अष्टपैलु व्यक्तीमत्व- श्री. टी.टी.बडगुजर यांचा सेवानिवृत्त – श्री. चंद्रकांत बडगुजर, बोराडी

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

थोर शिक्षणमहर्षी, स्वातंत्र्यसेनानी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांनी शिरपूर तालुक्यात सर्वसामान्य, गोरगरीब,आदिवासी बांधवांसाठी शिक्षणाची गंगोत्री आणली.त्यामुळेच हजारो युवकांना शिक्षण,नोकरीची संधी मिळाली.बाबांनी रोहिणी,कोडीद,मालकातर सारख्या दुर्गम भागात शाळा उघडल्या,लांबच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय केली.परिसरातील सर्व गावांमध्ये बाबांनी भेटी घेऊन शिक्षणाचे महत्त्व समजावले. टी.टी.बडगुजर यांना प्रथम कोडीद (विनाअनुदानित) येथे मुख्याध्यापक म्हणून सेवेची संधी दिली. त्यावेळी अतिशय बिकट परिस्थिती होती. आज सारखी वाहने नव्हती शाळेसाठी विद्यार्थी आणण्यासाठी पुर्ण टिम परिसरात अक्षरशः सायकलवर,पायी फिरले,पालक व विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन कर्मवीर आण्णाबाबा आपल्या भागाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा उघडत आहेत. हे समजावुन दिले.

सर्वांच्या प्रयत्नाने आज दि.न.पाडवी माध्यमिक विद्यालयाच्या वटवृक्षाचा विकास झाला आहे.आपण अष्टपैलु,अजातशत्रु, सहकारी, मैत्रीपूर्ण व्यक्तीमत्व म्हणतो ते टी.टी.बडगुजर सरांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते.हिंदी विषयात अतिशय प्रभावी अध्यापन करुन ज्ञानदान केले.याशिवाय स्काऊट गाईड चळवळ,व्यंकटेश क्रिडा स्पर्धा,दहावीच्या बोर्डाच्या परिक्षा,नियामकाचे काम,शालेय व्यवस्थापन व कागदपत्रांची पद्धतशीर मांडणी,वेळापत्रक,ऐनवेळेस आलेल्या समस्या व निराकरण,शैक्षणिक सहलींचे नियोजन,समाजातील संघटन इ.क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.कर्मवीर बाबा स्काऊट गाईडचे स्टेट कमिशनर असताना अनेक मेळावे,शिबिर,राज्यस्तरावरील मेळावे,गावात,परिसरात विविध कार्यक्रम,रॅली,वृक्षारोपण होत असत त्यात सरांचा महत्त्वाचा सहभाग असायचा.

१९९० पासुन व्यंकटेश क्रिडा स्पर्धेतील सामन्यांच्या लाॅट्सचे कागदावर अतिशय सुंदर अक्षरात नियोजन,मैदानावर दिवसभर समालोचन,बक्षिस वितरण समारंभातील नियोजनात महत्त्वाची भूमिका होती.अतिशय मनापासून त्यात स्वतःला झोकून देत असत.कधीही कामाचा कंटाळा आला नाही.कारण त्यावेळेस आज सारखे संगणक,प्रिंटर नव्हते.शाळेत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत केंद्राच्या बैठक व्यवस्थेच्या नियोजनापासुन इतर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महत्त्वाची भुमिका असायची.शालेय सहलींमध्ये प्रवासमार्ग,राहण्याची व्यवस्था,कागदपत्रांची जुळवणी,अचानक काही समस्या आल्यास करावयाची उपाययोजना यातील दुरदृष्टीपणा अतिशय कौतुकास्पद असायचा.पुर्ण सेवेत शालेय शिस्त,शालेय व्यवस्थापन यासाठी सर्व मुख्याध्यापकांना मोलाची मदत केली आहे.कोडीद येथे मुख्याध्यापक झाल्यानंतर सर्व शालेय रेकॉर्डची व्यवस्थित मांडणी केली. कामाचा,लिखाणाचा कधीच कंटाळा केला नाही.

याबरोबरच बडगुजर समाजातही सक्रिय आहेत.उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे अनेक विधायक कामे सरांच्या हातुन होत आहेत. त्यांच्या एकत्र कुटुंबात अनेक संकटे आली पण कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांना सांभाळून,लक्ष देऊन आज स्वतःच्या पायावर उभे केले आहे.कोणत्याही आस्थापनेत लोकं येतात व जातात काम बंद होत नाही पण काही लोकांची कार्यशैली,पद्धती निश्चितच कौतुकास्पद असते. सरांची उणीव निश्चितच जाणवेल.बापूसाहेब ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत.पण आज त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम व नवीन इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम कोडीद येथील दिगंबरराव नरसी पाडवी माध्यमिक विद्यालयात आयोजित केला आहे त्यांना तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

1 Comment

  1. रामकृष्ण पांडुरंग बडगुजर, दोंडाईचा (धुळे)
    June 26, 2022 at 4:40 pm

    सर सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! 💐
    आपणास सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखी, समाधानी
    व आरोग्यदायी जावो हीच प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी
    प्रार्थना ! 💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*