व्यक्तिमत्व विकास (personality development) करिअर म्हणजे काय?? – लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

भाग १ –
करिअर म्हणजे काय??

हल्ली मुलांचं करिअर म्हणजे काय? असा प्रश्न विचारला तर शिक्षण आणि नंतर नोकरी अशा स्वरूपात उत्तर मिळते.
आणि मुलांचं शिक्षण म्हणजे काय? असा प्रश्न त्यांच्या पालकांना विचारला, तर १० वी, १२वी नंतर मेडिकल, इंजिनिअर, फार्मसी किंवा कॉम्प्युटर असेच काही सरधोपट मार्ग सांगितले जातात. मुलांना विचारले तर आनंदच दिसून येतो. बऱ्याचदा आई वडील सांगतात तोच त्यांचा मार्ग ठरत असतो. फारसा विचार करण्याची तसदी ते घेत नाही. तशी त्यांना आवश्यकता वाटत नाही, तसेच संस्कार त्यांच्यावर केले जातात. कारण आई वडीलांना आपल्या मुला-मुलींना सर्व काही उपलब्ध करून द्यायचे असते. त्यासाठी त्यांना कोणतेही कष्ट होऊ नये अशीच अपेक्षा असते. आपण म्हणू तीच पूर्व दिशा असते. एकंदरीत करिअर म्हणजे पैसा, प्रतिष्ठा याकडे जाणारा मार्ग! असा काहीसा समज! आपल्या ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, त्या मुला- मुलींच्या बाबतीत पूर्ण करून घ्यायच्या, असा एक मतप्रवाह दिसून येतो. यामध्ये बऱ्याचदा मुला-मुलींच्या आवडीनिवडीचा काही विचारच केला जात नाही. मुलामुलींचे करिअर घडवणे, हे एक दिव्य ठरावे! तसे अवघडच काम! त्यासाठी पालकांनी थोडी पूर्वतयारी करायला हवी. विचारमंथन करायला हवे. त्यामध्ये मुलां-मुलींना सहभागी करायला हवे. मार्गदर्शन घ्यायला/द्यायला हवे. विविधांगी पर्यायांचा विचार करायला हवा. भविष्यातील योग्य-अयोग्य बदलांच्या बाबत विचार करूनच त्यांना योग्य मार्गदर्शन व्हायला हवे. कोणत्याही क्षेत्रातील प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. बऱ्याच वेळा घेतलेले शिक्षण आणि प्रत्यक्ष करियर यामध्ये तफावत दिसून येते. एखाद्या विशिष्ट क्षेत्राकडे (इंजीनियरिंग, मेडिकल, डेंटिस्ट, डी. एड, फार्मसी, कॉम्प्युटर, आय. टी. इत्यादी) वाढणारे मुला-मुलींचे आकर्षण यामुळे बऱ्याचदा ते क्षेत्र कालांतराने निरुपयोगी ठरते. म्हणून करियरसाठी कोणतेही विचार मुलामुलींवर लादले जाऊ नये, तर ते त्यांच्या आयुष्याचे स्वतः शिल्पकार ठरावे, यासाठी प्रत्येकाने काही मुद्दे लक्षात घेणे मला आवश्यक वाटते.

        क्रमशः 👉 भाग २ रा.... लवकरच....

© कैलास भाऊलाल बडगुजर (कवी विभास)
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर,
के.पी. विशारद (ज्योतिष)

भ्रमण ध्वनी :- 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*