कोणत्याही देशाचा विकास हा शिक्षणातून होत असतो. देशाचे जाऊ द्या, फक्त महाराष्ट्राचा विकास शिक्षणातून होऊ शकतो, याबद्दल दुमत असू नये. पुणे- मुंबईसारखी शहरे ही ज्ञानाची पंढरी मानले जाते. पण आता हा ज्ञानाचा ओघ शहरांपासून गल्लीबोळात पोहोचला आहे. कारण सगळीकडेच शिक्षण सम्राटांचे राज्य पसरले आहे. शिक्षण हे बारमाही कोणत्याही परिस्थितीत देणारे हुकमी पीक होऊ लागले आहे. बऱ्याच जणांचं त्यामुळे भलं होत असल्यामुळे कोणीही आपले तोंड उघडायला सहसा तयार होत नाही. “आपलेच दात आणि आपलेच ओठ” या न्यायाने “तेरी भी चूप, मेरी भी चूप” या मध्येच सर्वांचे कल्याण आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी सरकार अनेक “जनकल्याणकारी योजना” शोधून काढते आणि त्या राबविण्यासाठी पुढाकार घेते. अनेक वर्तमानपत्रे व इतर ठिकाणी त्याचे कौतुक होते व त्यातून “ज्ञानगंगा” घरोघरी जाण्यापूर्वी “पैशांची गंगा” मात्र योग्य ठिकाणी जाऊन पोहोचतेच.
सुगंधी दूध, खिचडी, बिस्किटे, फलाहार, अंडी, अशा अनेक “पौष्टिक योजनांमधून” मुलांची पोटे भरली की भलतीच पोटे फुगली हा विषय फारसा नवीन राहिलेला नाही. दुसऱ्या बाजूने मुले शिकण्यासाठी शाळेत येतात की पोट भरले की घरी जातात, हे ही तितकेच महत्वाचे ठरावे किंवा फक्त कागदावरच या मुलांचे अस्तित्व असते हेही नाकारून चालणार नाही. अशा विद्यार्थ्यांच्या कल्याण करणाऱ्या आणि सोबतच बऱ्याच जणांचे कल्याण करणाऱ्या या योजनांमधून “शैक्षणिक विकास” किती साध्य होतो यापेक्षा आर्थिक विकास किती होतो? त्या दृष्टीने तरी या योजना उपयुक्त ठरत असाव्यात. विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक योजना, एका वर्षात पाठ्यपुस्तकाचे होणारे चार तुकडे, पुन्हा नवीन वर्षी नवीन पुस्तके, नवीन छपाई, नवीन वितरण, यातून किती जणांचे “खिसे भरतात” हे जाणकारांना माहिती नाही का?
शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा हा दरवर्षी चघळला जाणारा विषय! तसे सरकारला अशैक्षणिक कामासाठी शिक्षक म्हणजे एक हक्काचे साधन वाटत असावे. खरेतर दिवाळी व मे ची सुट्टी या कालावधीचा जवळजवळ फुकटचा पगार शिक्षकांना द्यावा लागतो, याचा वचपा ते काढत असावेत. एका अर्थाने तेही बरोबर आहे. इतर कोणत्याही क्षेत्रात येवढ्या सुट्टी नसताना तशी ती शिक्षकांना का द्यावी? याला काही भक्कम आधार नसावा. त्यातून हा प्रकार होत असावा. तसेच शैक्षणिक कामाचा बोजा नसल्यावरही सगळेच शिक्षक प्रामाणिकपणे किती काम करीत असावे? हा संशोधनाचा विषय ठरावा.(अपवाद ग्राह्य) एकंदरीत काय योग्य व काय अयोग्य याचा एकदा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय हा गुंता सुटेल असं वाटत नाही.
तसेच एक मुद्दा वेतनाचा! पूर्वीच्या काळी अगदी तुटपुंज्या पगारातही रक्ताचे पाणी करून शिकवणारे व आदर्शवत ठरणारे शिक्षक होऊन गेले. पण हल्ली त्या वेतनात बरीचशी वाढ झालेली पाहता दर्जा मात्र कितीतरी पटीने घसरलेला दिसतो. बऱ्याचदा पगारवाढ किती व कशी होणार याकडे बरेच शिक्षक टक लावून पाहताना दिसतात. कशातरी पाट्या टाकून दिवस ढकलणाऱ्या शिक्षकांपासून ते बरेच स्वैर म्हणजे उल्लेख करण्यास योग्य वाटत नाही असे प्रकार करण्यापर्यंत शिक्षक लोकांची मजल गेलेली दिसून येते. एक प्रकारे शिक्षक (गुरु) या पदाला काळीमा लावणारे स्वरूप सध्या काही ठिकाणी दिसून येते. माणूस तिथे गुण-अवगुण आले, हे साहजिकच असे म्हणणारे भेटतात. पण चांगल्या शिक्षकांचे दिवस राहिलेले नाहीत हेच खरे! त्यांना सध्याच्या या वाहत्या प्रवाहाचा जोर सोसवत नाही. त्यामुळे एक तर ते या प्रवाहातून दूर ढकलले जातात, गटांगळ्या खातात किंवा दूर कोठेतरी भरकटत जातात. भविष्यात काय होणार? नीती आदर्श गुंडाळून ठेवावी लागणार, असेच वाटते. पण यातून काय निष्पन्न होणार? याबाबत एक प्रश्नचिन्ह उभे ठाकते. ऐनवेळी संप करून विद्यार्थ्यांना वेठीस धरून आपले इप्सित साध्य करणाऱ्या उच्चशिक्षित शिक्षक- प्राध्यापक वर्गाला दोष द्यावा की ही वेळ येईपर्यंत झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला कारणीभूत धरावं? हा न सुटणारा गुंता! यामध्ये सरकार मधील आमदार, खासदार, व संधीसाधू शिक्षक वर्गाचे
एकमेका साहाय्य करू
अवघे साधू स्वार्थ
विद्यार्थ्यांचे काय महत्त्व
आपण पहावे “अर्थ”
असे वर्तन दिसते.
तसे पाहता विद्यार्थी वर्गालाही त्याचे काही सोयरसुतक वाटते असे चित्र नक्कीच नाही. कोणत्याही परिस्थितीत शिकण्याची विद्यार्थ्यांची तयारी दिसते. यामध्ये आर्थिक दृष्ट्या ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, अशांना शिक्षणाचे खरे महत्त्व कळून ते जीव तोडून मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण करण्याची व पुढे जाण्याची तयारी ठेवतात. दुसरा वर्ग आर्थिक सधन, या विद्यार्थ्यांकडे पैशाची सुबत्ता असल्याने कशाही परिस्थितीत पाहिजे तेथे पाहिजे त्या शाखेला प्रवेश घेण्याची आपली आर्थिक कुवत असल्यामुळे त्यांना अभ्यास महत्त्वाचा वाटत नसावा. त्यातून मौज मस्ती करत, प्रसंगी अयोग्य सवयींच्या आहारी जात, शिक्षणाचे तीन तेरा वाजवून, फक्त नावाला सर्टिफिकेट पाहिजे, असे वाटणारा हा एक गट! यांना आर्थिक परिस्थिती, आई-वडिलांचे कष्ट, घरची परिस्थिती/अपेक्षा याचा काही संबंध नसतो. तारुण्य हे फक्त मजा करण्यासाठीच असते, अशी धारणा! शिक्षणाने काय भले होणार आहे? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करणारा हा वर्ग! एक वेगळाच संदेश दर्शवतो व देशाचे भवितव्य काय? असा प्रश्न निर्माण करतो.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या नावाने शिक्षणाचा जो खेळ खंडोबा चालूच आहे तो कधी थांबणार या विषयावर न बोललेले बरे !!
महाराष्ट्रातील शिक्षण, एक अगदी आदर्श शिक्षण पद्धती असल्याचा आव आणणारे आपले शिक्षण मंत्री, शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग हाही एक महत्वाचा घटक ठरावा. कॉपीमुक्त महाराष्ट्राच्या कागदावरील आदर्शवत वाटणाऱ्या योजना, त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रतीकात्मक शपथा पाहिल्यावर आणि प्रत्यक्ष परिस्थिती कळल्यावर, सामान्य माणसाला, खऱ्या आदर्श शिक्षकाला (केवळ आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाला नाही) भोवळ आल्याशिवाय राहणार नाही.
असो, जे उघड्या डोळ्यासमोर घडते, ते पाहत राहायचं याशिवाय आपल्याजवळ काहीच मार्ग नाही हेच खरे!!
(सध्या काही शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना लाच घेताना अटक करण्यात आली या अनुषंगाने हा बराच पूर्वी लिहिलेला लेख, अगदी शंभर टक्के खरा वाटतो)
लेखक :. कैलास भाऊलाल बडगुजर, टिटवाळा
भ्रमणध्वनी : 8888284265
Leave a Reply