आजचा तरुण, उद्याचा भारत
‘कुणासाठी ? कुणाजवळ ? कशासाठी? रडावे,
जेथे जावे तेथे, प्रत्येकाला काहीतरी हवे’
माणूस जन्माला येतो, तेव्हा अगदी सर्वसामान्य प्राण्याप्रमाणे, काहीही सोबत नसणारा केवळ एक देह घेवून! मग श्रीमंत असो की गरीब ! पण त्यानंतर मात्र अगदी पहिल्या दिवसापासून त्याला काहीना काही चिकटत जाते. अगदी सुरुवातीला नाव, कोणत्या दिवशी, कुणाच्या आशिर्वादाने, कुणाचा वारसदार, यानुसार त्याला नाव चिकटते. त्यातही कागदोपत्री एक, आवडीचे दुसरे ! लहान असेपर्यंत या मुलांना मोह नसतो असे आतापर्यंत म्हणत असत. पण आता आपण त्यांनाही काहीतरी मागण्याची सवय लावत आलो आहोत. ‘हे कर, मग तुला ते देईल!’ अशी लाच देण्या-घेण्याची सवय आपणच लावत जातो आणि कालांतराने ती अंगवळणी पडते, इतकी की घेण्याची आठवण तेवढी रहाते. त्याबदलीचे करणे/ देणे मात्र आपण सोयीस्करपणे विसरत जातो. अशातच ही मुले लहानाची मोठी होतात आणि याच संस्कारात तरुणाई गाठतात.
आजचे तरुणच उद्याचा आधारस्तंभ असतात. बराच मोठा भार या तरुणांवर असतो. पण म्हणून काय त्यांनी enjoy करू नये काय? या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जातात बिचारे ! त्यांचा अजिबात कुणी विचारच करीत नाही. उमलणाऱ्या कळ्या उमलण्यापूर्वीच ओझ्याखाली दबून जातात की? उद्याच्या देशाच्या जबाबदारीचे ओझे फक्त त्यांनीच का सांभाळावे? आनंद साजरा करताना तर सर्वच जण enjoy करतात. मग अपेक्षांच्या वेळीच तरुणांचा बळी का?
विचारचक्र असचं गोलं गोलं फिरत पुन्हा तिथेच येते, जिथे – भलमोठं प्रश्नचिन्ह उभ ठाकत, उद्याच काय ? हा भारत कसा घडला हा इतिहास उगाळत बसण्यात आता बरीच वर्ष झालीत. आता पुढचा भारत कसा घडेल?. याचा विचार करायला हवा, पण कुणी? ही जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नाही. देशाच्या प्रत्येक नागरिकाने म्हणायचे, “हे आमचे काम नाही, निवडून दिलेल्या प्रतिनिधीचे आहे.” त्यांनी म्हणायचे “हे काम आमचे नाही, त्या विभागाच्या अधिकाऱ्याचे आहे.” अधिकाऱ्यांनी सांगायचे “हे काम आमचे नाही, आमच्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचे आहे.” त्यांनी सांगायचे “आम्हाला पुरेसा पगार नाही, आम्ही का करायचे?” असे विधान करणारा पुन्हा भारताचा एक नागरिकच ना! असे हे चक्र कुठपर्यंत फिरत रहाणार ? आपल्यापासून सुरू होऊन आपल्यापर्यंतच फिरत रहाणार !
कुठेतरी हे चक्र भेदायला हवे! अर्थात आजची तरुण पिढीच उद्याचा भारत घडविणारी जबाबदार पिढी ठरू शकते. पण ही पिढी नेमके करतेयं काय ? काही वेळा नशेत धुंद होऊन एकमेकांच्या गळ्यात पडून नाचतानाचे फोटो वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकलेसुद्धा! ते हेच का ? १० वी पर्यंतचे शालेय शिक्षण होईपर्यंत मुले-मुली थोडफार आईवडिलांचे ऐकण्यास तयार असतात, असा आतापर्यंत समज होता. आताची मुले मात्र त्याच्याही पुढे गेलेली दिसतात आणि १० वी नंतर काय ? नंतरचा प्रवास – एक दिशाहीन प्रवास सुरू आहे, असेच आजचे तरी चित्र आहे असे वाटते. कॉलेजजीवन- उच्च शिक्षण म्हणजे काय? तर enjoy करत हातात ‘पदवी’ मिळवायची! पदवी मिळाल्यानंतर हातातल ज्ञान किती? शिक्षणाची अवस्था काय? अनेक प्रश्नचिन्हांची एक साखळीच! अनेक शाळा, कॉलेजेस, पावसाळ्यात ठिकठिकाणी उगवणाऱ्या भूछत्राप्रमाणे शासनमान्य / अमान्य असणारे, अनुदानित / विनाअनुदानित, त्यातही विविध क्षमता (उपयोगी / निरुपयोगी) असणारे शिक्षक आणि तेवढेच वैविध्य असणारे (अनंत क्षमता असणारे) विद्यार्थी ! या सर्व विविध क्षमतांचा उपयोग (जास्त दुरुपयोगच) करीत आपल्या कॉलेज जीवनाचा उपभोग घेत घडणारी आजची तरुण पिढी ! ही देशाचे भवितव्य घडविणार? यात चुकते कुणाचे ? मुलांचे? शिक्षकांचे ? की पालकांचे ?
माणसाची शिक्षणातून प्रगती होते असे म्हणतात. पण हल्ली शिक्षणातच एवढी प्रगती (इष्ट की अनिष्ट) झाली आहे. सरकारी/ शासकीय अनुदानित शाळांना निकाल (?) लावून शिक्षकांचे पगार, शाळेचे अनुदान टिकवायचे असते व वर्षभर आनंद मिळवायचा असतो तर विना-अनुदानित शाळांना निकाल वाढवून फीची टक्केवारी वाढवायची असते. शाळा चालविताना वेगवेगळे शासकीय अधिकारी जे काही सर्रास वसूली करीत असतात (मंत्र्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी!), ती संस्था चालकांना विद्यार्थ्याच्या फीमधून वसूल करायची असते. एकंदरित निकाल लावण्यासाठी प्रसंगी कॉपी सारखे प्रकार (शिक्षणाची संधी सर्वांना मिळाली पाहिजे या उच्च विचारातून), शहरी-ग्रामीण भागात, कधी स्थानिक लोकांच्या, कधी राजकीय दडपणानेही होतात, नाही का? अगदी कॉपी विरोधी विशेष पथक कार्यरत असून सुद्धा ! आणि कॉपी न करण्याची शपथविधी करुन सुध्दा! (आश्चर्यच आहे ना ! )
शिक्षण घेऊन माणसाचे ज्ञान वाढते, दृष्टीकोन सुधारतो, किमान तशी अपेक्षा असते. मानवता हा एकच धर्म सगळीकडे मानला जावा, असे आपल्यासारख्याला वाटते. पण या शिक्षणाचा पायाच मुळात जाती-भेदावर आधारीत आहे. शाळा-कॉलेजातील प्रवेशापासून शिक्षकांच्या नियुक्ती – पदोन्नतीपर्यंत सगळीकडे जातीभेदाची पाळेमुळे इतकी घट्ट आहेत की त्यातून शिक्षणक्षेत्र वाचू शकत नाही. त्यामुळेच शिक्षणाची ऐशी-तैशी सुरु आहे. म्हणूनचे हल्ली शाळांमध्ये शिक्षकांना मुलांना शिकवायला वेळ आहेच कुठे? स्वतःची हजेरी लावण्यासाठी मोबाइलची रेन्ज असेल अशा ठिकाणी जाऊन स्वतःच्या सहीचा फोटो व्हाट्स अपने आपल्या अधिकाऱ्यांकडे पाठवायचा आणि नंतर शाळेत हजर व्हायचे. अशा सुपीक आयडिया! अशीच एखादी भन्नाट कल्पना काही दिवसांनी घरी राहूनही आपली हजेरी लावता येईल यासाठी उपयोगी ठरू शकेल, नाही का? ( कोरोना मुळे तशी वळ आली सुद्धा ! ) शाळेत पोहोचल्यानंतरही शिकवणे कमी पण कागदी घोडे मात्र जास्त ! विविध प्रकारची माहिती जमा करणे, तशी रेकॉर्डस तयार करणे ( ऑनलाईन म्हणायचे फक्त, तसा कागदी पसारा आहेच.) जनगणना, पशुगणना, गावातील शौचालयांची पहाणी, निवडणुकांची कामे, एक ना अनेक कामे शिक्षकांना करावी लागतात. त्यानंतर विविध प्रकारणी प्रशिक्षणे- शिबीरे, ‘रात्र थोडी सोंग फार’! “आम्हालासुध्दा माहीत नाही, पण वरिष्ठांनी सांगितलयं म्हणून तुम्हाला सांगतो” अशी भाषा ! मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी (कोणत्या?) विविध योजना, पोषक आहार योजना (पोषण कुणाचे हे एक प्रश्नचिन्हच ? ) खिचडी शिजवणे, लाडू, चिक्की, गणवेश असे पदार्थ तालुक्याच्या गावावरून आणून मुलांना वाटण. (काही लाटणे.) अशी कामे नसतील, तर काही शिक्षक स्वतःचे विविध उद्योग करण्यास तत्पर असतात. काहीच नसेल तर राजकारण आहेच. म्हणूनच दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावे लागतात. एकंदरित मुलांच्या सर्वांगीण विकासापूर्वी शिक्षकांचा मात्र नक्की विकास होतो. अर्थात काही अपवाद शिक्षक मात्र आपले सर्व विसरून या मुलांच्या विकासासाठी दिवसरात्र झटत असतात. काही वेळा शिक्षकांची इच्छा असूनही काही करता येत नाही, असेही चित्र दिसते. मात्र फारच कमी! मोजकेच शिक्षक असे आपल्या कर्तव्याला जागणारे असतात. पण असे शिक्षक ज्या मुलांना मिळतात, त्यांना त्याचे भान असायला हवे ना? त्यामुळेच यातून आणि अशा विविध स्थितीतून बाहेर पडणारी मुले, तरुण उद्याचा भारत घडविणार आहेत, तो कसा असेल? असा एक गंभीर प्रश्न डोळ्यासमोर उभा रहातो.
ही मुले- तरुण, विद्यार्थी- आजचा विद्यार्थी हा तंत्रज्ञानाने पुढारलेला आहे. टीव्ही, संगणकाचे दिवस आता मागे पडलेत. स्मार्ट मोबाइल – बरोबर सर्व जगच आपल्याबरोबर घेऊन फिरणारा आजचा विद्यार्थी ! त्यामुळे त्याचा नको तेवढा विकास झालेला दिसून येतो. ‘ज्ञानाचा सागर’ आपल्या समोर उपलब्ध असताना त्यातून ‘मोती’ वेचण्याऐवजी नको त्या गोष्टींसाठी या मोबाइलचा वापर सुरु आहे. ‘राजहंसाची सर कावळ्यांना कशी येणार’ अशी स्थिती आहे. दिवसभरामध्ये एकदाही पुस्तकाचे एकही पान न उघडणारा विद्यार्थी मोबाईलसाठी नको तेवढा वेळ खर्च करतो. शाळा कॉलेज – मध्ये शिकवले जाणारे विषय आत्मसात करण्यापेक्षा आजचा विद्यार्थी -एकमेकांकडे आणि एकमेकांकडून नको त्या गोष्टींचा प्रचार व प्रसार करताना दिसतो. अभ्यासाने काय मिळेल/ मिळतं ? असे मोठे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यापुढे असल्याची सध्या परिस्थिती आहे. शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे नोकरी-व्यवसाय करता येईल असा विश्वास कोठेच दिसून येत नाही. त्यामुळे शिक्षण घेताना त्याचे गांभीर्य लक्षात न घेता काळाचा अपव्यय आणि त्यातून नव्या पिढीचे मोठे नुकसान होताना दिसते. यामध्ये पालकांचाही सहभाग तेवढाच महत्वाचा ठरतो. तर बऱ्याचदा ते सुद्धा हतबल झालेले दिसून येतात. आपल्या बरोबरीच्या मुलामुलींना समजावणे, पटवणे, हाताबाहेर गेलेले असते.
एकंदरित काय, एक पिढी शिक्षण घेवून कारकून बनली आणि आता दुसरी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे. परीक्षेत 100% गुण हवेत त्यासाठी जिल्हा परिषद शाळांपेक्षा, खाजगी शाळा चांगली, त्यापेक्षा सेमी-इंग्रजी माध्यम हवे, असलीच तर इंग्रजी माध्यमाची शाळा उत्तम, त्यापेक्षाही CBSE चांगली, हेही नको, माझ्या मुलाला ICSE शाळाच हवी अशी चढाओढ सुरु आहे. अगदी अमिताभ, सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहिल्या, तर पालक लाखो रुपये भरून मुलांना पाठवतील. मुलाच्या शिक्षणासाठी एका वर्षाला जेवढा खर्च होतो तेवढा खर्च पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागला नाही. आणि मग मुलाची फी भरण्यासाठी लागणारे पैसे मिळवायचे कसे? कोणत्याही मार्गाने? हे दुसरेच एक दुष्टचक्र सुरु होते.
मूळ भारतीय शिक्षण, वेदशास्त्र, संस्कृत भाषा यांचा संपूर्ण जगात अभ्यास सुरु असताना आमची अवस्था मात्र ‘कस्तुरी मृगासारखी झाली आहे. ‘तुझे आहे तुजपाशी, परि जागा चुकलासी’ अशी आपली अवस्था झाली आहे. शिक्षणाचा बाजार झाला आहे. जन्माला येणाऱ्या मुलाचा शाळा प्रवेश घेवून ठेवणे तेवढेच बाकी आहे. ‘शिक्षण’ म्हणजे ‘अनुकरण’ असे नवे समीकरण तयार होत आहे ‘मागणी तसा पुरवठा’ असे शिक्षण सुरु आहे. ‘स्वतःची ओळख’ निर्माण करणारे शिक्षण आवश्यक असताना अपेक्षांच, पर्यायाने दप्तराचं ओझं वाहून या मुलांचे काय होणार आहे. आता काही मुलं AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढताते, चिप्स खातात, सॉफ्ट ड्रिंक्स पितात आणि मोबाईलवर गेम खेळतात. तर दुसरीकडे काही मुलांचा यापैकी कशाचाही दुरान्वयेही संबंध येत नाही. दोन वेळा पोटाची खळगी भरणेही कठीण आहे, असेही चित्र आहे, दोन्हीकडे मुले दुबळी होत आहेत शरीराने, आणि मनानेसुद्धा ! तसे पाहिल्यास भारतात आजही १०० वर्षे जगणारी माणसे आहेत. पण ती अस्सल भारतीय आहेत. आयात केलेल आधुनिक शैलीने जगणारी माणसे – त्यांचे सरासरी आयुष्य ६० वर्षेच नाही का??
प्रत्येक विद्यार्थी उद्या देशाचा आधारस्तंभ आहे, असा विचार केल्यास तो विद्यार्थी घडविणारे शिक्षण द्यायला हवे हे मात्र निश्चितच ! आजच्या विदयार्थ्याला खेळ, व्यायाम, भटकंती, आणि दर्जेदार वाचन याची कमतरता जाणवते. चार भिंतींची शाळा, क्रीडांगणे फक्त कागदावर, नामांकित पुस्तकें फक्त ग्रंथालयात सजावटीसाठी, कुणाला वाचायला दिल्यास ते खराब होईल अशी मनोवृत्ती, परीक्षा केंद्रित अभ्यासपद्धती, अशा एक ना अनेक समस्यांनी आपले शिक्षण पोखरलं गेलंय, शिक्षण काय असतं ? याच उत्तर १०० वर्षापूर्वीच रवींद्रनाथ टागोरांनी ‘शांतीनिकेतन’ सारखी शाळा उभारुन दिल होतं. पण त्याचा उपयोग आपल्या देशाने किती केला? तशा किती शाळा आज भारतात आहेत ? टागोर जगण्यासाठी शिकवत होते विविध कला ! आता या कलांच्या स्पर्धा झाल्या आहेत. या स्पर्धांमध्ये धावताना ‘शिकणे मात्र राहून जाते आणि जगणे हरवून जाते.’
सर्वार्थाने विषय खूप मोठा आहे. एकंदरित नवीन पिढी – तरुण पिढी “उद्याचा भारत म्हणजे सुवर्णयुग” असे ठरवू शकेल काय? या प्रश्नाचे उत्तर नकाराकडे जाते. मात्र “आजच्या अंधःकारातच उद्याचा उषःकाल दडलेला असतो” या नकाराला होकारामध्ये बदलण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे असे वाटते. एक जबाबदार सुशिक्षित नागरिक म्हणून आजचा विद्यार्थी- तरुण हा उद्याचा ‘सुजलाम सुफलाम् सर्व बाबतीत स्वयंपूर्ण भारताचा’ घटक कसा बनेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी महत्त्वाची ठरेल, ते एक कर्तव्यच ठरेल. त्यासाठी आजपासूनच सुरुवात करावी लागेल. आजचा तरुण हा पैशाने गरीब किंवा श्रीमंत असला तरी अभ्यासाने, ज्ञानाने, वर्तनाने, श्रम करण्याच्या गुणांनी श्रीमंत असला पाहिजे. त्याला केवळ पैसा पुरवून हे साध्य होणार नाही. नको त्या वयात केवळ पैसा पुरवल्यास “घडायच” राहूनच जाईल. वाचन, स्पर्धा सहभाग, कलेचा व्यासंग, कष्टाची जाणीव …. या व अशा अनेक गुणांच्या विकासातून प्रत्येकाच्या वाणीला प्रगल्भतेची खोली व संस्कारातून नम्रतेची झालर यायला हवी. केवळ शाळा – शिक्षक – क्लासेसवर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी झटकून हे साध्य होणार नाही. प्रत्येक आई-वडिलांनी त्यासाठी वेळ देण आवश्यक आहे. आपली जबाबदारी सर्व प्रथम आहे. मुला-मुलींना-तरुणांना योग्य संस्कारात घडविले, त्यांना आकार दिला (ओल्या मातीच्या गोळ्यालाच देता येतो) तर, आपोआपच उद्याच्या भारताचे चित्रही सुंदर असेल, यातूनच “उद्याच्या भारताचे शिल्पकार” घडतील यात शंकाच नाही.
चला चला घडवूया आपणच सारे
आजची तरुणाई, उद्याचा भारत,
तुम्ही-आम्ही उतरवू स्वप्न सत्यात
येईल लवकरच ते सुवर्णयुग परत !
|| जयहिंद ||
लेखक :. कैलास भाऊलाल बडगुजर, टिटवाळा
भ्रमणध्वनी : 8888284265
304 / इमारत क्रमांक 8, अमृत सिध्दी संकुल,
सुमुख सोसायटीच्या पाठीमागे,
टिटवाळा (पूर्व) जि.ठाणे 421601
कैलास बडगुजर सर आपला लेख आवडला.
Excellent article for youth n parents