हल्ली विद्यार्थी जीवनात अभ्यास आणि परीक्षा, यातून मिळवायचे यश हा एक कंटाळवाणा प्रवास ठरत आहे. बरेच विद्यार्थी खडतर अभ्यास करूनही अपेक्षित यश मिळवू शकत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे अभ्यास केल्यावर यश मिळते, याबाबत बरेच जण शंका व्यक्त करतात आणि त्यामुळे इतर मार्गाने आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रयत्न सुरू करतात. पण याचवेळी आपण खडतर अभ्यास केला असेल तरी तो योग्य पद्धतीने केला का? याबाबत पुरेसा विचार होताना दिसत नाही. अभ्यास किती तास केला? यापेक्षा तो कसा केला? हे सुद्धा जास्त महत्त्वाचे ठरते आणि नेमके याचबाबत बहुतेक विद्यार्थी दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपेक्षित यश मिळवण्यासाठी अभ्यास कसा करावा? याबाबत अभ्यास करण्याच्या प्रभावी आणि महत्वपूर्ण आवश्यक सात पायऱ्या समजावून देण्याचा प्रयत्न करीत आहे.
अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतींचा विचार केल्यावर याबाबतीत काही अनुभवाच्या गोष्टी पुढे दिल्या आहेत. त्याला आपण अभ्यासाची सप्तपदी म्हणूया.
1 उपस्थिती :
अभ्यास करण्यासाठी प्रथमतः आवश्यक असते ते ज्ञानग्रहण! आणि ज्ञानग्रहणाचे स्थान म्हणजे सध्या शाळा किंवा क्लासेस असतं. त्यामुळे अर्थातच ज्ञानग्रहणासाठी शाळेत किंवा क्लासेस मध्ये म्हणजेच वर्गात उपस्थित राहणं अत्यंत महत्वाचं असते. शिक्षक विषय समजावून देत असतात. तेव्हा ते तुम्हाला समजेल अशा भाषेत, अशा पद्धतीत विषय समजून देतात. तुम्हाला प्रश्न विचारतात व तुम्हीही प्रश्न विचारून आपलं समाधान करून घेऊ शकता, खरंतर तो विद्यार्थ्याचा हक्कच आहे. तुम्ही सबळ कारणांशिवाय तासांना गैरहजर राहिला तर मग ज्ञानही परीक्षेच्यावेळी गैरहजर राहतं. शंभर टक्के शाळा/ क्लासमध्ये उपस्थिती असणे ही उज्वल यशाची पहिली पायरी ठरते. अर्थात ही झाली केवळ शारीरिक उपस्थिती! याबरोबरच आवश्यक असते आपली मानसिक उपस्थिती! यशाच्या पुढच्या पायरीसाठी….
2 श्रवण :
वर्गात केवळ शरीराने उपस्थित राहणं पुरेसं नसून शिक्षकांच्या शिकवण्याकडे कान देऊन ऐकणं(श्रवण), डोळ्यांनी ते सर्व समजून घेणे व बुद्धीने ते ग्रहण (आकलन) करणं आवश्यक आहे . यासाठी एकाग्रता आवश्यक ठरते. विषयाबाबतची आवड, शिक्षकांच्या शिकवण्याविषयी असलेला विश्वास हा एकाग्रता वाढवण्यास मदत करतो. शिक्षकांच्या शिकवण्या सोबत विद्यार्थी किती एकरूप होतात यावर तुमच्या यशाची टक्केवारी अवलंबून आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचा मानसिक सहभाग हा अत्यंत आवश्यक ठरतो.
3 मनन चिंतन :
जे पहिलं, ऐकलं, ग्रहण केलं ते सर्व मनात साठवणं याला मनन म्हणतात. मन ही एक अशी कोठी आहे की, त्यात किती भरत गेले तरी ते पूर्ण भरत नाही. मनाची अशी शक्ती (memory) आहे की, ती प्रत्येक गोष्ट टिपते व एका कप्प्यात व्यवस्थित ठेवते. नीट सराव असेल तर परीक्षेच्या वेळी बरोबर समोर आणून हजर करते. मनाची दुसरी एक अशी शक्ती(understanding) आहे की ते सारख्या सारख्या विरोधी, जुन्या-नव्या गोष्टींचे संबंध जोडत असते, त्याला चिंतन म्हणतात. जे पाहिलं, ऐकलं, वाचलं त्याचं असं सतत मनन-चिंतन सुरु ठेवावं. त्याला वेळकाळाचं बंधन नाही. मनात ही प्रक्रिया सतत चालू असते. नवीन ज्ञान प्राप्त झाले की प्रक्रिया थोडी जाणीवपूर्वक सुरु करावी. यासाठी विविध पद्धतींचा वापर करता येतो. जेणेकरून आपली memory power वाढवता येते. अभ्यासातील तक्ते, चित्रे, सूत्रे यांचा वापर करून अभ्यास सोपा करता येतो. त्यासाठी आवश्यकता असते, ती चिकाटीची!
4 वाचन-पाठांतर : वाचन ही तर अभ्यासातील प्रमुख पायरी आहे. अखंड वाचनाने माणूस तल्लख बुद्धीचा होतो. इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे, “You hear you forget, you read, you remember.” ऐकलेले विसरु शकतो. वाचलेलं आठवतच. वाचनाच्या अनेक पद्धती आहेत. मूक, मुखर, अर्थपूर्ण, हावभाव, स्वराघात, अर्थपूर्ण हावभाव करीत मोठ्याने (मुखर) वाचन करणे चांगले. चुका कमी होतात. इतरांना आनंद देता येतो. समजावून घेताना मूक- वाचन करावं. महत्त्वाच्या भागावर खुणा व्हाव्यात. उजळणी करताना किंवा नोट्स काढताना याचा फायदा होतो.
महत्त्वाची वाक्यं, शब्द, म्हणी, सूत्रं, व्याख्या पाठच केल्या पाहिजेत. पाठांतर अतिशय महत्त्वाचं. पाठांतरसुद्धा सूत्रे, व्याख्या, कविता यांचं असावे, तर सारांश, उपयोग, कृती असे सुसंगत मुद्दे पाठ करावेत. शाळेत /वर्गात झालेला भाग पुन्हा पुन्हा वाचून पक्का होतो. अभ्यास म्हणजे “3R” म्हणजेच Read, Repeat, Rewrite हे लक्षात ठेवलं पाहिजे. याशिवाय अभ्यास हा शक्यच नाही हे निश्चित!
5 लेखन :
“लेखनाने माणूस पक्का होतो. महत्त्वाचे भाग लिहून काढले पाहिजेत.” केवळ वाचून केलेल्या अभ्यासापेक्षा लिहून केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो. लिहिताना तो मजकूर बऱ्याचदा वाचला जातो आणि साहजिकच पाठांतर होण्यास मदत होते. थोडक्यात नोट्स काढणं, सुसंगत लिहिणं ही कला आहे. पण ती सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. अनेक मोठे लेखक आपले लिखाण दोन-तीन वेळा लिहितात व मग प्रसिद्ध करतात. ‘शुद्ध व सुवाच्य लिहिणं हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.’ एकच उत्तर चांगल्या अक्षरात व्यवस्थित लिहिलं व वाईट अक्षरात अव्यवस्थित लिहिले तर परीक्षक गुण वेगवेगळे देतात असा अनुभव आहे. परीक्षा तर लेखीच होते. त्यामुळे लेखन भरपूर झालं पाहिजे. झालेलं लेखन तपासून, चुका दुरुस्त करून पुन्हा लिहून काढलं तर त्या नोट्सची परीक्षेच्या वेळी उजळणी करण्यास फारच मदत होते. यासाठी अधिकाधिक लेखन सराव हा आवश्यक ठरतो.
6 अविष्कार presentation :
अभ्यास परिपूर्ण झाला की, त्याचा अविष्कार होत असतो. भांड काठोकाठ भरलं की पाणी बाहेर वाहू लागतं. तसाच अभ्यास व्यवस्थित झाला, आत्मविश्वास आला की माणूस ते दुसऱ्याला सांगू लागतो. आविष्काराने ज्ञान वाढत राहते. इतरांना त्याचा फायदा होतो. मित्रांना मदत होते. संभाषण, नाट्यीकरण, वाद-विवाद स्पर्धा, कवितांच्या भेंड्या इत्यादी कार्यक्रमातून हा अविष्कार करावा. शिक्षकांच्या अनुपस्थितीत वेळ व्यर्थ जाणार नाही. मित्रांशी चर्चा करून त्यांचंही अभ्यासक्षेत्र विस्तारलं जाईल. नवीन नवीन कल्पना सुचतील व त्यामुळे आनंद निर्माण होईल. अर्थातच अभ्यास सोपा वाटू लागेल, आनंदमय होईल.
7. सातत्य :
वरील सर्व पायऱ्यांचं सातत्य असावं. अभ्यास याचा अर्थच सातत्य असा आहे.‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे. प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ असं रामदासांनी म्हटलं आहे. हेच अभ्यासच खरं सूत्र आहे. जसं दररोज तुम्ही जेवता तसंच दररोज ज्ञानग्रहण केलं पाहिजे. विनोबांनी म्हटलंय की अन्न जसं पचवावं लागतं तसं ज्ञानसुद्धा क्षणाक्षणांनी व कणाकणांनी मिळवून पचवावं लागतं. दिवसाच्या चोवीस तासांचे ४ भाग करावे. ६ तास झोप, ६ तास व्यक्तिगत किंवा कौटुंबिक काम, ६ तास शाळा क्लासेस व ६ तास अभ्यास असा आपल्या सोयीनुसार दिनक्रम आखून नियमित अभ्यास करावा. केवळ परीक्षेआधी १-२ महिने धडपड करून यशाची खात्री देता येत नाही. सुरुवातीपासूनच अभ्यास आवश्यक आहे.
एकंदरीत वरीलप्रमाणे जो अभ्यासाची सप्तपदी आचरणात आणेल त्याला परीक्षेची भीती तर राहणार नाहीच, उलट तो परीक्षा अगदी सहज आत्मविश्वासाने देईल शिवाय मार्कही चांगले मिळवू शकेल.
यश सोपे नसते हे जरी खरे असले तरी “प्रयत्नांती परमेश्वर” हेही तेवढेच खरे आहे त्यामुळे आपण जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नातून आणि योग्य दिशेने केलेल्या प्रवासातून ध्येयसिद्धी होईलच यात शंका नाही!
लेखक – कैलास भाऊलाल बडगुजर
टिटवाळा
भ्रमणध्वनी 8888284265
खूप छान आध्यात्मिक लेख /विद्यार्थी शिक्षक यांना मार्गदर्शक /अध्ययन अध्यापन पद्धती यांना अनुभव आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन
धन्यवाद, आपल्या मार्गदर्शनाचा प्रभाव आहे 🙏🙏
कैलास सर, खूप चांगला लेख आहे आपला.