व्यक्तिमत्व विकास (personality development) – करिअर म्हणजे काय??- लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

भाग २ –
१. आयुष्य –

आपल्याला माणसाचा जन्म ही एक संधी मिळालेली असते. हे “आयुष्य” जगायचं कसं ? किडा-मुंगी सारख की माणूस म्हणून? किडे मुंगीसुद्धा आपलं आयुष्य प्राणपणाने जगतात. आपल्याला तर सगळं काही मिळालं आहे. फक्त त्याचा उपयोग करता आला पाहिजे. आपल्याला या आयुष्याचा सारीपाट मांडता आला पाहिजे. खेळायला मोकळे मैदान आहे, पण यशस्वी खेळ सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. कारण सर्वजण तेवढ्या आत्मीयतेने खेळत नाही किंवा तसा प्रयत्न करत नाही. त्यामुळे एका संघाकडे यश तर त्याच वेळी दुसऱ्या संघाच्या पदरी अपयश पडते. असे असले तरी खेळण्याचा आनंद मात्र दोन्ही संघांना मिळतो. त्यासाठी खेळणे अनिवार्य आहे. तसेच हा आयुष्याचा खेळ आत्मीयतेने खेळायला हवा आणि मिळणारा निकाल खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा. त्यासाठी हवे आहेत प्रयत्न, कष्ट, जिद्द आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ध्येय! ध्येयाशिवाय आपण मार्ग निवडणार कसा? आयुष्याचा मार्ग ठरवणार कसा? म्हणजे आपल्या प्रयत्नांना दिशा देणार कशी? म्हणून आयुष्यात जगण्यासाठी ध्येय हवेच आणि हे ध्येय ठरवण्यासाठी आपल्याला शिक्षण, संस्कार मदत करतात. त्यासाठी विचार मात्र आपले आपल्यालाच करायचे असतात. त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे चला तर मग ठरवू आपण आपल्या “जीवनाचे ध्येय”
जगु आणि जगवू, आनंद घेऊ आणि देऊ, आयुष्याच्या या संधीचं, सोनं आपण करू.

२. ध्येय –

बरेचदा आपल्याला आपल्या जीवन प्रवासाची दिशा माहीतच नसते. आपला प्रवास दिशाहीन सुरू असतो. केवळ इतरांचा पाठलाग करत इतर जण धावतात म्हणून आपण त्यांचे पाठीमागे पळत असतो. या विश्वामध्ये प्रत्येक सजीवाला आपले वेगळ स्वतंत्र आयुष्य मिळालेले असते आणि आपलं हे आयुष्य आपण वेगळेपणाने जगू शकतो, हेच आपल्याला माहित नसते. वेगळी आडवळणाची वाट स्वीकारायला आपण तयारच नसतो. त्यामुळे नंतर बऱ्याचदा आपला भ्रमनिरास होतो. कारण पुढचे परिणाम आपल्याला माहीत नसल्यामुळे! इतरांच्या मागे पळताना आपल्या क्षमतांचा आपण पुरेपूर उपयोग करू शकत नाही किंवा पळणार्‍यांकडे असणाऱ्या क्षमता तंतोतंत आपल्याकडे नसतात. तसेच काही वेळा परिस्थिती बदललेली असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं मन! ते चंचल असल्यामुळे त्यातील विचार प्रसंगानुरुप बदलतात. आपल्या मनावर इतरांच्या आवडीनिवडीचे, विचारांचे ओझे का लादावे?
हे टाळण्यासाठी आपण आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवले पाहिजे. अर्थात आपल्या आवडीनिवडी नुसार, क्षमतेनुसार, परिस्थितीनुसार, सर्व बाबींचा विचार करून. प्रत्येकाची आवड-निवड व्यक्तीसापेक्ष वेगवेगळी असू शकते. त्यासाठी आपण स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक असते. आपली परिस्थिती, गरज, स्वभाव, आपल्यातील गुणदोष, सभोवतालचे वातावरण, या सर्वांचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. त्यातून आपले “व्यक्तिमत्व” घडत असते आणि त्यातूनच आपण आपले ध्येय ठरवायचे असते. आपण त्यासाठी जागरूक राहायला हवे. सभोवतालच्या घडामोडीत आपल्या आवडीनिवडीनुसार आपण नेमके काय करू शकतो, काय करणे आपल्याला आवडेल, आपल्याला स्वतः बाबत कोणत्या क्षेत्रात आत्मविश्वास वाटतो, त्याबाबत आपण विचार करायला हवा. ( कल चाचणी चा उपयोग होऊ शकतो) अर्थात वयोमानानुसार यामध्येही कधीकधी बदल होताना दिसतो, त्यासाठी थोडा अभ्यास करायला हवा. अर्थात त्यासाठी स्वतःचा अनुभव, इतरांचे मार्गदर्शन आणि आपल्या सभोवतालचे एकूण निरीक्षण यातून आपले ध्येय आपण स्वतः ठरवायला हवे, हे नक्की! नाही का??

३. व्यक्तिमत्व –

प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून एक वेगळा जीव असते. प्रत्येकाचं शरीर, स्वभाव, आवडनिवड या सर्वच बाबी इतरांपेक्षा वेगळे असतात. या जीवाची जडणघडण आयुष्यातील प्रत्येक दिवस, त्या दिवसाचा अनुभव करत असतो. त्या जीवनातील सर्व क्षमता आणि आलेले सर्व अनुभव आणि आपल्या समोर उभी असलेली आव्हाने (challenges) यांच्या मिश्रणातून एक नवीन रसायन तयार होते. ते म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे असू शकतात. हे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी आपल्याला स्वतःला असते. केवळ सामान्य आयुष्य सगळे जगतात पण वेगळं व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आव्हाने स्वीकारायची असतात. त्यातून घडते उत्तुंग व्यक्तिमत्व! आयुष्य रडत रडत जगायचं की झुंजारपणे खेळत, साधेपणाने की वेगळेपणा जपत, ते आपण ठरवायचे असते. त्यासाठी महत्त्वाचा ठरतो आपला निश्चय! अर्थात त्यासाठी आपल्याला आपले आई वडील, मित्र, शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभवांची मदत मिळू शकते. पण त्याचा आपण किती फायदा घेणार हे मात्र पूर्णतः आपल्यावर अवलंबून असते. जसे घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते, पण पाणी पिणे घोड्याला ठरवायचे असते. तसे आपले व्यक्तिमत्व कसे घडवायचे हे आपल्याला ठरवायचे असते. त्यासाठी आपण “प्रयत्न” मात्र केले पाहिजे. प्रत्येक अनुभवाचे रूपांतर योग्य संधी मध्ये करता आले पाहिजे, त्यातूनच स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविले पाहिजे.
क्रमशः
👉 भाग ३ लवकरच…….

© कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर

भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*