने तोलून घेईल
तू फक्त हो म्हण
त्यानेच मला धीर येईल
तू फक्त हो म्हण
मी जीवनाचा गाडा
एकट्याने ओढून नेईन
तू फक्त हो म्हण
संकटांना मी तोंड देईन
तू फक्त हो म्हण
मी दुःखालाही
सुख समजून घेईन
तू फक्त हो म्हण
मी आकाशी झेप घेईन
तू फक्त हो म्हण
दूरवरचे ध्येय प्राप्त करण्याचे
मला बळ येईन
श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265
Leave a Reply