भाग ४ –
७) संधी –
आयुष्याची वाटचाल करताना आपल्यापुढे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्या पर्यायांमधून आपल्या आवडीनिवडीचा, क्षमतेचा, आवश्यकतेचा आणि परिस्थितीचा विचार करून योग्य पर्याय निवडायचा असतो. एखाद्या पर्यायावर आपण निश्चित झाल्यावर त्या अनुषंगाने आपल्याला अनेक संधी उपलब्ध असू शकतात. त्यातील योग्य संधी निवडणे आपल्या हातात असते. तसेच ते आवश्यक असते. एकदा आपल्या हातातून निसटलेली संधी परत मिळेलच असं नाही. त्यामुळे मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घेता आला पाहिजे. आयुष्यात अनेक संधी अनेक वेळा उपलब्ध असतात. त्यातून योग्य संधी योग्य वेळी निवडली पाहिजे. तरच आपण योग्य ध्येयाकडे वाटचाल करून निश्चित यश मिळवू शकतो. संधी हातातून निसटल्यावर पश्चाताप करण्यात काही अर्थ नसतो. म्हणूनच प्रत्येक क्षणाला आपण जागरुक असले पाहिजे. तसेच संधीच्या शोधात राहिले पाहिजे. थोडक्यात
क्षण क्षणाचा
क्षण मनाचा
क्षण संधीचा
क्षण सोन्याचा
क्षण आजचा
क्षण उद्याचा
क्षण भविष्याचा
क्षण उत्साहाचा
क्षण मांगल्याचा
क्षण आनंदाचा
क्षण एकच परिवर्तनाचा
आयुष्याला कलाटणी देणारा
८) मार्ग/वाट –
ध्येय ठरलं, दिशा ठरली, आता केवळ वाटचाल करायची आहे. म्हणजे खूप सोप्प आहे, असं नाही. पुढचा मार्ग विविधरंगी असतो. वाटचाल करताना अनेक अनुभव येत असतात. ते अनुभव म्हणजेच आपलं शिक्षण असतं. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण असते. आपल्यातल्या क्षमतांचा विकास असतो. तसेच आपले स्वतःला ओळखणे असतं. हे सर्व आपसूकच घडत असतं. बऱ्याच वेळा ते आपल्याला नंतर कळतं. “खडतर वाट ही यशशिखराची” हेच खरे! पण काही वेळा आपण ध्येयप्राप्तीने एवढे भारित होऊन जातो की आपल्याला ती एक आनंदी वाटचाल वाटते, वाटू शकते. हे सर्व आपल्या मनावर अवलंबून आहे. एखाद्याला सोपी वाटचाल सुद्धा अवघड वाटते आणि एखाद्याला अवघड सुद्धा सोपी! थोडक्यात हे आपल्या मनाचे खेळ ठरतात. आपण ध्येय प्राप्तीसाठी किती उत्सुक आहोत यावर ते अवलंबून असते. म्हणूनच एकदा वाटचाल सुरू केली की आपण जेवढ्या आनंदाने ते करू तेवढे मला वाटते यश जवळ येत असते आणि आपल्याला आनंद देत असते.
उत्तुंग ध्येय
खडतर ती वाट
माझी बिकट
दिशा अथांग
नाही कुठे क्षितिज
मन तरंग
अनेक येथे
येती गडबडती
मार्गस्थ होती
ठेच लागुनी
बरेच की पडले
व सुधारले
ध्येय दूरचं
मार्गस्थ झाले कुणी
टीका होतेच
दिशा दर्शक
असायलाच हवी
टीका टिप्पणी
बी पॉझिटिव
गाठू प्रगतीपथ
टिका न व्यर्थ
तरीही झेप
घेईन ध्येयाकडे
हो, मी यशस्वी!
९) यश / आनंद –
दहावी बारावीचा निकाल लागला की प्रत्येकाला टक्केवारी विचारली जाते. अमुक टक्के मिळाले तर हुशार नाही तर साधारण असा अर्थ लावला जातो. चांगले गुण मिळाले तर यशस्वी नाही तर अपयशी असा शिक्का मारला जातो. पण टक्केवारी म्हणजे यश हे आपल्याला योग्य वाटते का? शिक्षणामध्ये अपयशी होऊनसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये उत्तुंग वाटचाली केलेले अनेक यशस्वी नामवंत व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला आपण पाहत असतो. याचा नेमका अर्थ काय? तर यश म्हणजे केवळ शालेय शिक्षणाची किंवा कोणत्याही परीक्षेची टक्केवारी नसून ते केवळ एकंदरीत आपल्या व्यक्तिमत्व जडणघडणीतला एक टप्पा असतो.
चित्रकलेची स्पर्धा असल्यास सगळ्याच चित्रांची प्रथम क्रमांकासाठी निवड होणे शक्य नसते. पण तरीसुद्धा अनुक्रम देण्यासाठी काही चित्रांची निवड केली जाते. तरीसुद्धा काही उल्लेखनीय चित्र डोळ्यासमोर असतात. म्हणून त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाते. अर्थात ही चित्रे सुद्धा तेवढीच उल्लेखनीय असतात आणि इतर चित्रे थोड्याफार दुरुस्तीने तेवढीच सुंदर बनू शकतात. वेळेच्या शर्यतीत काही स्पर्धक मागे पडतात, एवढच! याचा अर्थ ही इतर सर्व चित्रे सुद्धा यशस्वी स्पर्धकांसाठी महत्त्वाची ठरतात. अन्यथा स्पर्धक कमी असल्यास यशस्वी स्पर्धकांचे यश तेवढेसे झळाळून येत नाही, नाही का? अशाप्रकारे चित्रांमधली विविधता व्यक्त होण्यासाठी स्पर्धा ही एक माध्यम ठरू शकते. यश किंवा अपयश हे स्पर्धेच्या निकालावरून न ठरवता स्पर्धेमुळे झालेली प्रगती याबाबत विचार करायला हवा.
एकंदरीत यश कशाला म्हणायचं हे व्यक्तीसापेक्ष बदलू शकते. आपल्या अपेक्षांनुसार यशाची व्याख्या बदलत असते आणि त्यानुसार आपल्याला यश आणि सोबतच आनंद मिळत असतो. व्यक्तिमत्व व त्याचा विकास ही एक गुंतागुंतीची अविरत चालणारी प्रक्रिया आहे. मानवाने स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून हे व्यक्तिमत्व अधिकाधिक विकसित, सर्वगुणसंपन्न कसे होईल याचा विचार करणे अगत्याचे ठरते. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपले व्यक्तिमत्व विविधांगी तसेच स्वतःला आनंद देणारे घडवणे म्हणजेच आयुष्यात यशस्वी होणे असे म्हणता येईल, असे मला वाटते.
आकाशी झेप घे रे पाखरा
तोडुनी अज्ञान पिंजरा
यशवंत ही, गुणवंत हो
हीच मनी कामना ॥धृ.॥
खडतर वाट यशशिखराची
घेऊनी शिदोरी ज्ञानाची
पसरवूनी पंख यत्न जिद्दीचे
घे उंच भरारी घे रे पाखरा
तोडुनी अज्ञान पिंजरा ||१||
भेटेल तुला वादळ वारा
यशापयशाच्या अनेक लाटा
झुंज देऊनी तयांना
घे भरारी घे रे पाखरा
तोडुनी अज्ञान पिंजरा ||२||
या विश्वाचे निळ्या नभी नाही तुला भिंत आडवी उभी
पसरवूनी श्रमाचे बळकट
घे घे उंच भरारी घे रे पाखरा
तोडुनी अज्ञान पिंजरा ||३||
सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏
(लेखात समाविष्ट कविता स्वलिखित आहेत.)
© कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी :- 88882 84265
Leave a Reply